काही काळानंतर अत्तर उडून जाते

Submitted by सुप्रिया जाधव. on 25 January, 2020 - 00:04

उपचाराविण तडफडते अन मरून जाते
सत्य बिचारे कण्हते-कुढते, सडून जाते

सहचर्याचा धर्म निभवण्यासाठी केवळ !
दोरीसोबत मेण दिव्याचे जळून जाते

हवे-हवेसे मिळून अवघी युगे लोटली
नको-नको ते क्षणाक्षणाला घडून जाते

मौनाने अर्थाचे होते पाणी पाणी !
परिस्थितीच्या चटक्यांनी मन विझून जाते

हेतुपूरस्सर विसरुया चल परस्परांना
व्यवहाराला जग हतबलता म्हणून जाते

नाते अपुले सरून गेल्यावरती पटले
काही काळानंतर अत्तर उडून जाते

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा हा! भारीच!
प्रत्येक ओळ सुरेख आहे.
मस्तच!

अतिशय सुंदर!
<<नाते अपुले सरून गेल्यावरती पटले
काही काळानंतर अत्तर उडून जाते>> जश्या झालेल्या जखमाही भरून जातात पण व्रण मागे राहतो तसं अत्तर उडून गेले पण सुवास मनात रेंगाळत असतो ना?

सर्वच ओळी मस्त. आवडल्या.

नाते अपुले सरून गेल्यावरती पटले
काही काळानंतर अत्तर उडून जाते

या ओळींना मात्र पैकीच्या पैकी मार्क दिले आहेत.

-दिलीप बिरुटे
(मास्तर)

मस्त!!
पहिला सोडून सर्व आवडले Happy>>+१