आठवणीतील 'शाळा' :-2

Submitted by Cuty on 5 February, 2020 - 05:25

बालवाडी संपली अन एक नविन अध्याय सुरू झाला. ही होती प्राथमिक शाळा! त्याकाळी खेडोपाडी सहसा मुले जिल्हा परिषदेच्याच शाळेत जात. एकतर त्याचा दर्जाही चांगला असे अन त्याकाळी खाजगी शाळेचे एवढे पेव फुटले नव्हते. या शाळांची बांधणीही सर्वत्र एकसारखीच असे. मोठे उंच वर्ग, त्यांना प्रत्येकी चारपाच खिडक्या, दारापुढे मोठा प्रत्येक वर्गासमोरून जाणारा लांबलचक व-हांडा आणि त्याच्या दुसर्या बाजूला ओळीने लाकडी खांब. त्यावर तोलून धरलेला पत्रा आणि लाकडी तुळया. या लाकडी तुळयांवरसुद्धा रंग देऊन सुविचार किंवा पसायदानाच्या ओळी लिहिलेल्या असत. प्रत्येक वर्गासमोर दार आणि खिडकी यांच्यामध्ये भिंतीवर बाहेरून काळा फळा रंगवलेला असे. त्यावर सुविचार, गणितातील सूत्रे पेन्ट केलेली असत, सूचना लिहिल्या जात. थोड्याफार फरकाने जिल्हा परिषदेच्या शाळा अशाच असत.
आतमध्ये भारतीय बैठकीत बसावे लागे. त्यामुळे पुढे दप्तर,खाली बसकर आणि त्यावर ओळीने बसलेली मुले असे चित्र असे. त्याकाळी चौथीपर्यंत सर्वजण पाटीपेन्सिल वापरत. इयत्ता तिसरीपासून एकेरी वही, कंपासपेटी, पेन यांचा समावेश दप्तरात होई. प्यायला 'स्वच्छ शुद्ध ' पाण्याची टाकी असे. त्यातीलच पाणी सर्वजण पीत.
खरेतर बालवाडीतच ज्ञान मिळाले होते की, मोठी मुले मोठ्या शाळेत जातात. त्यांच्याप्रमाणे गणवेष घालून मोठ्या शाळेत जाण्याचे आकर्षण आधीपासूनच होते. प्राथमिक शाळेत पहिल्यांदा पाऊल ठेवले अन ती मोठी शाळा, मोठे पटांगण पाहून आपण फारच मोठे झाल्याचा फील आला. मात्र नव्याचे नऊ दिवस सरले अन आता खर्या अर्थाने 'शाळा' सुरू झाली. इथे बालवाडीप्रमाणे रमतगमत, हसतखेळत शिक्षण नव्हते. नाचगाणी, खेळ नव्हता. सकाळी वेळेवर शाळेची सुरूवात प्रार्थनेने होई. थोडाही उशीर झाला, तर उशीरा आलेल्यांची एक नविन रांग शेजारी तयार होऊन, प्रार्थना संपेपर्यंत ती मोठी होऊन गेटजवळ जाऊन पोहोचे. आम्ही वर्गात गेल्यानंतर ही छड्या खाणारी मुले, पाच मिनिटे मागाहून वर्गात प्रवेश करत. अन बाकीच्यांच्या चेहर्यावर 'खाल्ला मार !' असे भाव उमटत. मग गुरूजी वर्गात आल्यानंतर, इथे त्यांना 'एकसाथ नमस्ते' म्हणण्याची पद्धत होती. मग आम्हीही तसेच करू लागलो. गुरूजींनी 'बसा!' म्हटल्याशिवाय कुणी खाली बसत नसत. कधीकधी गुरूजी मुद्दाम तसे सांगत नसत. अन पटकन कुणीतरी न कळून खाली बसत असे आणि मग छडी खात असे! अशा त-हेने कडक शिस्तीत आमची शाळा सुरू झाली!
क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खेड्यातली, जिल्हापरिषद शाळा आहे का ही?

तुमच्या, मित्रांच्या कुटुंबाची आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक परिस्थिती, अडचणी
आणि त्यामुळे शिक्षण, इतर घडवणूक इत्यादी वर होणारा परिणाम
अशी लेखमाला लिहली तर जास्त चांगले होईल.

धन्यवाद अॅमी.
हा लेख माझ्या दोन्ही शाळा, त्यातील अनुभव , दोन्हीतील फरक, अन त्यांचे माझ्यावर झालेले परिणाम यावरच आहे. तुम्ही सांगितलेल्या गोष्टीही ओघाने येतीलच.