वेरूळ चे कैलास : जाणिवांचे एक अस्फुट दालन !

Submitted by Charudutt Ramti... on 15 December, 2019 - 10:11

वय बदलेल (खरं तर ‘वाढेल’) तसं, त्या बदलत्या वयानुसार, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोनही, आमूलाग्रतेने बदलत जातो. काही दिवसांपूर्वी वेरूळच्या लेण्यामंध्ये कोरलेलं 'कैलास मंदिर' पाहून आलो आणि 'वय', 'समज' आणि ‘सौंदर्यदृष्टी' ह्या तीन गोष्टींतली घनिष्टता स्वतःची स्वतःलाच लक्षात आली. आयुष्यात प्रथम वेरूळ ला जाऊन, ती कभिन्न कातळात कोरलेली निरुपमेय अशी लेणी आणि विशेष करून ते वेरूळच्या लेण्यांमधला मुगुटमणी असलेलं ते ‘कैलास मंदिर’ पाहिलं होतं त्यावेळी वय असेल अवघं सोळा सतरा. पण तब्बल वीस वर्षांतनंतर गेल्या महिन्यात परत एकदा वेरूळ ला जाण्याचा योग आला आणि वेरूळ च्या लेण्यांमध्ये आणि विशेषतः कैलास लेणी पाहून आल्यावर आयुष्याच्या ' मध्यान्हावस्थेत' – “ही मध्ययुगाहून प्राचीन” अशी अद्भुत लेणी पाहताना बौद्धिक जाणिवा, अध्यात्मिक चिंतनशैली आणि मानवी विश्लेषणक्षमता ह्या तिन्हींची ज्ञातसीमा मात्र गाठली जाते हे स्वतःला निर्विवाद पणे उमगून गेलं.

सहाव्या शतकापासून तब्बल दीडशे वर्षांची परंपरा आणि यशोधन इतिहास असलेल्या (सध्याच्या कर्नाटकातील) 'बदामी' येथे राजधानी वसवलेल्या चालुक्य घराण्याचा काळ. इसवीसन ७३१ ते ७३९ च्या दरम्यान चालुक्यांच्या समृद्ध अश्या राज्यावर परकीय 'अरबांचे' आक्रमण झाले. हे आक्रमण परतवून लावण्यात आणि चालुक्यांचे राज्य शाबुत ठेवण्यात त्यांचाच अंकित असलेला एक अतिशय बलशाली असा मोठा जहागीरदार आणि सरदार 'दंतिदुर्ग' चालुक्यांच्या मदतीला धावून आला. दंतिदुर्ग अतीव शौर्यशाली होता. त्याने परकीय अरब आक्रमण तर उधळवून लावलेच, परंतु चालुक्यांच्या राज्यातील ह्या विजयानंतर त्याच्या वाढत्या सामरिक प्रभावामुळे बलशाली झालेल्या दंतिदुर्गाने स्वतः चालुक्यांच्या राज्यावरच इसवीसन ७५३ साली प्रचंड मोठ्या ताकदीने चढाई केली आणि त्याने चालुक्याच्या कीर्तिवर्मन राजावर आक्रमण करून त्याचा पूर्ण चा पराभव केला. ह्या पराभवानंतर चालुक्यांच्या गादीवर दंतिदुर्गाने आपली निर्विवाद अशी सत्ता स्थापन केली. ह्या दंतिदुर्गाने त्या कीर्तिवर्मना वर मिळवलेला विजय म्हणजेच भारतीय उपखंडातील दक्षिणेकडील बलाढ्य 'राष्ट्रकुटांच्या' राज घराण्याची मुहूर्तमेढ आणि पायाभरणी होय.

