गूढ अंधारातील जग -१

Submitted by सुबोध खरे on 23 December, 2019 - 09:47

गूढ अंधारातील जग -१

आपण कधी खिडकीच नसलेल्या कार्यालयात काम केलं आहे का?

महिनोंमहिने सूर्यप्रकाश , चंद्रप्रकाश, उघडे आभाळ पाहिलेले नाही.

तीन तीन महिने २४ तास त्याच त्याच माणसांचा चेहरा पहिला आहे का?

तीन महिने सलग बिन अंघोळीचे राहिला आहात काय ? आणि वापरलॆले कपडे न धुता टाकून दिले आहेत का? डिस्पोझेबल डायपर नव्हे

तीन महिन्यात केस कापता आले नाहीत म्हणून एखाद्या गोसाव्यासारखे वाढू दिले आहेत का?

महिनोन्महिने डबाबंद अन्न खाल्लंय का?

मला कितीही सुग्रास जेवलं तरी शेवटी आमटी भात लागतोच, मला रोज नॉनव्हेज लागतंच किंवा मी १०० टक्के नॉनव्हेज आहे, तोंडाला चवच राहिली नाही साला श्रावण केंव्हा एकदा संपतोय असं झालं आहे

असे न म्हणता
केवळ टोमॅटो केचप आणि पोळी/ ब्रेड खायला लागते आहे म्हणून तक्रार न करता काम केलंय का?

आणि हे सुद्धा आपण काही गुन्हा केल्यामुळे अंधारकोठडीत टाकलंय कि काळ्या पाण्याची शिक्षा झाली आहे
म्हणून नव्हे तर आपण स्वतःच्या इच्छेने हे करायला तयार झाला आहात म्हणून.

हे एक वेगळे आणि गूढ पण अंधारातील जग आहे

हे जग आहे पाणबुडीचे आणि त्यात काम करणाऱ्या नौसैनिकांचे.
हि माणसे तुमच्या आमच्यातीलच सामान्य माणसं असतात. पण त्यांना या जगासाठी तयार केलं जातं शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या

समानशीले व्यसनेषु सख्यम या नात्याने त्यांचे जग हे अतिशय घट्ट असे रेशमी मानसिक बंधाचे (क्लोज बॉन्डेड) तयार झालेले असते.

पाणबुडीत काम करण्यासाठी सर्वानाच १ वर्षाचा खास पण अतिशय कठीण असा एक अभ्यासक्रम करावा लागतो मग तो डॉक्टर असो कि इंजिनियर.

कारण पाणबुडी हि सीलबंद आणि अभेद्य असते आणि तिला कोठूनही चीर किंवा भोक पडले तर त्यात असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जीवाला धोका निर्माण होतो.

आपण घरात कोंदट झाले तर पटकन खिडक्या उघडतो अशा खिडक्या मुळात पाणबुडीला नसतातच आणि पाणबुडी हि असंख्य कप्प्यांची बनलेली असते. त्यातील प्रत्येक कप्पा हा जलाभेद्य असतो.परंतु पाणबुडी एकदा पाण्याच्या खाली खोल गेली कि आतली हवा बाहेर सोडणे आणि बाहेरची हवा आत घेणे अशक्य होऊन बसते आणि म्हणून पाणबुडीत च्या आत असलेल्या हवेच्या प्रमाणावर सारखे लक्ष ठेवावे लागते. सैनिकांच्या श्वसनामुळे तयार होणार कार्बन डाय ऑक्साईड आर्द्रता इ चे प्रमाण अचूक राखावे लागते.

आपल्याला "अपचन झाले" तर इतरांना "उलटी" होण्याचा संभव असतो

त्यातून एखाद्या कप्प्यात आग लागली तर तेथे तयार होणारे कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनॉऑक्साईड आणि इतर धोकादायक वायू यावर ताबडतोब उपाय करावे लागतात.

अशा असंख्य गोष्टीवर तेथे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. तेंव्हा तेथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक माणसाला पाणबुडीतील जीवन रक्षक कवायतीच्याबद्दल इत्यंभूत ज्ञान असणे आवश्यक असते.

सिगरेट बिडी पिणे हे तर संपूर्ण निषिद्ध आहेच.

