पणती

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 17 January, 2020 - 11:18

पणती
**

माझी मिटू दे पणती
बहु कीटकांची दाटी
किती काजळे कोनाडा
मंद क्षीणश्या या वाती॥ १ ॥

वास तेलाचा जुनाट
थर दाटे हिरवट
कोणा गरज तयाची
काडी जातसे फुकट॥ २॥

असे पुराण मातीची
एका लाल दमडीची
चार दिसाच्या काळाची
खुण दिवाळ सणाची॥ ३॥

खूप मिरवली कुठे
आता तया जीव विटे
मारा फुंकर हळूच
जडो अंधाराचे नाते ॥ ४॥

तेल नको उभारीचे
जन्म वाढत्या सुताचे
वेडा विक्रांत उगाच
ओझे वाहतो फुकाचे॥ ५॥

झाली अवघी ती सेवा
बळ सरू आले देवा
तव स्वरुपी दयाळा
मज मिळावा विसावा ॥ ६॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

Group content visibility: 
Use group defaults

खुप सुंदर!!
कविता वाचताना मी एखादी ओवी गुणगुणतीये अस वाटल.