गूढ अंधारातील जग -२

Submitted by सुबोध खरे on 24 December, 2019 - 23:08

गूढ अंधारातील जग -२

मूळ पाणबुडी या शाखेची गरज काय आणि तिचा हेतू किंवा उद्देश काय हे आपण समजून घेऊ.

युद्धाचा मूळ हेतू म्हणजे आपल्या शत्रूचे आर्थिक शारीरिक /सामरिक आणि मानसिक खच्चीकरण करणे.

जी गोष्ट सामोपचाराने सुटत नाही(साम) तिच्यासाठी पैसे मोजून(दाम) काम होत असेल तर ठीक ते जर होत नसेल तर दंड (युद्ध) आणि भेद (शत्रूला एकटा पाडणे) हे आपले काम करण्याचे उपाय अनादिकालापासून तत्वज्ञानात सांगितले आणि वापरले गेले आहेत.

यात लष्कराचा किंवा कूटनीतीचा भाग दंड आणि भेद यात केला जातो.

शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्याची युद्ध लढण्याची क्षमता आणि ती क्षमता कमी करण्यासाठी त्याची आर्थिक क्षमता कमी करणे आवश्यक आहे. यासाठी शत्रूवर थेट हल्ला करून त्याची लष्करी साधन सामग्री नष्ट करणे हा दंड या उपायाचा भाग आहे. त्याच्या व्यापाराची नाकेबंदी करणे आणि त्याच्या कडे येणाऱ्या आयातीवर आणि त्याने करण्याच्या निर्यातीवर तुम्ही बंदी आणली कि शत्रूची आर्थिक नाकेबंदी होते.

उदा. भारताला रोज ४०लाख बॅरल म्हणजेच रोज तुम्हाला पाच लाख बारा हजार टन कच्चे तेल लागते.ट्रकने आणायचे ठरवले तर केवळ तेलासाठीच ५१ हजार ट्रक रोजचे लागतील. ( पाकिस्तानला ४ लाख बॅरल कच्चे तेल लागते. हा सर्व व्यापार केवळ आणि केवळ समुद्रमार्गे होऊ शकतो ( जे देश तेलउत्पादक देशाला लागून आहेत त्यांना पाईप लाईनने पुरवता येणे शक्य आहे).

भारताच्या दोन्ही शत्रूंच्याकडे जाणारे सागरी मार्ग हे दोन चिंचोळ्या सामुद्रधुनी(STRAIT) मधून जातात. चीनकडे जाणारा सागरी मार्ग हा मलाक्का च्या सामुद्रधुनी तुन जातो तर पाकिस्तान कडे जाणारा सागरी मार्ग हा होर्मूझच्या सामुद्रधुनीतुन जातो.चीन कडे जाणारे ८० %तेल आणि चीनकडून निर्यात होणारा ७५ % मलाक्काच्या सामुद्रधुनी तुन जातो. या सामुद्रधुनीचा सर्वात अरुंद भाग हा फक्त अडीच किमी आहे.
http://www.businessinsider.com/maps-oil-trade-choke-points-person-gulf-a...

चीनशी दोन हात करायचे तर त्याच्या आर्थिक सामर्थ्याला धक्का लावणे आवश्यक आहे म्हणूनच भारताने जाणून बुजून अंदमान निकोबार वरील आपले लष्करी तळ वाढवायला सुरुवात केली आहे.

या भागाची भारताने नाके बंदी केली तर चीनची आर्थिक सत्ता कोसळायला फार कमी दिवस लागतील. चीन पाकिस्तान आर्थिक मार्गिका (CPEC) साठी चीन एवढा अधीर का झाला आहे आणि चीनने आपल्या नौदलाचा आणि विशेषतः पाणबुडी शाखेचा झपाट्याने विस्तार का सुरु केला आहे याचे उत्तर आपल्याला येथे मिळेल.
जागतिक बाजारात चीनचा कोणीही मित्र नाही. भारत अमेरिका रशिया जपान दक्षिणपूर्व आशियातील देश (कोरिया ,मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएटनाम इ.) सर्वानाच चीनच्या विस्तारवादाची भीती वाटत आली आहे.

