अनपेक्षित

Submitted by सोहनी सोहनी on 2 January, 2020 - 03:14

अनपेक्षित

मंद वाऱ्याची खेळकर झुळूक संधीप्रकाशात सोनकेशरी दिसणाऱ्या तिच्या केसांना हलकेच झुलवत होती, शहरातून आलेली आजीची नात आजीच्या नकळत येऊन तळ्यावर पाण्यात पाय टाकून बसली होती. विचारांत गढलेल्या तिच्या डोळ्यांत पाण्याचे प्रतिबिंब खऱ्याखुऱ्या समोरच्या पाण्यापेक्षा जास्त सुंदर आणि गहिरं दिसत होतं. एका क्षणात गोंधळलेला तर दुसऱ्याच क्षणी काहीतरी गवसल्या सारखे भाव तिच्या चेहऱ्यावर लपंडाव खेळत होते.

स्वच्छ पाण्याने भरलेलं ते तलाव, चहूबाजूस पायऱ्या, आत पाण्याच्या कडेला पाण्यातील झाडे, थोडे पुढे चार पाच कमळाची झाडं, आजूबाजूची गर्द हिरवाई अश्या मोहक वातावरणात काहीसं गूढ शोधणारी तिची नजर आपल्याकडे कुणीतरी केव्हापासून पाहत आहे जे जाणवून देखील दुर्लक्ष करून पुन्हा आपल्या विचारांत हरवली.

विचित्र आवाजात पाण्यातून येणाऱ्या बुडबुड्यांनी तिथेच कपडे धुण्यासाठी आलेल्या मुलीचे लक्ष वेधून घेतलं. काहीतरी वेगळं होतं खरं तिथे. एखादा मोठा मासा, माजलेला पणशीला, दिवडा कि ती. . . .
तिचा नुसता विचार मनात आला तसा त्या थंड वातावरणात तिला दरदरून घाम फुटला. उरलेले कपडे घाई गडबडीत धुवून एकदाचं इथून निघायचं म्हणून भीतीने ती काम उरकत होती."कसली दुर्बुद्धी सुचली आणि आईचं ऐकून इथे आली, काकू पुढे आली होती म्हणून आपण आलो तर ती गेली शेतावर, कधी येईल देव जाणो" पश्चातापाने ती स्वतःवरच रागावली.

मनावर भीतीने केव्हाच झडप घातली होती, ठरवून देखील ती मनातील त्या विचारांना दूर सारू शकत नव्हती.
तिचे विचार, तिच्या विषयी ऐकलेले भयानक किस्से आठवून ती अधिकच घाबरली आणि तो लहानपणीचा प्रसंग. . . नको नको, तो विचार देखील नको.

शांत वातावरणात पसरत चाललेली गूढता तिला जाणवू लागली, संधिप्रकाश हळूहळू नाहीसा होऊन त्यात अंधार आपलं अस्तित्व निर्माण करतोय असं तिला भासू लागलं. मागून झाडांची विचित्र सळसळ होऊ लागली, ती भीतीने जवळ जवळ कापू लागली. पूर्ण तलावावर ती आज एकटीच होती, आजूबाजूला कुणी नव्हतं, आणि आज जर तिला आपण सापडलो तर . . . ह्या एका विचाराने ती हातातलं काम सोडून थरथरू लागली.
मरुदेत कपडे वैगेरे, जिवाच्या भीतीने तीने सगळे कपडे आणलेल्या बादलीत भरायला घेतले. त्या नादात मागे होणाऱ्या हालचालींकडे तिचे दुर्लक्ष झाले.

"दोन लहान नऊ दहा वर्षाच्या जुळ्या मुली ह्याच तलावाच्या पायर्यांवर बसून खेळत होत्या, बाजूच्यात शेतात आई वांग्यांच्या रोपांना पाणी देण्याचं काम करत होती. मधेच बांधावरून डोकावून पाहत होती. "मने पाणी खोल आहे ग, पाण्याच्या जवळ जाऊ नकोस" चार पाच वेळा तिने अवखळ मनीच्या नावाने आवाज देऊन दोघींना पाण्यापासून दूर राहायची सूचना दिली, आणि काम लवकर आटपावं म्हणून भरभर काम करत राहिली.
तळ्याचा बांध उंच असल्याने तिला मुली खेळताना दिसत नव्हत्या.
अवखळ मनीने राणीच्या डोक्यात पुन्हा तोच किडा सोडला. बघ आई तुझ्यावर प्रेम करतच नाही, तू इथे असून देखील ती मलाच सांभाळून राहायला सांगते तुला नाही, ती माझ्या एकटीवरच प्रेम करते. . .

