तो एक तास

Submitted by माऊमैया on 25 December, 2019 - 02:24

एवढ्या गुलाबी थंडीत, झोप पूर्ण झाली नाही, हे कळत असूनही उठावंच लागतं. आणि सगळं भराभर आवरून घ्यावं लागतं. कारण लगेच ' तो एक तास ' सुरु होतो. नेहमीच येतो तसा. पण हल्ली एक महिनाभर, तो मला अगदी नकोसा वाटतो... आणि तिला तर अजिबातच आवडत नसेल 'तो'. असं का वागते ती सध्या, काही कळतंच नाही; आणि काय उपाय करावा, तेही समजत नाहीये.

ती, म्हणजे यावर्षी बालवाडीत जायला लागलेली माझी लाडुली लेक. आणि मी, तिची आई... तिच्यामुळे आईपणाच्या एकेक पायऱ्या चढत शिकणारी...

रोज सकाळी घाई-गडबड करून कसंबसं सगळं उरकून, तिचा डबा- बाटली भरून , रुममध्ये प्रवेश केला, की सुरू होतो.... तो एक तास...
तिला उठवतानाच दोघींनाही माहित असतं, की तिला अजिबातच शाळेत जायची इच्छा नाहीये. पण मागच्या महिन्यात बरेच दिवस सुट्टी झाल्यामुळे, आता तिने रोज शाळेत जावं, अशी माझी इच्छा ( म्हणजे खरंतर हट्टच) असते. मग तिचे बहाणे सुरू होतात, " अजून झोप येतेय, झोपायचंय. " मग शक्यतो तिच्या कलाने घेऊन, तिला न रडवता ( आणि माझा आवाज प्रेमळ ठेवून ), रुमच्या बाहेर आणणं, ही माझी ( म्हणजे माझ्या सहनशक्तीची ) पहिली कसोटी.

बाहेर आलं की, दात घासायची इच्छाच नसते. मग पेस्टच आवडत नाही, ब्रशच आवडत नाही, इथे नाही उभी राहणार, कडेवर उचलून घे; इत्यादी विविध कारणं येतात. ब्रश तोंडात जाण्यासाठी, खूप विनंत्या, दातांच्या टीचरकडे (डेन्टिस्ट) नेण्याची भीती हे प्रकार झाले की, पुढचा कार्यक्रम व्यवस्थित होतो. कारण मुळातच दात घासणं, हे तिच्या आवडीचं काम. आणि नंतर चूळ भरणे, हे सगळ्यात नावडतं काम. मग इथून माझा चढा सूर लागयला सुरुवात होते, कारण घड्याळाचा काटा पण माझं ऐकत नसतो. कसंबसं समजावून, ओरडून जबरदस्तीने, चूळ भरून होते.

इथपर्यंत वेळ हातातून निसटून चाललेली असते. आणि माझ्या सहनशीलतेची मर्यादा संपत येते. तिची आंघोळ हा आमच्या युद्धातला शेवटचा टप्पा. ( हो, युद्धच. कारण प्रेमाने परिस्थिती हाताळण्यासाठी वेळच उरलेला नसतो माझ्याकडे. आणि आमच्या दोघींच्या कर्कश आवाजांमुळे घराचे रणांगण होते. एव्हाना शेजारच्या चार घरांत, ती शाळेत निघालीय, हे समजलेलं असतं. ) तिला माहिती असतं, एकदा आंघोळ झाली की मी तिला शाळेत पाठवणारच. ती पूर्ण असहकार पुकारते. मग मात्र माझ्याकडे पर्यायच नसतो. तिला जबरदस्तीने उचलून बाथरूममध्ये नेते आणि आंघोळ घालते. त्यावेळेस ती प्रचंड रडते, किंचाळते, हात-पाय झटकते, मला मारते. मला अगदी 'पत्थरदिल', निष्ठूर आई व्हावं लागतं तेव्हा.

