आठवणीतील 'शाळा' :-3

Submitted by Cuty on 7 February, 2020 - 05:56

वर्गात शिकवणे सुरू झाले. आणि सर्वप्रथम 'पाठांतर' ही संकल्पना समजावून घ्यावी लागली. गुरूजींनी पाढे शिकवायला सुरूवात केली. रोज एक पाढा आमच्याकडून म्हणवून घेत आणि पाठ करायला थोडा वेळ देत. मग वही मिटून, न बघता म्हणायला लावत. तेव्हा कुठे, पाठांतर म्हणजे काय, हे लक्षात आले. कुणाचे लवकर पाठांतर होई, कुणाचे होत नसे. ज्यांचे पाठ नसे ती मुले छडी खात आणि अंगठे धरून उभी राहत. बाकीची मुले 'वाचलो बाबा आपण!' असे भाव चेहर्यावर घेऊन भीतभीतच खाली बसत. खरे तर, उद्या आपल्याला छडी बसू नये, लवकर पाढे पाठ व्हायला पाहिजेत ही भिती त्यांच्याही मनात असे. मग मी एक युक्ती काढली. गुरूजींनी दोनचा पाढा घेतला की, मी घरी गेल्यानंतर तीनचा पाढा आधीच पाठ करत असे आणि दुसर्या दिवशी वर्गात सर्वांच्या आधी तीनचा पाढा म्हणून दाखवे. आता, मी जरी हे सर्व मार वाचवण्यासाठी करत असले, तरी यामुळे मला रोज घरी अभ्यासाची सवयही लागली. शिवाय गुरूजी सर्व वर्गासमोर उभे करून शाबासकी देत. सर्व मुले, कुणी आश्चर्याने तर कुणी हेव्याने माझ्याकडे पाहत. तेव्हा खूप काहीतरी भारी वाटे.
अशा त-हेने बघताबघता पहिली चाचणी परिक्षा आली. काही न करता कसे कुणास ठाऊक माझा वर्गात दुसरा नंबर आला. प्रगतीपुस्तक घेऊन घरी गेले. अन त्या दिवसापासून खर्या अर्थाने घरच्यांचे लक्ष माझ्या अभ्यासाकडे वेधले गेले! मी घरातील एकुलती मोठी मुलगी, शिवाय ही पहिलीच परिक्षा असल्याने आतापर्यंत माझी अभ्यासातील प्रगती घरी माहीतच नव्हती! मग त्यादिवसापासून आईवडिलांनी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. अन्यथा त्यांचा समज होता, आपली मुलगी काही शाळेत फारशी हुशार नसणार, जेमतेमच असणार!
पुढच्या परिक्षेत माझा पहिला नंबर आला. अन इथूनच पुढे अभ्यासाचे जू माझ्या मानेवर बसले! मग 'शाळा' संपेपर्यंत मी अभ्यासाचे, अपेक्षांचे जोखड वागवत राहिले. पुढे चौथीत केंद्रपरिक्षा, स्काॅलरशिपची परिक्षा अशा आव्हानांची कोवळ्या वयातच ओळख झाली. केंद्रपरिक्षेत दुसरी आल्याने आणि स्काॅलरशिप परिक्षेत चार मार्कांनी स्काॅलरशिप हुकल्याने अपयशाची ओळखही पहिल्यांदाच झाली. आपल्या नाही तर, इतरांच्या अपेक्षाभंगाची टोचणीही टोचली! कोवळ्या वयातच ताणाशी सामना झाला. तेव्हा 'टेन्शन' हा शब्दही माहीत नव्हता!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

> आपल्या नाही तर, इतरांच्या अपेक्षाभंगाची टोचणीही टोचली! कोवळ्या वयातच ताणाशी सामना झाला. तेव्हा 'टेन्शन' हा शब्दही माहीत नव्हता! > + वर्ग/शाळा मित्रांचे वाळीत टाकणे नव्हते का? हिचं सगळे कौतुक करतात म्हणून जेलसी, आमचे आईबाप हीचं उदा देऊन आम्हाला बडवतात/सारखा अपमान करतात म्हणून राग...