पाकिस्तानची परिस्थिती अशीच आहे. त्यांच्या कडे येणारे कच्चे तेल हे सौदी अरेबिया इराण, संयुक्त अरब अमिराती, कुवैत आणि कतार कडून येते. आणि यातील इराण सोडले तर बाकी सर्व देशाकडून येणारे तेल(८५%) होर्मूझच्या सामुद्रधुनीतून येते. त्यातून भारताने इराणच्या चाबहार बंदराचा विकास चालू केला आहे. भारताने इराण बरोबर आपले संबंध बरेच चांगले ठेवले आहेत. शिवाय पाकिस्तान हा सुन्नी बहुल देश असून तेथे शियांवर सतत अत्याचार/शिरकाण होत असतात. सर्वात मोठा आणि एकमेव शिया असलेला इराण यांचे पाकिस्तानशी संबंध याकारणाने (आणि बलुचिस्तान मुळॅ) कायम तणावपूर्ण राहिलेले आहेत.
https://www.thequint.com/voices/blogs/chabahar-and-gwadar-struggle-for-p...

अशा अनेक कारणांमुळे युद्ध झाले तर प्रत्यक्ष लष्करी विजय न मिळवता पाकिस्तानची आर्थिक आणि सामरिक कोंडी करणे भारताला सहज शक्य आहे.

पाणबुडीचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे लपून राहणे.STEALTH

पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली असलेली वस्तू आपल्याला सहजासहजी दिसत नाही. त्यामुळे रडार किंवा सोनारचा जन्म होण्याअगोदर केवळ दृष्टीला दिसेल अशा लष्करी वाहनांपैकी पाणबुडी शोधून काढणे फारच कठीण होते. याचा फायदा घेत जर्मनीने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांना जवळ जवळ पराभवापर्यंत आणले होते.

एखादे जहाज आपल्याला दिवस किंवा रात्री उपग्रहाच्या साहाय्याने काही क्षणात शोधणे सहज शक्य आहे पण आजही पाणबुडी एकदा पाण्याच्या खाली गेली तर तिला शोधून काढणे हे जवळ जवळ अशक्य आहे.

अरबी समुद्राचा विस्तार ३८ लाख चौरस किमी आहे आणि मोठ्या आकाराच्या पाणबुडीचा आकार (अरिहंत सारख्या) एक सहस्त्रांश चौरस किमी आहे म्हणजेच पाणबुडीला शोधून काढणे हे

अक्ख्या महाराष्ट्र राज्यात एक काळ्या रंगाचा बिबळ्या अमावास्येच्या रात्री शोधून काढण्याएवढे "सोपे" आहे

अशी पाणबुडी जर मलाक्काच्या आखाताच्या आजूबाजूला दडून बसली असेल तर तिला उपग्रह किंवा विमान अथवा जहाजाने शोधून काढणे हे जवळजवळ अशक्य आहे.

१९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या पाणबुडीने आपले खुकरी हे जहाज बुडवले होते पण भारताकडे ४ फॉक्सट्रॉट वर्गाच्या चार पाणबुड्या असूनही त्यांना एकही पाकिस्तानी जहाजाला बुडवता आले नाही.
हे आश्चर्यच नव्हे काय?
त्यात आश्चर्य काहीच नव्हते. कारण पाकिस्तानच्या नौदलाची सर्वच्या सर्व जहाजे भारतीय पाणबुड्याना घाबरून कराची बंदराच्या आसपास सुरक्षित उथळ पाणयात बसून होती. रिंगणात प्रतिस्पर्धी उतरलाच नाही तर तुम्ही काय कुस्ती खेळणार आणि त्याला हरवणार?

त्यावर भारतीय नौदलाच्या जहाजांनी ऑपरेशन ट्रायडेंट आणि ऑपरेशन पायथॉन असे दोन हल्ले करून पाकिस्तानि नौदलाची कंबरच मोडली.
https://en.wikipedia.org/wiki/Operation_Trident_(1971)
https://en.wikipedia.org/wiki/Operation_Python

पण यामुळे भारताचा व्यापार मात्र सुरळीत चालू होता आणि पाकिस्तानची संपूर्ण नाकेबंदी झाली होती.