अलीकडे ज्याला आपण दक्खन चे पठार म्हणतो त्यासहित, आताचे बरेचसे कर्नाटक व तामिळनाडू, आणि बहुतांश महाराष्ट्र आणि काही अंशी मध्यप्रदेश व गुजरात अश्या प्रचंड मोठ्या भूभागावर, ह्या महत्वाकांक्षी आणि बलशाली अश्या दंतिदुर्गाने दक्षिणे कडील 'राष्ट्रकूट' घराण्याचे राज्य प्रस्थापून भारतभू च्या दक्षिण उपखंडावर आपले निर्वीवाद असे वर्चस्व प्रस्थापित केले. दंतिदुर्गाने राष्ट्रकूटांचे राज्य तर स्थापन केले. पण दंतिदुर्गला पुत्र अपत्य नव्हते. त्यामुळे दंतिदुर्गाच्या मृत्यूपश्चात राष्ट्रकुटांचा राजदंड दंतिदुर्गाच्या काका कडे गेला. दंतिदुर्गाच्या काकाचे नाव 'कृष्ण'. राजा ‘कृष्ण’ हा सुद्धा अतिशय बलशाली आणि शौर्यवान. त्याने दंतिदुर्गाचे राष्ट्रकूट साम्राज्याच्या विस्ताराचे अपूर्ण कार्य पुढे सुरु ठेवले. चालुक्यांचा बदामीस्थित राजकीय वारसाला मृत्यूदंड देऊन त्याने आपले राष्ट्रकूट राजघराणे आणखी बलशाली करत राज्याच्या सीमा चौफेर वाढवत मध्यभारतात नर्मदा तर दक्षिणेत कावेरी च्याही पलीकडे नेऊन ठेवल्या. साधारण इसवीसन ७५ ३ ते इसवीसन ९७० अशी एकंदर २२० वर्षे राष्ट्रकुट घराण्याची निर्विवाद अशी सत्ता ह्या वर आरवली पासून ते इकडे संह्याद्री पर्यंत आणि खाली निलगिरी पर्यंत वसलेल्या पर्वत रांगांच्या पूर्वेस विस्तीर्ण पणे पसरलेल्या विस्तीर्ण भूभागावर साधारण आठ ते नऊ पिढ्या आपला राजकीय पदन्यास करत होती.

वेरूळच्या अभूतपूर्व अश्या कैलास मंदिराचे बांधकाम (क्षमस्व! कोरीवकाम) हे ह्या राष्ट्रकूट घराण्याचे दुसरे उत्तराधिकारी, राजा ‘कृष्ण’ ह्याच्या कारकिर्दीत झालेले ऐतिहासिक कार्य. हे जरी खरे असले तरी वेरूळ ची इतर लेणी कोरण्याचे काम तत्पूर्वी आणि तदनंतर अनेक शतके सुरु होते. वेरूळच्या लेण्यांचे बौद्ध, जैन आणि हिंदू अश्या साधारण तीन धार्मिक आणि सांस्कृतिक प्रवाहात वर्गीकरण केले जाते. त्यातील इतर सर्व लेणी आणि कैलास लेणं ह्या लेण्यांमध्ये मात्र कुणाच्याही नजरेस अगदी स्पष्ट दिसणारा अनन्यसाधारण असा फरक आहे. सर्वच लेणी जरी एकशैल्य (Monolithic: एकाच शिळेपासून घडवलेली) असली तरीसुद्धा “कैलास मंदिर” ह्या लेण्याचा थाट आणि एकंदरच दिमाख काही अनोखा आणि नितांत रमणीय आहे. इतर लेणी ही बहुतांशी अध्ययनाचे आणि अध्यापनाचे कक्ष आहेत. त्यातील एक लेणं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी घडवलेलं प्रशस्त भोजन कक्ष आहे. तर काही कक्ष म्हणजे विद्यार्थ्यांची वसतिगृहे आहेत. ह्या व्यतिरिक्त एक भव्य असे दालन आहे जे दीक्षांत सोहळ्यास लागणारे सभागृह आहे. एकंदरीत वेरूळ म्हणजे त्या काळी स्थापित असे एक प्रतिष्ठित विश्वविद्यालय असावे अशी सर्व रचना इथे दृष्टीस पडते आणि ऐतिहासिक दाखलेही तेच निदर्शनास आणतात.