दिवस कोणता आणि रात्र कोणती हे हि आतमध्ये समजत नाही. पूर्णवेळ कृत्रिम प्रकाशात राहायला लागते आणि वॉर पेट्रोल साठी गेल्यावर एका वेळेस तीन महिने बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो

मग वृत्तपत्र, दूरदर्श,, दूरध्वननी, भ्रमणध्वनी इ सर्व च्या सर्व बंद होऊन जाते.

आज काही तास मोबाईल बंद झाला/ बॅटरी संपली म्हणून तर कासावीस होणारे कित्येक तरुण आपल्याला आसपास दिसतात.

अशा परिस्थितीत सुशिक्षित तरुण यश खडतर आयुष्यासाठी आनंदाने का तयार होतात याचे मला आश्चर्य आणि कौतुक वाटत राहिले आहे.

हा विषय अतिशय गहन, खोल आणि विस्तृत आहे.

मी पाणबुडीत प्रत्यक्ष काम केलेलं नाही. केवळ पाणबुडीला भेट दिली आहे, अंडर वॉटर मेडिसिनचा प्राथमिक अभ्यासक्रम केला आहे आणि नौदलात नोकरी केल्यामुळे माझे असंख्य वरिष्ठ, कनिष्ठ आणि मित्र हे पाणबुडीत प्रत्यक्ष काम केलेले आहेत. त्यांच्याशी मारलॆल्या गप्पा यावरून मी या विषयाला हात घालायचा प्रयत्न करतो आहे.

या विषयावर मराठीत किती माहिती आहे हेही मला माहित नाही. या विषयाच्या पृष्ठभागाला स्पर्श करता आलाआणि अशा अनेक मित्रांचे खडतर आयुष्य लोकांच्या समोर आणता आले तर तर मी स्वतःला धन्य समजेन.

एखादे वेळेस माहिती विसंगत किंवा चुकीची असण्याची शक्यता आहे त्यात कुणी दुरुस्ती सांगितली तर मी प्रथमच माफी मागतो आहे आणि या चुका सुधारण्याचा माझा प्रयत्न राहील हे हि नमूद करू इच्छितो.

(पूर्वी इतरत्र प्रकाशित )

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सविस्तर vachayla आवडेल....चांगली माहिती आहे....किती अवघड असेल सतत अशा वातावरणात राहणे....कल्पना करता येत नाही...

हे जग आहे पाणबुडीचे आणि त्यात काम करणाऱ्या नौसैनिकांचे.>>> खरोखरच कल्पना नाही करता येत. फारच नवीन माहिती मिळणार आहे, मालिका उत्कंठावर्धक होणार हे नक्की. पुलेशु

लष्कराचा वैद्यकीय विभाग हा तिन्ही दलांसाठी एकच आहे त्यामुळे लष्कराच्या कोणत्याही रुग्णालयात कोणत्याही दलाचा वैद्यकीय अधिकारी तैनात असतो. आणि तिन्ही दलांचे महासंचालक हे थेट संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. कारण वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा दबाव वैद्यकीय बाबीत येऊ नये ही मूळ संकल्पना आहे. शिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांची बढती ही कालबद्ध असल्यामुळे त्यांच्या खाजगी अहवालाचा(CR) त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही.
आमचे वैद्यकीय महाविद्यालय हे सुद्धा तिन्ही दलांचे मिळून आहे आणि ते थेट संरक्षण मंत्रालयाच्या अख त्यारीत येते, शिक्षण मंत्रालयाच्या नाही.
माझी साडे चार वर्षे शिक्षण ए एफ एम सी मध्ये आणि साडे अठरा वर्षे लष्करी नोकरी झाली यापैकी 8 वर्षे नौदलात साडे नऊ वर्षे (थळ)सेनेत आणि एक वर्ष तटरक्षक दलात (प्रतिनियुक्तीवर) गेली.

मस्त विषय. वाचायची उत्सुकता आहे ! ह्या विषयाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद.