फॉकलंड च्या युद्धात ब्रिटिश नौसेनेने अर्जेंटिनाची जनरल बेलग्रेनो नावाची नौका बुडवल्यावर अर्जेंटिना नौदलाने त्यांची जहाजे बंदरातच ठेवली होती. Following the loss of General Belgrano, the Argentinian fleet returned to its bases and played no major role in the rest of the conflict. British nuclear submarines continued to operate in the sea areas between Argentina and the Falkland Islands, gathering intelligence, providing early warning of air raids and effectively imposing Sea denial.
https://en.wikipedia.org/wiki/ARA_General_Belgrano

पाणबुडीची दहशत अशी असते.

पाणबुडी या शस्त्राचा वापर केवळ युद्धातच होतो असे नव्हे तर युद्धाला प्रतिबंध (DETERRENT) म्हणून पण याचा वापर होऊ शकतो. अण्वस्त्रधारक क्षेपणास्त्रे असलेली पाणबुडी हा एक युद्ध टाळण्यात फार मोठा आधार असू शकतो. दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रात सहसा युद्ध होत नाही कारण सर्वंकष संहार MAD ( mutually assured destruction). हि भीती युद्धाच्या काठावरून राष्ट्रांना परत येण्यास भाग पडू शकते. पण एखाद्या राष्ट्राच्या माथेफिरू हुकूमशहाने सर्वविध्वंसक असा पहिला अण्वस्त्र हल्ला( first strike) केला तर दुसऱ्या राष्ट्राचा सर्वनाश होऊन त्यात त्याची अण्वस्त्रे सुद्धा नष्ट होण्याची भीती असते.अशा परिस्थितीत त्या राष्ट्राकडे जर अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे असलेली पाणबुडी असेल तर ती पाणबुडी अशा भयंकर हल्ल्यातही सुरक्षित राहील आणि मग त्या पाणबुडीने केलेल्या प्रतिहल्ल्यात( second strike) मूळ अण्वस्त्रे वापरणारा देश सुद्धा नष्ट होईल. त्यामुळे असा हल्ला करण्याचा मूर्खपणा पहिला देश करू धजावणार नाही.
उदा. चीनने भारतावर अण्वस्त्र असलेली क्षेपणास्त्रे डागली आणि भारताचा भूभाग संपूर्णपणे भाजून टाकला तरी आपल्याकडे असलेली "अरिहंत" हि अण्वस्त्र धारी क्षेपणास्त्रे असलेली पाणबुडी दक्षिण चीनच्या समुद्रातुन १२ सागरिका क्षेपणास्त्रे (K १५) वरून
किंवा चार ३५०० किमी लांब पल्ल्याची K -४ ( अग्नी -३) हि क्षेपणास्त्रे बंगालच्या उपसागरातूनच डागून हायड्रोजन बॉम्ब टाकून चीनला बेचिराख करू शकेल अशी आज आपली क्षमता आहे. https://en.wikipedia.org/wiki/Arihant-class_submarine
https://en.wikipedia.org/wiki/K-4_(missile)
यातील K हे आद्याक्षर कलाम (डॉ अब्दुल कलाम) वरून घेतलेले आहे आणि हि त्याना वाहिलेली श्रद्धांजली आहे

अशीच दुसरी अणुपाणबुडी "अरिघात " हिने १९ नोव्हेंबर २०१७ रोजी जलावतरण करेल आणि २०२० मध्यापर्यंत संपूर्णपणे युद्धक्षमता धारण करेल. https://en.wikipedia.org/wiki/INS_Arighat

असाच एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे (non state actors) असंघटित किंवा घातपाती कारवाया करणाऱ्या दहशतवादी किंवा सागरी चाचे यांचा बंदोबस्त करण्यासाठी होऊ शकतो. एडन च्या किंवा मलाक्का आखातात असलेले चाचे हे नौदलाच्या जहाजाला पाहिले कि तेथील जनतेत मिसळून जातात आणि जहाज गेले कि परत सक्रिय होतात. अशा वेळेस तेथे आपली पाणबुडी त्यांच्यावर दिवसापण "नजर" ठेवू शकते आणि हे लोक कुठे जातात त्याचा ठावठिकाणा सापडला कि त्यांच्या तळावर क्षेपणास्त्रे डागून त्याचा संहार करू शकतात. नागा किंवा रोहिंग्या बंडखोरांना चीनची "फूस" मिळत असते जेणेकरून भारत आणि म्यानमार मध्ये तणाव राहावा आणि आपल्याला तेथे शिरकाव करता यावा.
अशा विषम शत्रू विरुद्ध होणाऱ्या असमतोल युद्धात केलेल्या कारवाईचा कोणताही पुरावा मागे न ठेवता कार्यवाही करण्यासाठी पाणबुडीचा फार मोठा उपयोग होऊ शकतो.