एवढा गोंधळ झाला की दोघीही दमतो जरा. शेवटची दहा-पंधरा मिनिटं राहिलेली असतात. मग तिला टॉवेल गुंडाळून रुममध्ये नेलं की आमच्या युद्धोत्तर वाटाघाटी सुरू होतात. तिला हवा तो फ्रॉक घालणे ( माझ्या सुदैवाने यंदा तिला गणवेश नाही ), हातात बांगड्या, केसांना क्लिप किंवा एक किंवा दोन पोनी ( छोटी नारळाची झाडं ), हे सगळं ती म्हणेल तस्सं. कधीकधी मोबाईलसुद्धा मिळतो. मग ती न रडता तिची तयारी करु देते. मग तिला पटापट तयार करून चपाती-भाजी भरवून, शाळेच्या गाडीत बसवणे; हा या कार्यक्रमाचा शेवट.

पण या शेवटाकडे येईपर्यंत उशीर झाला आणि खायच्या आधीच गाडी आली, तर तिला उपाशी कशी पाठवणार म्हणून २-३ वेळा, तिच्या पप्पांना सांगितलं तिला शाळेत सोडायला.पप्पा सोडणार म्हटलं की, कळी खुलणार लगेच लाडूची. मग हसत हसत शाळेत जाणार. पण सलग २ दिवस पप्पांनी सोडल्यावर, तिसऱ्या दिवशी शाळेच्या गाडीत बसायला तयारच नाही बाईसाहेब. अक्षरशः ढकलावी लागली तिला गाडीत. २ दिवस तोच हट्ट केला तिने. नंतर नेहमीप्रमाणे जायला लागली.

पण अजूनही रोज सकाळी 'तो एक तास' असतोच. आधी चांगली स्वतःहून शाळेत जाणारी मुलगी अचानक एवढी हट्टी कशी झाली, ते मला कळेना. कारण विचारलं तर म्हणायची, " टीचर ओरडतात." आता स्वभाव मुळातच एवढा नटखट आणि द्वाड आहे की, एकदा कधीतरी ओरडल्या, तरी रोजच ओरडतात असं सांगू शकते ती. मग एकदा एका प्रेमळ संवादातून मी खरं कारण शोधलं आणि ते होतं, "कंटाळा"..... त्याक्षणी खरंच काही उत्तर नव्हतं माझ्याकडे यावर.

रोज सकाळी 'तो एक तास' संपला की, माझं ते स्वतःलाच न पटणारं आक्रमक रुप आठवून मी विचार करत राहते. तिच्यावर एवढं ओरडायला आणि चिडायला मला आवडत नाही खरंतर. ती रडत असताना, माझा हट्ट पूर्ण केलाच पाहिजे, अशी मी तिची जबरदस्तीने तयारी करत असते, तेव्हा खूप वाईट वाटतं. कधी वाटतं, खरंच असं वागायची गरज आहे का? एखाद्या दिवशी तिला शाळेत न पाठवून बघावं का? पण मग वाटतं , तिला तशीच सवय लागली तर? अजून कंटाळा करेल मग. कधी वाटतं, शाळेत नाही पाठवायचं आणि दिवसभर कट्टी करावी तिच्याशी. मग समजेल तिला शाळेत न जाण्याची शिक्षा. पण मला जमेल का दिवसभर अबोला?

माझं लहानपण सुद्धा असंच होतं खरंतर. मलाही शाळेत जायचा खूप कंटाळा होता. मीही लहानपणी खूप मार खाल्लाय, शाळेत जायला नको म्हणून. तेव्हा कारण काय असायचं, ते आठवत नाही. पण कदाचित झोपेतून उठायचा कंटाळा असावा. ( जो अजूनही आहे ). नंतरही अगदी दहावीपर्यंत मला शाळेत जायचा कंटाळाच यायचा. पण जावंच लागेल हे समजत होतं, म्हणून जायचे. माझ्या लाडूचं पण असंच होईल का? इतकी कंटाळवाणी वाटेल तिला शाळा? की तिची शाळा माझ्या शाळेपेक्षा जास्त चांगली असेल? कित्ती ते विचार...

