जगता येते बघा जगूनी---

Submitted by निशिकांत on 18 December, 2019 - 10:51

जगावेगळा नशेबाज मी
नशा मजसवे बघा करूनी
क्षणात एका जीवन सारे
जगता येते बघा जगूनी

दार बंद खिडक्यांना पडदे
एकलकोंडा समाज झाला
संवादाविन कुटुंबातही
जगावयाचा रिवाज झाला
अंगत पंगत, बसून गप्पा
भान हरवते जुने स्मरूनी
क्षणात एका जीवन सारे
जगता येते बघा जगूनी

आठवणी त्या गावाकडच्या
प्रशस्त वाडा, प्रशस्त अंगण
वन बी यच के टू बी यच के
आयुष्याची झाली वणवण
सडा अंगणी प्राजक्ताचा
स्मरता येते नशा अजूनी
क्षणात एका जीवन सारे
जगता येते बघा जगूनी

महागडे घर, जितके मोठे
आत मनाचे तितके छोटे
झोपडीतल्या गरीब पोरी
हसती खेळत सागरगोटे
आनंदाची फुले वेचण्या
झाड मनाचे बघा हलवुनी
क्षणात एका जीवन सारे
जगता येते बघा जगूनी

माळ घातली तुळशीची अन्
पूर्ण कसा मी बद्लुन गेलो!
प्रभु चरणाशी नाते जुळता
मजपासुन मी हरवुन गेलो
भक्तिरसाचे चार घोटही
गेले मजला धुंद करूनी
क्षणात एका जीवन सारे
जगता येते बघा जगूनी

तणाव मुक्ती, दु:ख विसरण्या
मदिरेचा का हवा सहारा?
अशी नशा का कधी दावते
भरकटल्या नावेस किनारा?
नशा चढावी आम्रराईतिल
कोकिळकंठी तान ऐकुनी
क्षणात एका जीवन सारे
जगता येते बघा जगूनी

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२

Group content visibility: 
Public - accessible to all site users