म्हणींचा डौल !

Submitted by Charudutt Ramti... on 17 January, 2020 - 13:48

चलनी नाण्यांचा आणि नोटांचा शोध लागण्यापूर्वी आणि त्यानंतर ही बरेच कालावधी पर्यंत वस्तुविनिमय पद्धती (barter system) समाजात अस्तित्वात होती. म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण. अर्थशास्त्राप्रमाणेच, भाषाशास्त्रात सुद्धा शब्दांची, म्हणींची आणि वाक्प्रचारांची अशीच सुंदर देवाणघेवाण म्हणजेच ‘शब्दविनिमय’ पद्धती किंवा linguistic barter system सुद्धा पिढ्यानपिढ्या सुरु होती की काय अशी शंका यावी इतपत, “म्हणी व वाक्प्रचारांची” देवाणघेवाण, आवकजावक ( खरंतर रेलचेल ) काही ऐतिहासिक/भौगोलिक कारणांमुळे एकमेकांच्या संपर्कात आलेल्या दोन भाषांमध्ये आढळून येते. आणि मग ह्या देवाण घेवाणीतून आलेले वाक्प्रचार वर्षानुवर्षे एखाद्या भाषेत लोणच्यासारखे इतके छान मुरून जातात की ते त्या भाषेचेच होऊन जातात. इंग्रजी आणि मराठी ह्या दोन भाषांमध्ये अशी बरीच देवाण घेवाण झालेली दिसते. कधीतरी इंग्रजीत ( किंवा मराठीत ) काहीतरी वाचता वाचता चटकन नजर अश्या म्हणींवर स्थिरावते आणि मग पटकन त्या इंग्रजी वाक्प्रचाराच्या अर्थाचाच मराठी वाक्प्रचार ( अगदी शब्दशः भाषांतर केल्यासारखा ) स्मरतो आणि मग दोन्ही भाषांतील वाक्प्रचारांचं हे जुळेपण पाहून मनोमन आश्चर्य आणि गंमत वाटते.

आता भाषांतरातील नियमांनुसार (किंवा अपवादांनुसार) देवाण घेवाण झालेल्या अश्या साठवणीतल्या म्हणी आणि असे वैशिष्ट्यपूर्ण वाक्प्रचार शोधण्या पूर्वी एक दोन साधी आणि सरळ उदाहरणं पाहू. इथे म्हणी आणि वाक्प्रचार हे दोन शब्द सोयीनुसार एकमेकांच्या जागी (interchangeable) रित्या वापरले गेले आहेत, जरी त्या दोन्हींमध्ये व्याकराणाच्या दृष्टिकोनातून ठळक फरक असला, आणि तसं करणं व्याकरणाच्या दृष्टिकोनातून सदोष असलं तरीही. त्यामुळे तसं करण्याबद्दल क्षमस्व!

इंग्रजीत don't judge the book by its cover ! अशी एक सुंदर म्हण आहे. आता ह्या म्हणीचा अर्थ 'एखाद्याच्या बाह्य रुपावरुन त्या ( व्यक्तीच्या , गोष्टीच्या वगैरे खोली ) विषयी अंदाज बांधू नये, ते फसवे ठरू शकतात असा आहे. आता ह्या इंग्रजी म्हणीच्या जवळ जाणारी मराठी म्हण शोधायची म्हटल्यास "दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं" ही मराठी म्हण सापडू शकेल. अर्थ जवळपास समान च आहे ह्या दोन म्हणींचा, पण ह्या दोन म्हणींच्या शब्दांच्या रचने मध्ये मात्र अजिबात साम्य नाही. दोन विभिन्न भाषेमधील स्वतंत्र पणे जन्मलेल्या ह्या दोन वेगवेगळ्या (पण एकाच अर्थाच्या) म्हणी आहेत. अशी असंख्य उदाहरणं मराठी आणि इंग्रजी भाषेत मिळू शकतील. इंग्रजी-मराठीच काय, कोणत्याही दोन भाषांमध्ये एकाच अर्थाच्या म्हणी सापडू शकतील. म्हणजेच "मुल्ला की दौड मस्जिद तक" ह्याच अर्थाची मराठीत "सरड्याची धाव कुंपणा" पर्यंत अशी मराठी म्हण आहे. किंवा “अंधो मे काना राजा” ह्या म्हणीस “वासरात लंगडी गाय शहाणी” ही म्हण उपलब्ध आहे. पण अर्थ समान असला तरी म्हणींच्या शब्दरचने मध्ये साधर्म्य अजिबातच नाही. कारण, वर म्हंटल्या प्रमाणे ह्या दोन म्हणींचा जन्म त्या त्या मूळ भाषेतील आहे. अजून एक उदाहरण. इंग्रजीतील don't count your chickens before they hatch ह्या म्हणीसाठी मराठीत 'बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी' किंवा हिंदीत "दिल्ली अभि दूर है|" अश्या ह्या आशयाच्या जवळ जाणारी म्हण आहे. हिंदीतील "दूध का जला छास भी फुक फुक पीए" ह्या म्हणीला "दुधानं तोंड पोळलं की माणूस ताकसुद्धा फुंकून पितो" अशी शब्दशः भाषांतरित म्हण आहे. आणि ह्या मराठी आणि हिंदी म्हणीच्याच अर्थाची इंग्रजीत once bitten twice shy ही जवळ पास सामान अर्थ असलेली पण शब्दभिन्नता असलेली एक म्हण आहे. जरी ह्या दोन्ही म्हणींचा अर्थ जरी तंतोतंत सामान नसला, तरी अन्वयार्थ बहुतांश सारखाच आहे. पण परत शब्दांची रचना ( म्हणीत वापरलेली रूपके ) मात्र पूर्णतः विभिन्न आहेत.