एवढ्या विचारांचं आणि अपराधीपणाचं ओझं घेऊन मी घरी जाते. नजरेसमोर सकाळची रडवेली लाडुली येत असते आणि आता तो रडका लाडू माझ्यावर रागावलेला दिसेल, अशी भीती वाटत राहते घरी पोहचेपर्यंत. पण घरी गेल्यावर माझी हसरी, खट्याळ लाडुली धावत माझ्याजवळ येते; मी उचलून घ्यावं म्हणून. आणि मग आमच्या घट्ट मिठीत 'तो एक तास' कुठेतरी गुडूप होऊन जातो.......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे.
ह्या सगळ्यातुन गेलेय मी पण. अजुनही जातेय. Happy
सगळं ठीक होईल.

तिला घरात बघण्याची सोय असेल तर बुट्टी मारू दे. सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे जरा त्रासच होतो. तिला अजून तुम्हाला खूप वर्षे हा एक /पाऊण/अर्धा तास /पंधरा मिनिटं करायचं आहे Happy पहिली पर्यंत इतकं काही नसतं. पुढे-पुढे शिक्षक ओरडतात, मित्र चिडवतात मग जायला लागतात. नाही येणार शाळेचा कंटाळा :))

Lol
धन्यवाद राजसी... तिला पुढच्या आठवड्यात एक सुट्टी देण्याचा विचार आहेच माझा.
पहिली पर्यंत इतकं काही नसतं. >>>>>> ते तर झालंच. पण रोजचा कंटाळा नको वाटतो.

सध्या मी यातून जातेय.. तिला उठवून थोडा वेळ तिझा fav cartoon लावून देते, मग हळू हळू कपडे कढून बाथरूम गाठायचे. प्रतिकार चालूच असतो. बाथरूम मधेच ब्रश करुन अंघोळ घालते.
किती चूझी असतात ही मुलं, 3 वर्षाची आहे तो हाच frock, तोच क्लिप, ठराविक सॅन्डल etc.
वरून 2 2 दिवसाला हातात काहीतरी छोटा खेळणं धरून बसने, ते हरवलं तर आमची शोधाशोध. यात काहीही असू शकता, parking मध्ये सापडलेली कॅरम सोंगटी, तर कधी hexagon shape screw, तर कधी colorful marble. आणि हे सगळं जपून ठेवावा लागतं नाहीतर तह cadbury ने पूर्ण होतो. बरं ही वस्तू एक दिवसच हवी असते नंतर दुसरा काही तिला आकर्षक वाटतं, कधी कधी boiled egg हातात धरून बसते दिवस भर, तर कधी strawberry.. लय दमवते राव.. Uhoh

खरंच चिन्नु. Bw
लिहिताना वाटलं नव्हतं मला, असे समविचारी आयांचे ( आईचे अनेकवचन ) प्रतिसाद येतील... Lol

आमच्याकडे उलट आहे बर का..म्हणजे शाळेत जायचं अस तं पण लवकर उठण होत नाही..मग घड्याळाबरोबर पळापळी सुरू.... होतात मुलं शहाणी काही दिवसांनी...पण आपली चिडचिड होते आणि नंतर आपण का चिडलो म्हणून स्वतःचाच राग येतो हे ही अटळच.....

छान आहे.
सध्या मी यातून जातेय>>> मी पण

मी हा एक तास स्वतःला फ्री मध्ये लावलेली पेशन्सची ची शिकवणी म्हणून बघत असे. कालच्या पेक्षा आज जास्त पेशन्स दाखवायचा एवढेच मी स्वतःला बजावत राही. शाळेबरोबर सुरू झालेला हा तासाभराचा प्रवास अगदी महिन्याभरातच आनंदाची पर्वणी झाला.
मागे एक पुस्तक वाचले होते त्यात लेखिकाबाईंचे असे म्हणणे होते की पुढे जाऊन मुले समंजस वा मनमानी होण्याची मुळे ह्या अजाणत्या वयातल्या संवादात असतात.