काही ठिकाणी मात्र इथे, त्याकाळी व्यापार उदीम करणाऱ्यां प्रवाश्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची जागा म्हणूनही वेरूळची लेणी उपयुक्त होत असावीत असे वाचनात आढळून येते. कदाचित लेण्या घडवण्या मागे मुख्य हेतू धार्मिक विषयाचे अध्ययन-अध्यापन आणि त्याच बरोबर दुय्यम हेतू हे व्यापार उदीम वाढवण्यास आणि देशाटनास निघालेल्या वणिजनांच्या करीता तात्पुरता निवारा, ज्ञानार्जन व अर्थार्जन अश्या दुहेरी हेतूंनी ही संपूर्ण नगरी वसवण्यात आली असावी असं मानण्यास हरकत नाही. पण ही लेणी कोरण्याचं काम पिढ्यानपिढ्या आणि शतकानु शतके सुरु होतं हे मात्र निश्चित रित्या सिद्ध झालेलं आहे. Dynasty rule किंवा Monarchy चे असंख्य तोटे असले तरी ह्या पद्धतीचा हा एक महत्वाचा फायदा मानता येईल की काही महत्वाच्या प्रकल्पांना पिढ्यानुपिढ्या राजाश्रय आणि राजमान्यता होती. ( वेरूळच्या लेण्यांप्रमाणेच चीन ची भिंत हा सुद्धा असाच पाचशेहुन अधिक वर्षे बांधकाम सुरु असलेला मानवी इतिहासातील लक्षणीय प्रकल्प होय. )

काही अभ्यासकांच्या मते, वेरूळ मधील कैलास लेणं हे सतत १८ वर्षे कोरलं गेलं, तर काही अभ्यासकांच्या मते कैलास लेणं कोरण्यास १०० हुन अधिक वर्षे लागली. ऐतिहासिक आणि तात्विक बाबींप्रमाणेच कैलास लेण्यात तांत्रिक बाबी सुद्धा खूप गूढ आणि रम्य आहेत. कैलास लेणं घडविण्यासाठी इथल्या कोरून काढलेल्या शिळांचं वजन अंदाजे २ लाख टन एवढं भरेल. म्हणजेच ह्या एवढ्या मोठया प्रमाणात मुख्य डोंगरातून तासलेल्या शिळांचे मोठे ढीग वेरूळ पासून आजूबाजूस कुठेतरी मिळावयास हवे. पण तसे ते मिळत नाहीत. त्यामुळे एक शक्यता अशीही वर्तवली जाते की ह्या कोरीवकामात शिळा अश्या पद्धतीने कापण्यात आल्या की त्या शिळा इतर ठिकाणी मंदिर अथवा तत्सम वास्तुशिल्पांच्या बांधकामास उपयुक्त पडतील. कारण त्यावेळी हेमाद्रीपाल ( अथवा हेमांडपंथी, हेमांड किंवा हेमाद्रीपाला चा नक्की कार्य काळ कोणता हे जाणून घेणं इथं गरजेचं आहे ) ह्या स्थापत्य अभियंत्याने निर्मिलेल्या शास्त्रानुसार वास्तू घडवण्यास उपयुक्त शिळांमध्ये वैशिष्टयपूर्ण गुणधर्म (उदा: ती शिळा मूर्ती कामास सहज साध्य असावी , त्यात किमान वजन पेलण्याची ठराविक क्षमता असावी आदी) असणे गरजेचे होते. त्या प्रस्तर परीक्षे नुसार वेरूळच्या ह्या परिसरातील ज्वालामुखीच्या लाव्हातून निर्माण झालेला वैशिष्ठयपूर्ण (बेसॉल्ट) प्रस्तर, स्थापत्यकलेसाठी अतिशय 'मौल्यवान' असल्यामुळे असे खडकांचे मौल्यवान स्रोत (resource) 'वाया' न जाऊ देता खरंच इतरत्र शिल्पकलांसाठी आणि स्थापत्य रचनांसाठी वापरला गेला असेल तर, असा विचार त्या वेळी अंमलात आणणे हा म्हणजे आजच्या 'reuse' आणि 'recycle' ह्या आधुनिक पर्यावरण वादी तत्वज्ञानाचे आपले हे पूर्वज अभियंते हे जनकच होते असं म्हटल्यास वावगे ठरू नये.