पण काही म्हणी मात्र मराठी आणि इंग्रजीत अश्या आहेत की त्या एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जश्या च्या तश्या भाषांतरित झाल्यासारख्या वाटतात. आता संशोधनाचा (आणि आवड असलेल्यांना ‘वादाचा’) मुद्दा असा होऊ शकेल की मूळ म्हण कोणत्या भाषेतील? आणि रूपांतरित म्हण कोणत्या भाषेतील? एकंदर म्हणीचा किंवा वाक्प्रचारांचा उगम किंवा जन्म हा त्या भाषेत होतो तो मुळात त्या भाषिकांच्या संस्कृतीतून. म्हणजे 'तांदूळ' हा आपल्या संस्कृतीतील असल्यामुळे जर म्हणीत तांदूळ हा शब्द म्हणीत असेल ( धुतल्या तांदळासारखा ) तर ती म्हण मूळची आपली असं म्हणता येईल. तर इंग्रजीत egg हा त्यांच्या संस्कृतीचा भाग असल्यामुळे don't put all your eggs in one basket ही म्हण मुळात त्यांचीच असणार असं मानायला हरकत नाही. सहज म्हणूनअश्या म्हणी आणि वाक्प्रचार शोधण्या साठी सहज बसलो आणि वाटलं होतं त्यापेक्षा बरीच मोठी यादी तयार झाली.

आता नमनालाच घडाभर तेल गेलंय त्यामुळे सरळ विषयाला हात घालतो. इकडे मराठी 'चोरांच्या मनात चांदणं' पडु शकतं तसं ते इंग्लंडमधल्या दरोडे खोरांच्या मनातही ‘moon light in the robber’s mind’ पडू शकतं. अश्या चोऱ्या माऱ्या करणाऱ्या ‘मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची? किंवा साहेबी भाषेत ‘who will bell the cat?. तसंच Calm before storm ह्या इंग्रजी वाक्प्रचाराचं मराठी रूपांतर ‘वादळापूर्वीची शांतता’ असं झालं तर 'पेल्यातल्या वादळाचं' storm in the teacup झालं. एव्हडंच काय You can lead a horse to water, but you can’t make him drink म्हणजेच "आपण घोड्याला पाण्यापर्यंत..." अशी इंग्रजीत आणि मराठीत दोन्हीकडे शब्दशः भाषांतरित झालेली म्हण आहे. आपण मराठीत जसे एका दगडात दोन पक्षी मारतो तसंच we can also kill two birds with one stone in English. त्यांच्याकडील ray of hope आशेचे किरण असोत किंवा आपल्या कडचे हस्तिदंती मनोरे तिकडे जाऊन ivory towers बनलेले असोत! इकडे जसे काही जण “मुख्य प्रवाहा”तून बाहेर फेकले गेले तसेच तिकडे सुद्धा out of main streams ही झाले! आपल्या भाषेत जसा सिंहाचा वाटा , तसाच तिकडेही Lion's share! आता ही झाली काही उदाहरणं एका भाषेतून दुसऱ्या भाषेत त्यांचा अर्थ न बदलता जशी च्या तशी रूपांतरित झालेली.

