जगात फक्त दोन प्रकारची लोकं असतात !

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 January, 2020 - 07:11

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त खालील बातमी वाचनात आली -

_______________________

मी मुसलमान, माझी पत्नी हिंदू आणि आमची मुलं भारतीय आहेत’, असं वक्तव्य अभिनेता शाहरुख खानने केलं आहे. अलिकडेच त्याने डान्स प्लस ५ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने हे विधान केलं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसंच त्याने मुलांना आपला धर्म भारतीय आहे, असं देखील सांगितल्याचं यावेळी तो म्हणाला.

एकदा सुहाना लहान असताना तिला एक फॉर्म भरायचा होता. यात तिला तिचा धर्म कोणता ही लिहायचं होतं. त्यामुळे तिने ‘पप्पा, आपण कोणत्या धर्माचे आहोत? ‘असा प्रश्न विचारला. त्यावेळी ‘आपण भारतीय आहोत. कोणताही धर्म नसतो आणि तो नसायलाही पाहिजे”, असं उत्तर शाहरुखने सुहानाला दिलं. ही आठवण शेअर करत त्याने “मी मुसलमान, माझी पत्नी हिंदू आणि आमची मुलं भारतीय आहेत”, असं वक्तव्य केलं.

______________________

हि बातमी मी शाहरूखचा चाहता म्हणून ईथे शेअर करत नाहीये. तर मी स्वत:ही असाच विचार करतो. जातीपात धर्मभेद मानणे तर दूर, मी स्वत:लाही कुठल्या जातीधर्माशी जोडत नाही. एक भारतीयच समजतो. अर्थात त्यातही कोणी मनुष्य पाकिस्तानी वा बांग्लादेशी आहे फक्त या कारणासाठी म्हणून त्याचा द्वेष करू शकत नाही. माझ्यामते जगात फक्त दोन प्रकारचेच लोकं आहेत. एक चांगले दुसरे वाईट!

आज मी माझ्या मुलीलाही योगायोगाने हेच सांगितले. टिव्हीवर बाळासाहेब ठाकरे यांचा चित्रपट चालू होता. चॅनेल सर्फ करता करता दिसला. १९९२ बाबरी मशीद आणि दंगलीचा सीन म्हणून थोडावेळ बघत बसलो. एक जळती रॉकेलची बाटली येत एका तान्ह्या मुलाजवळ पडली. तेवढ्यात आतल्या रूममधून मुलगी आली आणि तिने ते पाहिले. पटकन चॅनेल बदलला मात्र तितके तिला पुरेसे होते.

"पप्पा तो लहान मुलगा मरून गेला का??"
"नाही ग्ग, तिच्या आईवडीलांनी तिला येऊन पटकन उचलले ना..."

"पण त्याचे आईवडील त्याला एकट्याला सोडून कुठे गेलेले?"
"ते घरातच होते. पोरगा खेळत खेळत बाहेर आलेला. म्हणून आम्ही तुला सांगतो ना की गेटच्या बाहेर खेळायला जायचे नाही.."

"पण ती आगीची बाटली कोणी टाकली त्याच्याजवळ? त्याला अक्कल नव्हती का? त्या पोराला काही झाले असते तर.."
"हो, ते बॅड लोकं होते. जगात गूड लोकं असतात तशी बॅड लोकंही असतात. आणि बॅड लोकांना अक्कल नसते.." ईतके बोलून मी विषय चेंज केला....