फक्त एक विनंती <<<< आज काही तास मोबाईल बंद झाला/ बॅटरी संपली म्हणून तर कासावीस होणारे कित्येक तरुण आपल्याला आसपास दिसतात. >>>> हे असं जनरलाईज्ड प्यॅकेज काढणं टाळलं तर आवडेल. Happy प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, प्रत्येकाचे प्राधान्यक्रम वेगळे. त्यामुळे एका फटक्यात सगळ्यांना तुच्छ ठरवून टाकलं नाही तर चांगलच आहे.

मस्त! पुढे वाचायला आवडेल.

एक प्रश्नः अशा वातावरणात काम करावे लागत असताना कामाव्यतिरिक्त विश्रांती किंवा करमणुकीचे काय पर्याय असतात? इण्टरनेट किंवा टीव्ही हे तांत्रिक कारणामुळे शक्य नसतात की लष्करी नियमांमुळे?

टाइटल वाचून आधी जरा इलुमिनिटी वगैरे तत्सम काही गूढ़ बाबी असेल असे वाटून धागा दुर्लक्षित राहिलेला पण आता वाचल्यावर आधी इकडे न डोकावल्याबद्दल वाईट वाटले ... खुप छान विषय निवडलाय आणि पुढे विस्तृतपणे वाचायला आवडेल. पुलेशु Happy

फारएण्ड
मला वाटते तुमच्या शंकेतील माध्यमे ज्या लहरी निर्माण करतात त्यातून पाणबुडीच्या अस्तित्वाला शत्रुकडून डिटेक्ट होण्याचा धोका असल्याने बन्दी असावी.

पाण्याच्या खाली विद्युतचुंबकीय लहरी पोहोचतच नाहीत. त्यामुळे इंटरनेट, दूरदर्शन इ दिसण्याची किंवा रेडिओ, एफ एम ऐकायला येण्याची शक्यताच नाही.

यामुळेच पाण्याखाली रडार चालतच नाही आणि शत्रूच्या पाणबुडीचा तपास काढण्यासाठी ध्वनी लहरींचा( सोनार) वापर केला जातो.

भारी,
ह्या आगळ्या-वेगळ्या जगाविषयी वाचायला खूप आवडेल. फक्त एक च विनंती : पटापटा पुढील भाग येवुद्यात

करमणुकीसाठी सीडी प्लेयर आणि आता आयपॉड किंवा पूर्वी व्हीसीडी आणि आता पेनड्राइव्ह मध्ये साठवलेले सिनेमे आणि पुस्तके
शिवाय बरोबरच्यांबरोबर गप्पा मारणे एवढीच करमणूक असते. बाकी हास्यविनोद आपल्या मर्मबंधातील गोष्टी इतरांना सांगणे आणि ऐकणे इ चालूच असते. परंतु काही कालावधीनंतर ते फार एकसुरी(MONOTONOUS) आणि कंटाळवाणे होतेच.
मी जहाजावर असताना मैने प्यार किया या सिनेमाच्या व्हिडिओची १०० तरी पारायणे झाली असतील. शिवाय लोक वेगवेगळ्या व्हिडीओ कॅसेट्स अनंत यात एक सावन के गाने म्हणून तीन तासाची केवळ भिजलेल्या नायिकांची गाणी असलेली व्हिडीओ कॅसेट होती. सत्यम शिवम सुंदरम मधील झीनत अमान पासून हमको आज है इंतजार मधील माधुरी दीक्षित सारखी गाणी होती. त्याचाही कंटाळा येतोच.

आज काही तास मोबाईल बंद झाला/ बॅटरी संपली म्हणून तर कासावीस होणारे कित्येक तरुण आपल्याला आसपास दिसतात.

ही वस्तुस्थिती नाही का?
मोबाईल फोन ऍडिक्शन हा एक मानसिक आजार झाला आहे असे आता मनोविकार तज्ज्ञांचे एकमत झाले असून तो नव्या मनोविकारांच्या सूचित समाविष्ट केला गेला आहे. https://onlinelibrary.wiley.com/doi/full/10.1111/j.1360-0443.2009.02854.

Cell-Phone Addiction: A Review
https://www.frontiersin.org/articles/10.3389/fpsyt.2016.00175/full

बायकोची किंवा आईची महत्त्वाची सोनोग्राफी चालू असताना सुद्धा मोबाईलवरील लक्ष न हटवणारे तरुण माझ्या रोजच्या पाह्ण्यातले आहेत.