तंत्रशुध्दता हा कैलास मंदिराच्या घडणावळीतला केवळ एक पैलू आहे. पण त्या स्थापत्य आणि तंत्र शास्त्राहून पुढे जाऊन जेंव्हा आपण कैलास मंदिराच्या अनुपमेय कलाकुसरीचा एक एक करत आस्वाद घेऊ लागतो तेंव्हा वेरुळातलं सोळाव्या क्रमांकाचं हे कैलास लेणं सौंदर्यशास्त्राचं अखंड ग्रंथालयचं असल्याचा आपल्या हळू हळू आभास होऊ लागतो. एका प्रस्तरातून वर आकाशापासून पासून ते पृथ्वी पर्यंत कोरत आणलेलं हे मंदिरांच शिल्प अनेक हत्तींच्यावर विराजमान असा रथ असावा असा आभास निर्माण करतं. मंदिराच्या उत्तरेस महाभारतातील तर दक्षिणेस रामायणातील कांडांची आणि युद्धांची विविध शिल्पे कोरली आहेत. दिशांचं महत्व असं की, महाभारतातील युद्ध हे भारतीय उपखंडाच्या आणि पर्यायाने कैलास मंदिराच्या उत्तरेस घडलं तर रामायणाचे युद्ध हे भारतीय उपखंडाच्या आणि ह्या मंदिराच्या दक्षिणेस घडलं. कसा काय हा कल्पनाविष्कार सुचला असेल सौंदर्यशात्राच्या ह्या पुजाऱ्यांना कोण जाणे? मंदिराच्या दक्षिणेस आणि उत्तरेस ज्या देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत त्यातही एक वैशिष्टय पूर्ण असा संदेश आहे. मंदिराच्या उत्तरेकडे शैवांच्या तर दक्षिणेकडे वैष्णवांच्या देवता कोरलेल्या आहेत. तत्वज्ञानांनुसार हिंदूंच्या 'शैव' (शिवाची आराधना करणारे उत्तरेकडील कडील लोक ) आणि 'वैष्णव' (विष्णू ची आराधना करणारे दक्षिणेकडील लोक ) ह्या दोन भक्तिपंथातील अनुयायांना एकत्र आणणारा 'संधी-प्रदेश' म्हणूनही हा वेरूळ चा (आणि एकंदरीतच महाराष्ट्राचा हा भूभाग ) भौगोलिक दृष्ट्या महत्वाचा मनाला गेला असावा. कारण राष्ट्रकुटांची त्या वेळी राज्यविस्तारासाठी उत्तरेकडे 'कन्नोज' ची लढाई सुद्धा केली आणि गुर्जर आणि प्रतिहार घराण्यांना ही आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी प्रयत्न केले. पण उत्तरेतील 'शैव' आणि आणि दक्षिणेतील 'वैष्णव' ह्यांच्या देवतांचा कैलास मंदिरातील मिलाफ हा त्या वेळच्या राज्यकर्त्यांच्या एकंदर दृष्टिकोनाबद्दल बरंच काही सांगून जातो.

मंदिराच्या उत्तरेस आणि दक्षिणेस प्रत्येकी एक स्तंभ, मंदिराच्या छतावर वर्तुळाकार असे चार सिंह, आणि त्या व्यतिरिक गाभाऱ्यात आणि मंदिराच्या विस्तीर्ण पटांगणात कोरलेल्या मुर्तीं मग ती गणेशाची असो , हिरण्यकश्यपूचा वध करणारी विष्णूच्या नरसिंह अवतारा तली असो अथवा अर्धनारी नटेश्वराची, असो! प्रत्येक मूर्ती त्या वेळच्या ह्या शिल्पकारांच्या करांगुलीमध्ये वसलेल्या सरस्वतीची जाणीव, ठायी ठायी प्रत्येक रसिकाला करून देतात. दूर दक्षिणेकडून हजारो मैलांचा प्रवास करून हे मूर्तिकार इथं वेरुळात आले आणि त्यांनी हा महाराष्ट्रातील लेण्यांचा इतिहास घडवला असं मानलं जातं कारण ह्या पद्धतीच्या मंदिरांच्या रचना ह्या केवळ दक्षिण भारतात पाहायला मिळतात.

