हे सर्व आई तुझ्यामुळे

Submitted by दत्तप्रसन्न on 31 December, 2019 - 19:39

बऱ्याच दिवसां पासूनचे
सांगायचे होते मनातले
सौख्याचे क्षण जे लाभले
हे सर्व आई तुझ्यामुळे

असता पोटात तुझ्या
अनामिक भीतीने होते ग्रासले
देणार जन्म का मला
का मुलगी म्ह्णून संपायचे

कळू लागले हळूहळू
आईचे हृदय आहे बरे
काळजी घेते आहे आपली
स्वतःस विसरुनी खरे

जे जे वाटे मला हवे
तुला कळले कसे बरे
न मागताच काही कधी
डोहाळे सर्व पुरवले

नऊ महिने नऊ दिवस
प्राणाहुनी तुझ्या सांभाळले
जपले मला रात्रंदिवस कि
कोणीच नसते असे केले

येऊनि ठेपली जन्माची घडी ती
किती तुला सतावले
बघण्यास मला आतुर तू
मरणयातना माझ्यामुळे

सोसून त्याही हंसूनि तू
ओढुनी जवळ घेतले
पाहीले डोळ्यात तुझ्या तेंव्हा
प्रेम करुणा आणि आसवे

पटली ओळख आपली
जन्मोजन्मीची खरी
रडते उगाच का कोणी
पहिल्याच भेटी कोणासाठी

जागरणं आता सुरु झाली
दिवसाही तुला झोप नाही
दुपटी पांघरूण वाळविता
होऊ लागली दमछाक भारी

आनंदाने सारे करिसी
तक्रार तुझी कसलीच नाही
माझी भूक माझी झोप
ह्यातच तुझे सुख पाही

नवी गाणी नव्या गोष्टी
नवी खेळणी माझ्यासाठी
निंबोणीच्या झाडाखाली
अंगाई ती सुरेल रोजची

होऊ लागले जशी मोठी
हात देउनी तुझ्या हाती
हट्ट सारे पुरवुनी माझे
माझी स्वप्ने तूच पाहसी

आजारपणात माझ्या
चित्ता तुझ्या स्थेर्य नाही
आजूबाजूच्या देवळात कितीदा
बोललीस गं नवस काही

दुःख सारे घाल माझे पदरी
बरी होवूदेत माझी चिमणी
बसुनी उशाशी माझ्या
रडुनी सारी रात्र काढली

दिलेस शिक्षण संस्कारही
शिकविलेस सर्व काही
केलेस सालंकृत कन्यादान
छानसा सोहळा करुनि

काळजाचा तुकडा तुझ्या
देउनी टाकलास जरी
दाटला गळा तुझा
सासरी मी निघता परी

तुला दिल्या मी याही वेळी
वेदनेच्या कळा
म्हणसी नांदा सौख्यभरे
आयुष्य माझे सारे मिळो तुला

मातृत्व मलाही लाभले
म्हणुनी सारे कळों आले
सांगायचे राहुनी गेले होते
आज तुला ते अर्पियलें

Group content visibility: 
Use group defaults