माझा स्वत:चा आंतरजातीय विवाह आहे. ते देखील आपसात न जमणारया दोन जातींमधील विवाह आहे. याच कारणास्तव अडचणींचा सामना करत झालेला विवाह आहे. पण आजवर दोन्ही घरात कधी कोणत्या जातीचा उल्लेख झाला नाही. मला फार लहानपणीच माझी जातधर्म समजला होता. मुलीच्या अजून तसे कानावरही घातले नाही. घरातून तरी नाही. जेव्हा बाहेरच्या जगातून हे ज्ञान येईल तेव्हाही जातधर्म ही फार काही विशेष बाब नसते असेच पोरांना वाटेल असा प्रयत्न राहील.
वरच्या बातमीत शाहरूखने म्हटले फॉर्म भरताना त्याने मुलीला भारतीय हा धर्म सांगितला. पण मला वाटते फॉर्मवर तसे लिहिता येत नसावे, तसेच तो रकाना रिक्तही सोडता येत नसावा. कागदोपत्री जो आपला धर्म आहे, जी आपली जात आहे ती तिथे लिहावीच लागते. दुर्दैवाने मला माझ्या मुलांनाही त्यांची जात धर्म एक दिवस सांगावाच लागणार. पण त्या आधी त्यांच्या मनावर एक गोष्ट पक्की बिंबवायचा प्रयत्न राहील. की या जगात फक्त दोन प्रकारची लोकं असतात. एक चांगले दुसरे वाईट. आपण यापैकी काय बनायचे आहे हे तुमचे तुम्हालाच ठरवायचे आहे.

तसेच आपली मुले, येणारी पिढी, हि काय विचारांची बनणार आहे हे देखील एक पालक म्हणून, एक भारतीय नागरीक म्हणून आपल्यालाच ठरवायचे आहे.

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
मला वाटतं ग्रे शेड सगळीकडे असते/ माणूस नाही तर विचार वाईट असतात हे मुलांना एव्हेंचली समजेलच, पण लहान वयात जात/ धर्म डोक्यात घालण्या ऐवजी चांगले आणि वाईट लोक असतात हे सांगतोय तो.
भारता बाहेर असण्याच्या फायद्यात जात/ धर्म ...(धर्म पूर्णपणे नाही, त्याचे स्टिरीओ टाइप/ विखार तरी) अजिबात मुलांच्या कानावर पडत नाहीत हे एक आपोआप होते.
ऋन्मेश, तू वेगळ्या व्यक्तिमत्वाची झूल काढून लिहू लागल्यावर तुझे लिखाण अचानक जेन्यू अन आणि मनाला भिडणारे होऊ लागले आहे. शुभेच्छा.

>>>>ऋन्मेश, तू वेगळ्या व्यक्तिमत्वाची झूल काढून लिहू लागल्यावर तुझे लिखाण अचानक जेन्यू अन आणि मनाला भिडणारे होऊ लागले आहे. शुभेच्छा.>>>> +४२०

छान. जगात दोनंच किंवा अमुकच प्रकारची माणसं असतात हे मुलांच्या मनात बिंबवण्या ऐवजी त्यांच्यात रिलिजस टॉलरेशन (आणि इक्यु) कसा वाढेल याकडे जास्त लक्ष दे...

ऋन्मेष शाहरुख खानचा इतका अंधभक्त असशील असे वाटलं नव्हतं. मुसलमान मुलींची कमतरता नसतानाही हिंदू मुलींशी लग्न करणं हे एक षडयंत्र आहे.

> पण मला वाटते फॉर्मवर तसे लिहिता येत नसावे, तसेच तो रकाना रिक्तही सोडता येत नसावा. कागदोपत्री जो आपला धर्म आहे, जी आपली जात आहे ती तिथे लिहावीच लागते. > * चिन्ह नसेल तर ते मोकळे सोडता यावे. असेल तर भारतीय, इतर किंवा सांगायची इच्छा नाही असे लिहाता यावे.
Tamil Nadu Woman Becomes First Indian To Get 'No Caste, No Religion' Certificate After 9-Year-Long Battle

can we keep religion and caste column empty in any form असे गुगलून पाहिल्यास कोरा, इतर बातम्या भरपूर मिळतील.

पण फक्त हा रकाना मोकळा ठेऊन चालणार नाही. आडनाव देखील काढून टाकावे लागेल.

छान विचार मांडलेस ऋन्मेष. पुढे जाऊन मुलांना जातीधर्माविषयी कळेलच.
पण आपल्या घरी त्यात भेद नव्हता आपणही असे भेद करायचे नाहीत ही फार महत्वाची शिकवण मुलांना मिळते.