बायकोची किंवा आईची महत्त्वाची सोनोग्राफी चालू असताना सुद्धा मोबाईलवरील लक्ष न हटवणारे तरुण माझ्या रोजच्या पाह्ण्यातले आहेत.>>>>ते मोबाईलवर प्रार्थना,स्तोत्रे वाचत असावेत.

आर्मीतल्या जवानांचे वेगवेगळे अनुभव बरेचदा वाचलेत. पण नौदलातले पाणबुड्यामधे वास्तव्य केलेले अनुभव याआधी वाचनात आलेले नाहीत. त्यामुळे उत्सुकता वाढलीये.. पुभाप्र!

ते मोबाईलवर प्रार्थना,स्तोत्रे वाचत असावेत.

))=((

पण ज्या नातेवाईकाची सोनोग्राफी चालू असते त्यांच्या मनाचा विचारच नसतो. बऱ्याच वेळेस मी काहीतरी महत्त्वाचे सांगत असतो (उदा. बाळाच्या गळ्याभोवती नाळेचा वेढा आहे) आणि हे महाशय एकदम कुणाशी तरी फोन वर बोलणे चालू करतात.

आतां नाळेचा वेढा आहे त्याला नवरा किंवा भाऊ काय करणार? जे काय करायचंय ते डॉक्टर लाच ना? बाकी डॉक्टर कडे गेलेलं असताना फोनवर बोलू नये हे बरोबर पण जर कोणी बोलत असेलच तर त्या शिळोप्याच्या गप्पा नक्कीच नसणार. ह्या सगळ्या महागड्या टेस्ट परवडाव्या म्हणून जी नोकरी करत असतात त्याची काहीतरी deadline/delivery/bug अस काहीतरी असतं.
आजकाल अर्ध्या तासात डॉक्टर कडे जाऊन येऊ असं काही उरलेलं नाही इतकी गर्दी असते. तीन-चार तास सहज जातात. सोनोग्राफी ला तर हाफ डे.

डॉक्टरच्या प्रतिक्षालयात असताना फोन वापरणे वेगळे आणि स्वतःच्या बायकोची सोनोग्राफी होताना/ प्रत्यक्ष डॉक्टरशी बोलत असताना फोन वापरणे वेगळे आहे.

तेवढया १०-१५ मिनिटात सुद्धा तुम्ही उपलब्ध असणे आवश्यक आहेच का हे तारतम्य बाळगणे आवश्यक आहे.

फोन उचलून मी पाच मिनिटात परत कॉल करतो सांगणे शक्य आहेच ना?

किंवा एखाद्या इमारतीत सिग्नलच येत नसेल तेंव्हा हे लोक काय करतात ? अंघोळीला किंवा शौचालयात सुद्धा फोन घेऊन जातात का?

आपल्या जन्माला अजून न आलेल्या बाळा साठी १० मिनिटे सुद्धा काढता येत नसतील तर मला काहीच म्हणायचे नाही.

फक्त आपल्या बायकोला (आईला/ नातेवाईकाला) काय वाटत असेल याचाही त्या माणसाने विचार करून पाहावा.

बाकी आपण २४ तास मोबाईलवर उपलब्ध असणे यात काही चूक नाही आणि हे आवश्यक आहे असे कुणाला वाटत असेल तर त्यांच्या दृष्टीने ते बरोबरच असेल.

बायकोची किंवा आईची महत्त्वाची सोनोग्राफी चालू असताना सुद्धा मोबाईलवरील लक्ष न हटवणारे तरुण माझ्या रोजच्या पाह्ण्यातले आहेत.>>>>ते मोबाईलवर प्रार्थना,स्तोत्रे वाचत असावेत.
Submitted by बोकलत on 24 Decem
>> हायला बोकलत यव्ढा एकच सकारात्मक विचार करणारा प्राणी आहे माबोवर. ड्वोले भरुन आयले.

@ वेडोबा
किती अवघड असेल सतत अशा वातावरणात राहणे....कल्पना करता येत नाही...

तिसऱ्या भागाच्या शेवटी एक व्हिडिओ ची लिंक दिली आहे प्रत्यक्ष पाणबुडीतील वातावरणाची.
जरूर पहा

Ok sir