तुझीच आठवत प्रीत होतो

Submitted by निशिकांत on 26 December, 2019 - 23:03

उबार्‍यात मी पंखाखाली
थंड चांदण्यास पीत होतो
विरहकाळच्या अवसेला मी
तुझीच आठवत प्रीत होतो

लपाछपीचा खेळ खेळता
तुझी मस्करी करीत होतो
व्यर्थ शोधले, मी तर लपलो
गालावरच्या खळीत होतो

ग्रिष्म जसा तुज छळू लागला
मी पडलो काळजीत होतो
तुला गारवा देंण्यासाठी
आलो श्रावणसरीत होतो

मला उदासी कधी न शिवली
समीप तुझिया खुशीत होतो
रोज नव्याने माळलेस त्या
गजर्‍याच्या टवटवीत होतो

तुला वाटले तुझ्याविना मी
विरहाच्या तावडीत होतो
कयास चुकला तुझा, मी तुझ्या
स्वप्नांच्या पालखीत होतो

गुदमरलो मी तुझ्या जरासा
आठवणींच्या धुळीत होतो
कुणात रमलो?, मी तर वेडे
तुजवर कविता लिहीत होतो

शमा पाहिली तेवत असता
म्हणून मी मैफिलीत होतो
परवान्यासम जळण्यासाठी
आस मनी जागवीत होतो

कधी जाहले प्लॅटोनिक लव्ह?
शोधत मी डायरीत होतो
तू चौथीच्या बोर्डाला अन्
मजनू मी सातवीत होतो

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users