<<< * चिन्ह नसेल तर ते मोकळे सोडता यावे. असेल तर भारतीय, इतर किंवा सांगायची इच्छा नाही असे लिहाता यावे. >>>
धर्म आणि जात बऱ्याच ऑफिशियल ठिकाणी विचारणे हा भंपकपणा भारतातच दिसून येतो आणि याचे कारण म्हणजे मिळणारे आरक्षण. भारताबाहेर शासकीय कामात तर कुणी कधीही धर्मसुद्धा विचारला नाहीये. भारतात असे उदाहरण नक्कीच माहीत आहे की आम्ही 96 कुळी मराठा आहोत म्हणून सोनाराकडे सोयरीक करणार नाही, असे अभिमानाने आणि ताठ मानेने सांगणारे, जे आता आरक्षणाच्या लायनीत अभिमानाने उभे आहेत. आरक्षण मिळत असेल तर कोण कशाला ते रकाने मोकळे सोडायला जाईल? ते उद्योग फक्त नॉन-रिझर्व्हेशनवाले करतील. बाकी सगळ्या नुसत्या बोलायच्या गोष्टी आणि मारायच्या गप्पा.

धन्यवाद प्रतिसादांचे..

अमितव +७८६

ग्रे शेड वगैरे सर्वांना मान्य असावे. ईथे मुद्दा आहे तो चांगला वाईट वा वाईट माणूस हा त्याच्या चांगल्या वाईट वर्तनावरून ठरतो. माणसामाणसांत भेद करायचा झाल्यास तो त्यांच्या चांगल्यावाईट वर्तनावरून करावा. जात धर्म हा काही भेदभावाचा निकष नसावा. आणि हे सगळे लहान मुलांच्या मनात ठसवण्याबद्दल मी बोलतोय.
बाहेरच्या जगात जे काही चालू आहे त्याची माहीती मुलांच्या वयाला अनुसरून त्यांना जरूर द्यावी. पण त्याकडे त्यांना कुठल्या दृष्टीकोनातून बघायला शिकवायचे हे महत्वाचे.

@ फॉर्मचा जातधर्म रकाना,
काल व्हॉटसपग्रूपवर एकाने लिंक दिली त्यानुसार फॉर्मवर जातधर्म लपवता येत नाही. मी ईथली वा तिथली लिंक पाहिली नाही. गूगाळून वेगवेगळ्या लिंक मिळत असतील तर जाणकारच ऊजेड टाकू शकतो.

आरक्षण मिळत असेल तर कोण कशाला ते रकाने मोकळे सोडायला जाईल? ते उद्योग फक्त नॉन-रिझर्व्हेशनवाले करतील. बाकी सगळ्या नुसत्या बोलायच्या गोष्टी आणि मारायच्या गप्पा.

+१००००

माझे एक रुग्ण जे सराफीचा धंदा करतात. काही तरी विवाहविषयक बोलणे निघाले तेंव्हा मी त्यांना म्हणालो कि तुम्ही दैवज्ञ ब्राम्हण लिहिता ना?
त्यावर ते म्हणाले आता दैवज्ञ ब्राम्हण म्हणायचे नाही सोनारच म्हणायचे नाही तर आरक्षण कोण देईल?

ही आजची भयाण वस्तुस्थिती आहे.

शाहरुख खानना फक्त हा प्रश्न विचारा कि त्याच्या मुलाची "सुन्नत" झाली आहे कि नाही?

म्हणजे त्यांचे दाखवायचे आणि खायचे दात एकच आहेत का ते समजेल.

बाकी जगात दोनच प्रकारचे लोक आहेत.

प्रामाणिक आणि दांभिक

यातील पहिल्या गटात प्रवेश करा तेथे तुम्हाला स्पर्धा फारच कमी असेल.

नवीन Submitted by उपाशी बोका on 26 January, 2020 - 22:20
>> उबो तुम्ही सोनार? अच्छा आपण एकाच समाजाचे!!