सेम आमच्याकडे. अजून एक फाईट म्हणजे उन्हाळ्यात तिला फुल बाह्यांचा टॉप आणि जीन्स घालायची असते आणि अगदी ऐन थंडी मध्ये फ्रॉक. आजकाल जरा समजदार झालीये नाहीतर लास्ट इयर खूप छळलय तिने..

छान लिहिलत. खालच्या प्रतिसादांमधून कळलं केवळ ललित नाही. म्हणून अनुभवाचे काही शब्द.
रात्री झोपताना तिची मानसिक तयारी करून घ्या. उठणं, दात घासणं वगैरे सगळी कामं पटपट केलीस की शाळेत जायच्या आधी छानशी गोष्ट सांगेन म्हणा.
किंवा रात्री सांगायच्या गोष्टीतली परी कशी शाळेत पटपट आवरून जाते, मग तिला कशी मजा येते वगैरे सांगा.
मुलं गोष्टींमधून खुप काही शिकत असतात, गोष्टींचा सकारात्मक वापर करून बघा बरं . खुप शुभेच्छा Happy

धन्यवाद अवल.

रात्री झोपेपर्यंत ती मनापासून तयार असते उद्या शाळेत जाण्यासाठी. पण सकाळी उठल्यावर सगळं विसरते. नवा दिवस, नवीन खेळ... Happy

आमच्याकडेही सेम परिस्थिती. अजून भर म्हणजे आता अलिकडे दोन वर्षाचा धाकटा, मोठ्याच्या मागे लागतो शाळेत जाण्यासाठी.त्याला समजवण्यात अजून अर्धा तास जातो.
अश्विनीजी, तुम्ही वाचलेल्या त्या पुस्तकाचे नावही सांगा.

छान लिहिलंय.. डोळ्यासमोर उभे राहिलं

माझ्या आठवणीप्रमाणे मी पाचवी सहावीपर्यंत दर दिवसाआड पोट दुखतेय म्हणून धरून बसायचो. आईवडीलांना ते नाटक आहे हे कळूनही ते प्ंधरा मिनिटे माझी सेवा करायचे समजूत काढायाचे.. खरंच महान असतात आईबाप..

आमच्याकडेही अशीच परिस्थिती आहे... पण खूप त्रास नाही देत... मागच्या वर्षी शाळेच्या सुरवातीला मी alexa घेतली होती, त्यावर तिला बडबड गीते लावून द्यायची. कारण मी तिला अजिबात मोबाईल देत नाही पण तिची करमणूक व्हावी अशी इच्छा असते म्हणून Special alexa आणि android tv घेतला. कधीकधी सकाळी उठून मी तिला आवडणार्‍या गाण्यांवर Dance ही करायची त्यामुळे तिला उत्साह येऊन तिची झोप उडून जायची.. आणि गाणे ऐकून ती पण फ्रेश व्हायची... आता LKG ला आहे तर एवढी कसरत नाही करावी लागत... आणि मैत्रिणी पण आहेत ढीगभर, त्यांना भेटायचं असते त्यामुळे होते पटकन तयार... पण आमच्याकडे खरी चिडचिड, रडारड होते ती tiffin मुळे तिला अजिबातच भाजी खायची नसते.. याबाबत कुणाचे काही अनुभव आहेत का? म्हणजे तिला जबरदस्ती करावी की काय मला काहीच कळत नाही.. आधी भाजी न खाणारे मुलं मोठे होऊन खायला लागतात का?

आधी भाजी न खाणारी मुलं नंतर मोठी झाल्यावर भाजी खातात. मात्र नेमकी किती मोठी झाल्यावर, हे कुणीच सांगू शकत नाही. माझा मोठा मुलगा पहिलीत गेल्यानंतर भाजी खाऊ लागला तर 'सासूचा मुलगा' अजून सगळ्या भाज्या खात नाही.

माझा मोठा मुलगा पहिलीत गेल्यानंतर भाजी खाऊ लागला तर 'सासूचा मुलगा' अजून सगळ्या भाज्या खात नाही. >>>>> Biggrin

छान टिप अवल.
चांगली चर्चा सुरू आहे.
Cuty Lol

Pages