आता मूळ वाक्प्रचार कोणत्या भाषेतील. त्याला वरील संस्कृतीची litmus test उपलब्ध आहे किंवा मग सरळ ढोबळ मानाने, मराठी साहित्य किती प्रमाणात भाषांतरित होऊन इंग्रजीत आलंय आणि त्या अनुषंगाने इंग्रजी साहित्याचं मराठीत किती प्रमाणात भाषांतर झालंय, हे प्रमाण पाहता की ह्या म्हणी/वाक्प्रचार मूळ इंग्रजीतून मराठीत आलेले असाव्यात, बऱ्याच वेळेस अशी शक्यता तुलनेने अधिक वाटते. इथे मराठी भाषेच्या सामर्थ्या विषयी आणि मातृभाषेच्या मूळ भाषिक वैभवा विषयी अजिबात दुमत नाही.

काही म्हणी आणि वाक्प्रचार हे जसे च्या तसे भाषांतरित झाले पण काही मात्र थोडे सुधारित पद्धतीने ह्या भाषेतून त्या भाषेत अवतरले. कारण 'पेपर टायगर्स' चे कागदी ‘वाघ’ न होता त्यांचे कागदी ‘घोडे’ कसे काय झाले ते प्रथम हा वाक्प्रचार इंग्रजीतुन मराठीत (किंवा मराठीतून इंग्रजीत) भाषांतरित करणाऱ्या प्राणिमात्रालाच ठाऊक. कुणाच्या तरी जखमेवर मीठ चोळतो . तर इंग्रजीत ते लोक ह्याला adding insult to an injury असं म्हणतात. आता इथे 'जखम' म्हणजेच 'injury' जशीच्या जशी एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आली पण आपल्या 'मिठा'च्या खारट रूपका ऐवजी त्यांनी सरळ सरळ insult हा शब्द प्रयोग केलाआपण मराठी मंडळी एखाद्या गोष्टीकडे 'काणा डोळा' म्हणजेच जाणीव पूर्वक दुर्लक्ष करतो करतो तसे इंग्रज लोकही कधी कधी एखाद्या गोष्टीकडे 'blind eye' करतात किंवा त्यापेक्षाही अधिक ते deaf ear जास्त करतात. इथे काणा (तिरळा) चा आंधळा (blind) कसा काय झाला किंवा कमी दिसणाऱ्या डोळ्याचा कमी ऐकू येणार कान (deaf ear) कसा काय झाला माहित नाही पण वाक्प्रचाराचा मतितार्थ आणि शब्दाचं भाषांतर जवळपास राहिलंआहे. किंवा blowing his own trumpet चा आपलाच ढोल वाजवणे झालं. म्हणजे trumpet ह्या पितळी बिगुला सारख्या फुंकून वाजवण्याच्या वाद्याचं ह्या वाक्प्रचाराचं रूपांतर कुणीतरी एकदम स्वदेशी प्रद्धतीने म्हणजेच “स्वतःच स्वतःचा ढोल बडवणे” असा बेमालूम पणे केलंय. आता अजून एक थोडंसं वेगळं उदाहरण पितळ (trumpet) वरून आठवलं! आपल्याकडे खोटारड्यांचं पितळ उघडं पडतं. आपल्याकडे उघडं पडतं ते पितळ म्हणजे एखादया पितळी वस्तूवर सोन्याचा मुलामा देऊन एखादी वस्तू सोन्याची आहे असं फसवलं आणि काही दिवसांनी सोन्याचा मुलामा उडून जाऊन जे ‘उघडं’ पडतं ते पितळ! आपल्या कडे ह्या उघड्या पडणाऱ्या पितळेच्या बरोब्बर उलट ‘म्हण’ (खरंतर वाक्प्रचार ) आहे तिकडे इंग्रजीत. ते लोक एखाद्या गोष्टीला 'galvanize' केलं असं म्हणतात. galvanizing चा शब्दशः अर्थ म्हणजे म्हणजे लोखंडाला जस्ताच्या पाण्याचा ( गॅल्व्हानो म्हणजे लॅटिन भाषेत आपण ज्याला जस्त म्हणतो तो धातू ) मुलामा देऊन लोखंडाची झळाळी आणि त्याचा गंज न लागू देण्याचा गुणधर्म वाढवणे. तर एखादी गोष्ट (कन्सेप्ट) जर जुनी झाली असेल तर तिला galvanize केले असा इंग्रजीत वाक्प्रचार आहे. म्हणजे मुलामा ( मग तो पितळे वर सोन्याचा असो वा लोखंडावर जस्ताचा ) ह्या रासायनिक प्रक्रियेकर दोन भाषेत अत्यंत भिन्न पद्धतीच्या वाक्प्रचाराचं चलन झालेलं आहे. .