ऋन्मेष - मुलांशी संवाद साधतोयस हे आवडले, जात धर्म हा काही भेदभावाचा निकष नसावा हे बिंबवणेही मान्य पण सध्याच्या, टोकाच्या भुमिका घ्यायला लागतील अशा, ध्रुवीकरणाच्या काळात, मुलांना जगात फक्त दोन प्रकारची लोकं असतात असं नको होतंस सांगायला.

सलमान खान नं सुध्दा कोर्टात त्याचा धर्म हिंदू- मुसलमान असल्याचा सांगितलं होतं असं वाचलेले आठवते. भारत सरकारनं अश्या नवीन हिंदू-मुसलमान ( थोडक्यात संकरित) धर्माला मान्यता दिली पाहिजे व त्यांच्या अपत्यांना दोन्ही धर्म पाळण्याची मुभा द्यावी. असेच इतर धर्मांचा संकरीत अवतारांना कायदेशीर मान्यता दिली जावी. हेमावैम.

"संकरीत" असण्याची गरज नाही.

हिंदू मुसलमान ख्रिश्चन असला तरी निष्ठा "भारताच्या मातीशी आणि भारताच्या घटनेशी" असली कि पुरेसे आहे.

Religion not stated मध्ये बरेचसें "कम्युनिस्ट" असतात असे एक निरीक्षण आहे.

खरं तर कम्युनिस्ट हा पण एक " अतिशांततावादी धर्म" आहे

> भारतात असे उदाहरण नक्कीच माहीत आहे की आम्ही 96 कुळी मराठा आहोत म्हणून सोनाराकडे सोयरीक करणार नाही, असे अभिमानाने आणि ताठ मानेने सांगणारे, >

आंतरजातीय लग्न म्हणजे भारी आणि स्वजातीय लग्न म्हणजे तुच्छ, काहीतरी चूक असा एकंदर सूर वाटला या लेखाचा. जर ठरवूनच लग्न करायचे आहे (प्रेमविवाह नाही) तर स्वजातीय स्थळ बघण्यात काय चूक आहे? (इतर लोक काय म्हणतील हा मुद्दा नसेल तरीही).
Submitted by उपाशी बोका on 9 January, 2020 - 11:13
इथे तुमचा प्रतिसाद.

बाकी तुम्ही स्वजातीत लग्न केले की आंतरजातीत?
आरक्षण असणारी आंतरजात की खुल्या वर्गातली?
उत्तर द्यायची गरज नाही.
===

> जे आता आरक्षणाच्या लायनीत अभिमानाने उभे आहेत. आरक्षण मिळत असेल तर कोण कशाला ते रकाने मोकळे सोडायला जाईल? ते उद्योग फक्त नॉन-रिझर्व्हेशनवाले करतील. बाकी सगळ्या नुसत्या बोलायच्या गोष्टी आणि मारायच्या गप्पा. >
ज्यांना आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे ते लिहतील जात गरज असेल तिथे.
ज्यांना जातीमुळे आपला काहीच फायदा होत नाहीय अस वाटतं त्यांनी ते रकाने मोकळे ठेवावे आणि आपले आडनाव लावणे बंद करावे.

जगातील एकाचं देशाला सांगितलं
अणुबॉम्ब विनाशकारी आहे सर्व अण्वस्त्र नष्ट जर तो करेल का आणि केले तर त्याचे रक्षण कोण करणार .
जो पर्यंत जगातील सर्व देश अण्वस्त्र नष्ट करत नाहीत तो पर्यंत एकाच देशांनी tas karne chuk aahe.
त्या प्रमाणे एकच धर्मातील लोकांनी हे फॅड बाळगायचे कारण नाही .
नाही तर एक दिवस अस्तित्व च गमावून बसाल.

ऋन्मेष, तुझाविचार चांगला आहे पण बाहेर समाजात वावरताना अगदी 7-8 वर्षांची मुलंही जात 'डिस्कस 'करतात.
मग काय करायचं??
काही काही चे आईबाप तर मुलांसमोर हा विषय अगदी व्यवस्थित चर्चा करतात.
आपण च कसे उच्चजातीचे वगैरे मग तेव्हा कस समजवायचं मुलांना??

