जमेल तितके स्वच्छ करावे

Submitted by निशिकांत on 24 December, 2019 - 23:50

( आज मी फार खुश आहे. जूनमधे बायपास सर्जरी झाल्यानंतर प्रथमच आज गझल सुचली आणि तीही एकटाकी! गझल कशी आहे या बद्दल मी बोलू शकत नाही. तो इलाका वाचक रसिकांचा आहे. पण पारंपारिक विचारांना छेद देणारे विचार थैमान घालत होते. का? माहीत नाही. असो. )

स्वच्छ चेहरे दिसावेत हे स्वप्न कदापी मनी नसावे
आज वाटते सुर्यालाही जमेल तितके स्वच्छ करावे

इतिहासाच्या पानोपानी कैद कालच्या कैक विभूती
पावित्र्याचा परीघ त्यजुनी, खुले तयांनी कसे फिरावे?

परतीचे का तिकीट द्यावे विना तारखेचे देवाने?
संभ्रमात आयुष्य संपते किती जगावे? कधी मरावे?

पांडव दिसले प्रथम म्हणोनी कृष्ण सखा त्यांच्या बाजूने
तर्काधारित जे नाही ते व्यासांनी का असे लिहावे?

करावया संचय पुण्याचा फरपटीत आयुष्य संपते
आज वेदना, मरणा नंतर किर्तिरुपाने म्हणे उरावे!

कधीच नव्हते मी मागितले ईश्वरास झोळी पसरोनी
जाणत असतो दु:ख जगाचे, पुन्हा वेगळे का सांगावे?

पापाचा मी घडा घेउनी गेल्यावरती गंगा म्हणते
मीच जाहले गटार गंगा, क्षालन करणे कसे जमावे?

ब्रह्मानंदी जरी लागते टाळी परमेशाच्या चरणी
देव अपेक्षा का करतो मी माझ्या अपुल्यांना विसरावे?

पापभिरू "निशिकांत"मागतो नैवेद्याचे ताट जेवण्या
नास्तिकतेच्या बुरख्या मागे कशास अस्तिकतेस जपावे?

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वाह!! फार छान.
>>>>>>>> परतीचे का तिकीट द्यावे विना तारखेचे देवाने?
संभ्रमात आयुष्य संपते किती जगावे? कधी मरावे?>>>>>>>> _/\_

वाह बहारदार
उत्तम -------
कधीच नव्हते मी मागितले ईश्वरास झोळी पसरोनी
जाणत असतो दु:ख जगाचे, पुन्हा वेगळे का सांगावे?>>>>>>> मनापासून आवडली