पण हा सर्व सौंदर्याचा वाहता जिवंत आणि खळाळणारा झरा पहात असताना ह्या मूर्त कलेच्या आविष्काराला क्रूर इतिहासाचं गालबोट लागलेलं पाहून मात्र मन:पटलावर ओरखडे पडल्याशिवाय राहत नाहीत. एतददेशीय इतिहासाचं गूढ आणि शृंगारपूर्ण सौंदर्य. आणि त्या सौंदर्याला शाप असावा तशी त्यांची भग्नता ह्या दोन्ही एकाच ठिकाणी दृष्टीस पडल्यावर मनाची एक शब्दबद्ध न करता येण्या जोगी अशी खिन्न आणि विचित्र अवस्था होऊन जाते. ह्या अर्धवट भग्न मूर्ती मात्र कधी कधी खायला उठतात. कधी शांत वाटणारा अंगावर हिरवट निळसर वलयं ल्यालेला कातळ, चटकन धाय मोकलून आक्रन्दू लागेल की काय अशी भीती वाटू लागते. इथल्या विवस्त्र ललनांच्या मूर्तीं त्यांच्या भग्न शरीराचा इतिहास मोठमोठ्याने आपल्याला सांगू लागतील की काय ह्या विचाराने चटकन आपल्या अंगावर काटा कधी उभा राहतो ते समजत नाही.

ते काहीही असो. राष्ट्रकूटांनी चालुक्यांवर मिळवलेल्या विजया नंतर पुढील दोनशे वर्ष जवळ जवळ अर्ध्या भारतवर्षावर राज्य केलं आणि आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा पुढील पिढ्यांसाठी मागे ठेऊन गेले - सहस्रकाहून अधिक काळापर्यन्त. राष्ट्रकूटांचं आणि कलेचं एवढं जवळचं नातं कशामुळे? त्यांच्या कारकिर्दीत कला एवढी एवढ्या विमुक्त प्रमाणात कशी काय प्रसवली? म्हणजे ही कला आणि हे स्थापत्य त्यावेळच्या संपन्नतेचं आणि प्रागैतिहासिक जाणिवांची प्रतीकं आहेत का ? आपल्याला त्या घडवलेल्या प्रस्तरातून आपल्या पूर्वजांना पुढील सहस्त्र पिढयांना जे काही सांगायचे होते सांगायचे होते ते सगळे आपल्याला समजले आहे का की अजून बरेच काही समजायचे बाकी शिल्लक आहे? आणि जर समजायचे बाकी असेल तर मग त्या कोड्याची उकल कशी आणि कोण करणार ? की हे लेणं म्हणजे वर्तुळीय गणितातील कधीच न पूर्ण होणार ३.१४ चा 'पाय' सारखा न संपणारा अपूर्णांक आहे. जितका लिहीत जाल तितका वाढत जाणारा आणि कधीच न संपणारा? असे काही विवक्षित प्रश्न. किंवा - “जर हिंदू लेणी घडवताना बुद्ध आणि जैन लेणी भ्रष्ट केली नाहीत तर मग म्लेंच्छांना का एततदेशीय स्थापत्याच्या भग्नतेची विकृत बुद्धी सुचली?” असे काही शांत मनाला छेद देत जाणारे क्लेशकारी प्रश्न. वेरूळ ची लेणी पाहून झाली की डोक्यात वारूळ उरते ते ह्या आणि अश्या असंख्य प्रश्नांचे.