कालवेरी या भारतीय पाणबुडीतून क्षेपणास्त्र डागण्याची चाचणी यशस्वी झाली आहे आणि ती पाणबुडी आता पूर्णपणे भारताच्या सागरी हद्दीच्या संरक्षणा साठी सिद्ध आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/navy-successfully-test-fires-a...
https://economictimes.indiatimes.com/news/defence/first-scorpene-submari...
https://www.youtube.com/watch?v=dzttFhYUR7g

याच गटातील दुसरी पाणबुडी आय एन एस खांदेरी हि पण आता आपल्या ताफ्यात सामील झाली आहे.
https://www.indiatoday.in/india/story/ins-khanderi-rajnath-singh-1604160...

क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

खुप छान माहिती मिळाली. पाणबुडीच्या विविध श्रेणींची नावे (अकुला वगैरे) नक्की कश्यावरुन ठरतात ते वाचायला आवडेल.

अतिशय इंटरेस्टिंग लेखमाला आहे. तुम्ही छान लिहीत आहात. संदर्भासहित देताहात ते अजून छान नाहीतर इथे खुसपट काढून वाद सुरू करायला वेळ लागत नाही.

पुढचे भाग वाचण्याची उत्सुकता आहे.

पाणबुडी किती तरी दिवस पाण्याखाली असते
तर आपल्याला गरजेचा असलेला ऑक्सिजन चा साठा बरोबर असतो का.
तो जर लिमिटेड असेल तर पाणबुडी ला काही वेळासाठी पाण्याबाहेर यावेच लागेल .
पाण्याबाहेर आल्यावर ती शत्रू च्या विमानांची शिकार नाही होणार का.
तसा वॉच शत्रू राष्ट्र ठेवत असतील च

Rajesh188 समुद्र किती विशाल असतो हे तुम्हाला माहीत आहे काय? पाणबुडी तुम्हाला पाण्याच्या टाकीतला बेडूक वाटला काय? आला वरती आणि लगेच दगड मारून मारला.

छान माहिती.
सुरेख लेख मालीका आहे.

य? पाणबुडी तुम्हाला पाण्याच्या टाकीतला बेडूक वाटला काय? आला
Satelite पृथ्वी वरच्या चेंडूचा पण स्पष्ट फोटो घेतात अस वाचलं होते.
त्या मुळे पाणबुडी पाण्याच्या पृष्ठभागावर आली की तिचे फोटो नक्कीच घेतले जातील आणि trace केली जाईल.
मला जाणून घ्यायचं होते पाणबुडी मध्ये ऑक्सिजन चं पुरवठा करण्यासाठी काय योजना असते

सुबोध...खुप छान धागा आहे. ज्ञानात भर पडली. तुमचे या क्षेत्रातले अनुभवही लिहिलेत तर वाचायला आवडतील.

पाणबुडी किती तरी दिवस पाण्याखाली असते
तर आपल्याला गरजेचा असलेला ऑक्सिजन चा साठा बरोबर असतो का.
पाणबुडी ला काही वेळासाठी पाण्याबाहेर यावेच लागेल .
पाण्याबाहेर आल्यावर ती शत्रू च्या विमानांची शिकार नाही होणार का.

पाण्याखाली डिझेल इंजिनाला प्राणवायूचा पुरवठा कसा होतो? आणि एक्झॉस्ट गॅसचा निचरा कसा करतात? त्यामुळे पाण्यात बुडबुडे तयार होत नाहीत का?