खरंतर म्हणींचं आणि वाक्प्रचारांचं विश्वच अफाट आहे. जशी प्रत्येक पाच मैलांनंतर मराठी भाषेची ( आणि सर्वंच भाषांची ) आणि बोलीची ( dialect ) एक नवीनच जुळी बहीण सापडते असं म्हणतात तसंच म्हणींच सुद्धा आहे. प्रत्येक गांवागांवात नवीन नवीन म्हणी ऐकायला मिळतात, त्यां त्यां गांवातील संस्कृतीनुसार. एवढंच काय? मी परवा सहज अलीकडच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणाऱ्या मराठी म्हणी वाचल्या , तर आम्हाला तीस पस्तीस वर्षांपूर्वी मराठीत बालभारतीच्या पुस्तकात (आणि नापास झालो त्या scholarship परीक्षेस) होत्या त्या पेक्षा बऱ्याच नवीन म्हणी आणि वाक्प्रचार वाचायला मिळाले आणि एकंदरीतच गंमत वाटली. म्हणजेच दोन गांवातील भौगोलिक अंतरावर जश्या म्हणी बदलतात तश्या त्या 'कालानुरूपही' बदलतात आणि त्यात कदाचित रोजच्या रोज नवीन भर पडत असेल आणि भाषा कालच्या पेक्षा आज अजूनच समृद्ध होत असेल. म्हणजे तेल गेले तूप गेले हाती राहिले धुपाटणे, कालबाह्य होऊन "रेंज पण गेली आणि बॅटरी पण डाउन, काय उपयोग निस्तं डब्बल सिमकार्ड लावून" अशी एखादी म्हण कोल्हापूरच्या वस्तीत ऐकायला मिळाली आणि ती तेथील भाषिकांनी प्रचलित केली तर ते मराठी भाषेच्या कालानुरूप बदलणाऱ्या स्वभावधर्मानुसार अत्यंत योग्य ठरेल.

खरंतर मी मराठी भाषेचा प्रियकर असलो तरी तिचा अभ्यासक मात्र नाही. त्यामुळं ह्या विषयी एवढंच लिहिणं तूर्तास पुरे. काय आहे, विषयांची आवड असली तरी एखाद्या विषयी फारशी सखोल माहिती नसताना उगाच आपलं "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" बरं नव्हे!

चारुदत्त रामतीर्थकर
१७ जाने. २०२० (पुणे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच !
* खरंतर म्हणींचं आणि वाक्प्रचारांचं विश्वच अफाट आहे.* - +1 . नुसतं अफाटच नाहीं तर खूप लोभस पण !

'बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी' किंवा हिंदीत "
गुजराथीत - छांछ छागोळे भैंस भागोळे घरमा धमाधम.

म्हणजे म्हैस आणलीही नाहीये आणि ताक कोण करणार यावरुन घरात वादावादी चालली आहे.

लेख आवडल्याच्या प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे मनापासून आभार !

@योकु :- अरे व्वा ! हा धागा मी पहिलाच नव्हता. मस्तच खजाना आहे म्हणींचा.

@ च्रप्स :-अभ्यास वगैरे नाही मुळीच ! हा पण आवड निश्चित आहे. कदाचित आवड असल्यामुळे नकळत अभ्यास/मनन होत असेल भाषेचं.

@भाऊ :- अफाट आणि "लोभस" तुमच्या मताशी १००% सहमत !

छान लेख! योकुंनी दिलेली लिंक वाचावीच लागेल.
मराठी आणि इंग्रजीप्रमाणेच मराठी आणि भारतातील इतर भाषांमध्ये सुध्दा जवळपास भाषांतरीत केलेल्या किंवा अर्थाच्या जवळ जाणार्‍या अनेक म्हणी असतील. ज्यांना कोणाला अश्या म्हणी माहिती असतील तर त्यांनी इथे जरूर शेअर कराव्यात. मला एक हिंदी म्हण आठवली...
हिंदीत नाच ना जाने आंगन तेढा. मराठीत नाचता येईना अंगण वाकडे.

लेख अतिशय आवडला. आज अनेक दिवसांनी मायबोलीवर आले आणि हा लेख वाचायला मिळाला. Happy
योकु ने दिलेली लिन्क सर्वांनी आवर्जून वाचावी, अतिशय धमाल आहे.

योकु ने दिलेली लिन्क सर्वांनी आवर्जून वाचावी, अतिशय धमाल आहे.
नवीन Submitted by दक्षिणा on 21 January, 2020 - 06:05
>>> त्यातील दक्षिणा जी यांच्या म्हणी इतक्या जबरदस्त आहेत की बस. मला तुमचा म्हणींचा संग्रह खूप आवडला दक्षिणा जी.