कुणी शृंगारावस्थेतील अर्धवस्त्रांगीनी, तर कुणी धीरगंभीर भावमुद्रेतील पवित्र वीणा वादिनी! कुणी तपस्वी पुरुष साधकाच्या मनस्थितीत तर कुणी युयुत्सु आणि मिलनासक्त कामदेवतांच्या अवस्थेत! ह्या मुर्तींमधील सर्वजण राष्ट्रकुटांचा आणि पर्यायाने आपल्या भारतवर्षाच्या इतिहास सांगत हजारो वर्षं ऊन वारा खात आणि पाऊस सोसत स्थितप्रज्ञ अवस्थेत उभे आहेत. अंधुक प्रकाशातील अश्या असंख्य गूढरम्य मुर्त्या पाहून बरेच वेळानंतर बाहेर शुभ्र उन्हात पडल्यावर मग मात्र कित्येक वेळ मनातलं पिंपळ पान ह्या सहस्त्रका हून पुरातन अश्या इतिहासाच्या पुस्तकात बराच वेळ रेंगाळून राहते. बऱ्याच न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरे मनात पिंगा घालत असताना राष्ट्रकुटांनी कोरलेल्या मूर्ती मनात आभासी का होईना पण कायमच्या घर करून आपल्याबरोबरच परतीच्या प्रवासाला निघाल्या सारख्या वाटू लागतात ! वेरूळ मधलं कैलास लेणं हे असं मानवाच्या उत्क्रांतीतील आणि हजारो वर्षांच्या ‘ज्ञातअज्ञात’ इतिहासातील अत्यंत मौल्यवान अश्या जाणिवांचं एक सौंदर्यपूर्ण असं अस्फुट दालन आहे.

चारुदत्त रामतीर्थकर.
पुणे , १५ डिसें. १९

तळटीप : लेखक इतिहासाचा विद्यार्थी अथवा अभ्यासक नाही. वेरूळ ह्या महत्वाच्या पर्यटन स्थळाला केवळ एक साधा 'पर्यटक' म्हणून भेट दिली असता त्या पर्यटनाच्या अनुषंगाने 'पाहिलेल्या' आणि 'वाचलेल्या' संदर्भांनुसार केलेलं हे एक केवळ ललित लेखन आहे.हा अभ्यास निबंध नाही. त्या अनुषंगाने लेखनात काही चुका/त्रुटी निदर्शनास आल्यास जाणकारांनी जरूर निदर्शनास आणून द्याव्यात. त्यांची दखल घेऊन त्या निश्चित दुरुस्त केल्या जातील. तसेच प्रतिक्रिया देताना वाचकांनी टोकाची धार्मिक विधानं टाळावीत. केवळ इतिहास समजून घेणे हाच ह्या लेखना मागचा चा एकमेव प्रामाणिक हेतू आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वय', 'समज' आणि ‘सौंदर्यदृष्टी' ह्या तीन गोष्टींतली घनिष्टता स्वतःची स्वतःलाच लक्षात आली.. >>> इथेच अहा: झालं. त्यामुळे आधीच प्रतिसाद दिला. आता पूर्ण वाचते. नेहमीप्रमाणे सुंदर असणार लेख.

बदलत्या वयानुसार, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोनही, आमूलाग्रतेने बदलत जातो.>>
अगदी पटले! लेखही आवडलाच. (बहुधा : स्मित )अर्ध्यापेक्षा अधिक जगून झालेले असल्यामुळे या वाक्याचा प्रत्यय आताशा सतत येतो.
वेरूळच्या थोर शिल्पकारांच्या कलाकृतींचे वर्णन करायला शब्द थिटे पडतात पण तुम्ही फार सुंदर भाषेत आढावा घेतला आहे. काही प्र चिंचा समावेश करता आला लेखात तर आणखी छान होईल.

ललित लेख म्हणून आवडलाच. शिवाय प्रतिसादांत मतं व्यक्त व्हावी ही अपेक्षाही उत्तमच.
आपल्याकडे चित्र नसतील तर मायबोलीने एक ओपन कॉमन लायसन साईट काढली आहे. त्यात चित्र कशी टाकायची, वर्गीकरणातून शोधायची हे शोधतो आहे. मी थोडी कर्नाटकातील चित्रं टाकली होती.
---
>>यवनांना का इततदेशीय स्थापत्याच्या भग्नतेची --->>यवन शब्द ग्रीकांना वापरलेला सापडतो.
कैलाशसारखेच अजून एक शिल्प दक्षिणेकडे मदुराई - कन्याकुमारीच्या दरम्यान कालुगुमलाय इथे आहे.