डिझेल च्या पाणबुडी मध्ये डिझेल जनरेटरने वीज तयार करून ती त्यात असलेल्या बॅटऱ्यामध्ये साठवली जाते आणि या विजेवर पाणबुडीचा पंखा (प्रोपेलर) चालतो.
या बॅटऱ्या चार्ज करण्यासाठी ठराविक कालावधी नंतर पाणबुडीला पाण्याच्या पृष्ठभागाच्या जवळ यावे लागते. पण पाणबुडी जेंव्हा गस्त घालत असते तेंव्हा कधीही पृष्ठभागावर येत नाही. तर पेरिस्कोपच्या खोलीवरच राहते
पाणबुडीच्या पेरिस्कोपची उंची ६० फुटापर्यंत असू शकते. साधारण पणे पाणबुडीच्या बॅटऱ्या अपरात्रीच चार्ज केल्या जातात. त्यामुळे पाण्याचा पृष्ठभागाखाली ५० फुटावर असलेली पाणबुडी रात्री २ वाजता विमाने किंवा उपग्रह याना दिसणे कर्म कठीण आहे. तेसुद्धा ती पाणबुडी तिथे आहे हे नक्की माहिती असेल तर.
अक्ख्या महाराष्ट्र राज्यात एक काळ्या रंगाचा बिबळ्या अमावास्येच्या रात्री शोधून काढण्याएवढे "सोपे" आहे

पेरिस्कोप मध्ये तीन नळकांडी असतात. एकात शुद्ध हवा आत घेण्यासाठी दुसऱ्यातुन धूर बाहेर टाकण्यासाठी आणि तिसर्यात दुर्बीण आणि इतर संपर्काची उपकरणे रेडिओ कम्युनिकेशन इ असतात. यातून दिवसात एखादे वेळेस (साधारणपणे मध्यरात्रीच) पाणबुडीच्या मुख्य केंद्राशी संपर्क केला जातो. यात एक सांकेतिक पल्स हवेत सोडला जातो आणि पाणबुडी यानंतर गप्प राहते. केंद्र कडून येणारा संदेश फक्त ऐकते आणि गरज असेल तरच परत असा एक प्लस सोडला जातो.

अमावास्येच्या रात्रीच्या अंधारात एखाद्या घुबडाने एकदाच "घुर्क" असा आवाज केला तर त्याला शोधून काढणे किती कठीण आहे. केवळ घुबडीणीला तो ऐकू येऊन त्याचे विश्लेषण करता येईल. तशीच हि स्थिती आहे.

या शिवाय पाणबुडीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी डिझेल च्या पाणबुडीत ऑक्सिजन चे सिलिंडर नेलेले असतात यातून संगणकाच्या नियंत्रणाखाली पाहिजे तेवढा ऑक्सिजन हवेत सोडला जातो.

अणुपाणबुडीला याची काहीच गरज नसते. कारण अणुभट्टीत हवी तेवढी ऊर्जा निर्माण करता येते यामुळे त्यात तयार झालेल्या विजेचा वापर करून समुद्रातील पाण्याचे पृथक्करण करून त्यातून ऑक्सिजन बनवला जातो यामुळे अणु पाणबुडीला ऑक्सिजन साठी वर यायची कधीही गरज भासत नाही.

पाणबुडीतील हवा अत्यन्त काटेकोर पणे नियंत्रित केली जाते कारण तयार होणार कार्बन डाय ऑक्साईड आणि आर्द्रता हि प्रमाणात ठेवावी लागते.ऑक्सिजनचे प्रमाण हि जास्त होऊन चालत नाही अन्यथा आग लागण्याची भीती असते. प्रत्येक कप्प्यात हवेचे संवेदक (sensor) बसवलेले असतात आणि त्याच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले जाते. कारण कुठल्याही तर्हेची गडबड हि प्राणघातक ठरू शकते. आणि यासाठी प्रत्येक नौसैनिकाला एक वर्षे अतिशय कठोर असे प्रशिक्षण दिले जाते. यात सर्वोच्च अधिकारी आणि सर्वात निमन सैनिक असा फरक केला जात नाही.

पाणबुडी जेव्हा एकद्य भु प्रदेशावर हल्ला करते तेव्हा ती पाण्यात असते की पाण्याच्या वर.
जर खोल पाण्यातून हल्ला करायचा असेल भु भागावर तर ती टार्गेट कसं नक्की करते