तुमचा अन तुमच्या मुलीतला संवाद आणि तो टिव्हीचे चॅनल बदलायचा प्रसंग वाचून गलबलून आले.
आपण माणूस म्हणून मोठे का होतो आणि मोठे माणूस झाले म्हणजे लहानपण, त्या भावना का विसरतो? समाज फार कृर आहे हे नक्की. लहाणपणाच्या कवीमनाला कुस्करून टाकतो.

शाहरुख खानना फक्त हा प्रश्न विचारा कि त्याच्या मुलाची "सुन्नत" झाली आहे कि नाही?
>>>>
सुंता म्हणतात बहुतेक त्याला. हिंदीत की उर्दूत खतना. सुन्नत हा शब्द पैल्यांदा ऐकला. मन्नत ऐकला होता. शाहरूखचा बंगला आहे.

असो, मी स्वत: नास्तिक आहे पण गणपतीच्या आरतीला माझा आवाज सर्वात मोठा असतो. नवरात्रीला नाचायला मी सर्वात पुढे असतो. सत्यनारायणावर विश्वास असण्याचा प्रश्नच नाही पण प्रसादावर तुटून पडतो. बकरी ईदचा कुर्बानीचा पोसलेला बोकड खायला मित्राच्या मित्राकडे पनवेलपर्यंत जाऊन आलोय. स्वत: फटाके वाजवत नाही पण पोरगी लहान आहे तिला वाजवू देतो. नाताळच्या सणाला ख्रिसमस ट्री सजवतो, पोरांना सांता बनवून त्यांचे छान छान फोटो काढतो. गेली तीन वर्षे एका मुस्लिम कुटुंबासोबत रक्षाबंधन साजरा करतो. वर्षाचे ३६५ दिवस सणवार न बघता मांसाहार करतो पण कधी आईने रिक्वेस्ट केली आज नको खाऊस तर तिच्या भावना जपायला नाही खात. आता गेले दोनेक वर्षे आईने अशी रिक्वेस्ट करणे सोडलेय ती गोष्ट वेगळी..... अशी लिस्ट काढत बसलो तर संपणार नाही. सांगायचा मुद्दा हा की धार्मिक प्रथा आणि सण आपण कधी आपल्या आनंदासाठी साजरे करतो, तर कधी दुसरयांच्या आनंदासाठी आणि भावना जपायला पाळतो, तर काहींमागचे शास्त्रीय कारण आपल्याला पटलेले असते.. तर थोडक्यात कोणाला अश्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून जज करू नका. मी स्वत:चा जातधर्म मानत नाही म्हणून आपापल्या जातधर्माचा अभिमान असलेल्यांवर मी लगेच जातीयवादाचा शिक्का मारत नाही. सुरुवातीच्या विरोधानंतर आपल्या जातीचा अभिमान असणारया माझ्या आईवडीलांनी माझ्या लग्नाला परवानगी दिली आणि त्यानंतर आजवर चुकूनही आमच्या घरात जातीचा उल्लेख केला नाही. आज नातवंडांच्या चांगल्यासाठी वा आनंदासाठी दोन्ही घरचे आजीआजोबा श्रद्धेने आणि विश्वासाने एकमेकांच्या प्रथात सहभागी होताहेत. आणि माझा विश्वास असो वा नसो. मी ही त्यात पुढे असतोच. सासूबाई नजर काढतात तेव्हा मुलांना पकडून मीच उभा असतो, माझी आई म्हणते मुलांना या देवदर्शनाला न्यायचे बोललेले तेव्हा मीच गाडी बूक करतो. त्यामुळे कोणी आपल्या मुलांची सुंता करतेय की मुंज करतेय यावरून कोणाबद्दलही कसलाही निष्कर्श काढू नका ईतकेच सांगायचे आहे.

Pages