अवखळ असल्याने आई सतत मनीच्या नावाने ओरडत असे, तिला सूचना देत असे पण ते ओरडणं मनावर न घेता, त्याचा उलट अर्थ तिच्या पेक्षा शांत असलेल्या राणीच्या डोक्यात घुसवून तिला चिडवायचं, भडकवायचं काम मनी नेहमी करी.
भडकलेल्या राणीने मनीला मारायची सुरुवात केली, मारामारी करता करता त्या दोघी कधी पाण्याजवळ पोहोचल्या त्यांना कळलं देखील नाही.
मनी आपला हट्ट सोडत नव्हती आणि राणी आपला राग. राणीने रागात मनीला पाण्यात ढकललं, तोल जाऊन ती खोल पाण्यात पडली, पाण्यात पडलेल्या मनीकडे एकवेळहि न पाहता राणी पळत जाऊन आईला तक्रार करू लागली,
"तुझं माझ्यावर पण प्रेम आहे ना??
ती मनी बघ नेहमी मला चिडवते, हे बघ मारलं मला. तू जाऊन सांग तिला तू माझ्यावर देखील प्रेम करतेस."
नेहमीचीच राणीची तक्रार ऐकून आई पाण्याचा पाईप दुसऱ्या पाटात ठेवून मनीकडे आली तर ती कुठेच नव्हती, राणीला विचारलं तर घाबरून ती काहीच बोलली नाही, आईने वेड्या सारखं शोधलं पण ती नव्हतीच तिथे.
बाजूच्या पाण्यातून बूडबूड करत चार पाच बुडबुडे वर येऊन विरून गेले. आई धावत जाऊन पाण्यात शोधाशोध करू लागली, पाणी पुढे खोल होतं आणि खाली चिखल देखील होतं, आरडा ओरडकरून तिने दोन तीन पुरुष माणसांना बोलावलं, त्यांनी मनीला पाण्यात शोधलं, अर्ध्या तासाने चिखलात तिचा हात कोणाला तरी लागला आणि मृत मनीला बाहेर काढलं गेलं.
लहानपणीचा चुकून झालेला हा गुन्हा राणीने कधीच कोणाला सांगितलं नाही, ती एकटी ह्या बाजूला कधीच फिरकत नसे.
तिने काही अफवा देखील ऐकल्या होत्या कि रात्री मनी दिसते, आई फक्त माझ्यावर प्रेम करते असं काही बडबडत असते, चिखलाने माखलेली असते, कुडकुडत वैगेरे"

बादली भरली आणि ती उचलून पळणार तोच तिच्या अगदी मागे तिला कोणाच्या तरी कुडकुडण्याचा, थंडीने दात वाजण्याचा आवाज आला. तिने सर्रकन मागे वळून पाहिलं तिथे कुणीच नव्हतं. खरीखुरी भीती काय असते ती ह्या क्षणाला ती अनुभवत होती. इतकी घाबरली होती कि तिला ना पुढे जायचं सुचत होतं ना कोणाला आवाज द्यायचं.
घाबरून वाढलेले श्वास सांभाळत तिने बादली उचलायला घेतली पण बादली जागेवर नव्हतीच. बादली पाण्यात पडली होती, एकेक करून कपडे पाण्यात बुडत होते.
बदलाकडे आश्चर्याने पाहत ती सगळीकडे भीतीने पाहू लागली, पण कुणीच नव्हतं तिथे, इतकी शांतता कि तिला तिच्या स्वतःच्या श्वासांचा आवाज देखील भीतीदायक वाटत होता.
तिने स्वतःला सावरून पाण्यात एक एक पाय टाकत बादली पकडली, पडलेले कपडे गोळा करत ती चांगल्या गुढग्यापेक्षा जास्त खोल पाण्यात गेली होती.
बादली धरून मागे यायला वळली तोच तिच्या अगदी नाकासमोर ती डोळ्यात डोळे घालून रागाने गुरगुरत उभी होती.

नखशिखांत चिखलाने बरबडलेली, नाकातोंडातून चिखलच चिखल बाहेर होतं तिच्या, तिच्याकडे पाहून ती कुत्सित हसत होती, " आता कशी सापडलीस हा, किती पळणार होतीस माझ्यापासून लांब हा, आता तुझी पारी" अशी तिची नजर, त्या नजरेत राणीला मृत्यू दिसत होता, फक्त शुद्ध मृत्यू. समोर मनीला पाहून स्वतःला वाचवायला ती खोल पाण्यात पळू लागली.
खोल खूप खोल.
चिखलात पाय रुतले गेले, पाणी नका तोंडात गेलं, खालून कुणीतरी जोरात पाय खेचला, नका तोंडात चिखल भरलं, श्वास बंद व्हायला लागले.
चिखलात समोर बसलेली मनी " राणीकडे पाहून मंद हसत होती "

रात्री एखादा माणूस एकटा तिथून गेला कि आता तिथे एक नाही तर दोन दोन मुली एकमेकींशी भांडताना दिसतात " आईचं तुझ्यावर नाही तर माझ्यावर जास्त प्रेम होतं" असं काहीतरी बडबडत असतात आणि त्यांचा अवतार पाहून पाहणारा धडकी भरून कायमयचा कोसळतोच कोसळतो.

पेनाची कॅप लावून केव्हापासून विचारांत हरवलेल्या तिच्या चेहऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या लपंडावात एक दीर्घ समाधानाच्या हास्याने बाजी मारली. आजीने लहानपणी सांगितलेल्या ह्या तळ्यावरच्या कथेला आज मोठेपणी तिने आपल्या शब्दांत कैद केलं होतं.

कथा एकवार वाचून ती स्वतःवरच हसली. काय काय लोकं अफवा पसरवत बसतात, भूत वैगेरे असतात ती निव्वळ कथेत रंगवण्यासाठी, वाचून लोकांना घाबरवण्यासाठी, अंधश्रद्धाळू कुठचे. वही पेन उचलून तिने पायांत सॅंडल सरकवली, केव्हापासून कुणीतरी आपल्याकडे पाहत आहे असं पुन्हा जाणवलं तिने चारही बाजूला शोधलं काही नव्हतं कुणी नव्हतं, परत जायला मागे वळली आणि आपल्या अगदीच मागच्या पायरीवर बसलेल्या आपल्याकडे एकटक पाहणाऱ्या त्यांना पाहून थरथरत्या, कापत्या मनात भीतीची एक सणक उठली जी हृदयापासून मेंदूपर्यंत पोहोचायला ती पेन वही आणि ती पाण्यात कोसळली, कायमची. . .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जबरदस्त लिहिलीये कथा!!

कथेच शिर्षक मात्र वेगळ असु शकत..हे माझ वैयक्तिक मत. पुलेशु!