वय बदलेल (खरं तर ‘वाढेल’) तसं, त्या बदलत्या वयानुसार, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोनही, आमूलाग्रतेने बदलत जातो. >> अगदी खरं. वेरुळला मीही शाळेत असताना एकदा गेले होते. परत कॉलेजला असताना जेव्हा गेले तेव्हा जास्त चांगल्या प्रकारे त्याकडे बघता आलं. आता एकदा परत जायला हवं. लहानपणी बघितलेले गड-किल्लेही परत बघायला हवेत.
चालुक्य आणि राष्ट्रकूट, शिलाहार, सातवाहन हा सगळा इतिहास अजिबातच माहिती नाही. फक्त घराण्यांची नावं माहिती आहेत. तुम्ही लिहिल्यामुळे थोडा तरी समजला. Happy

'मुर्त्या' खटकलं . मूर्ती या शब्दाचं अनेकवचनही मूर्तीच. एक मूर्ती, अनेक मूर्ती.
उत्तरेकडे शैव आणि दक्षिणेकडे वैष्णव हे नक्की बरोबर आहे का? मला वाटतं की उलटं असावं.

चालुक्य आणि राष्ट्रकूट, शिलाहार, सातवाहन हा सगळा इतिहास अजिबातच माहिती नाही.

शाळेत मोहेंजो दडो ते हा इतिहास पाचवी सहावीत जास्ती समज नसताना पाठ्यपुस्तकांत उरकतात. नंतर सातवी ते दहावी थोडे समजू लागते तेव्हा परकी आक्रमणे, फ्रेंच राज्यक्रांती, महायुद्धे वगैरे. त्यामुळे चालुक्य सातवाहन वगैरे गायब.

लेख आवडल्याच्या प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे धन्यवाद !

@चंद्रा : मी छायाचित्रकलेत एवढा प्रवीण नाही. कोणत्याही पर्यटन क्षेत्री गेल्यावर मला ते दृश्य डोळ्यात साठवून घ्यावंसं वाटतं. छायाचित्रं काढण्याचं मुळातंच कसब अंगी नसल्यामुळं असेल कदाचित पण , ह्या एखाद्या वास्तूचं अथवा शिल्पाचं छायाचित्रं काढावं असं चटकन ध्यानातंच नाही येत. आयुष्यात प्रयत्न करूनही एक 'न' उमगलेली कला म्हणून कायमच ही खंत उरेल आणि उत्कृष्ट छायाचित्र करांच्या बद्दल आदर (आणि हेवा) दोन्हीही वाटत राहील.

@Srd >>यवन शब्द ग्रीकांना वापरलेला सापडतो.<< अच्छा. माझ्या मते परकीयां वंशाच्या लोकांना 'सरसकट' "यवन" हे संबोधन दिलं असावं. कारण इंग्रजांना सुद्धा कधी तरी 'यवन' असं संबोधल्याचं मलाही कुठेतरी वाचनात आल्याचं स्मरतंय.

@वावे >>'मुर्त्या' खटकलं . मूर्ती या शब्दाचं अनेकवचनही मूर्तीच. एक मूर्ती, अनेक मूर्ती.<< तुमचं सूक्ष्म वाचन आणि नोंद आवडली. भाषेचे अभ्यासक नक्की तुमच्या निरीक्षणास सहमत होतील. त्या अनुषंगाने मी वर दुरुस्ती करत आहे. पण जर 'आरती' चं बहुवचन 'आरत्या' आणि 'पणती' च बहुवचन 'पणत्या' होत असेल तर 'मूर्ती' चं बहुवचन 'मुर्त्या' का होऊ नये. ही सगळी 'नाम'च आहेत. असो व्याकरणातील नियमाचा हा कदाचित 'अपवाद' असेल ! मी दुरुस्ती करत आहे.

छान लेख जमला आहे.

शाळेत नुसत्या सन-सनावळ्यांमध्ये इतिहास वाचला आहे. असे बाकीच्या गोष्टींमध्ये त्याचा कसा परिणाम झाला - काय काय नविन निर्मीती झाली हे आता वेगळे वाचूनच कळते. नाही तर आपले सन ८०० मध्ये राष्ट्रकुट राजे होऊन गेले येवढीच माहिती.

खूप सुंदर वर्णन ..

मी छायाचित्रकलेत एवढा प्रवीण नाही. कोणत्याही पर्यटन क्षेत्री गेल्यावर मला ते दृश्य डोळ्यात साठवून घ्यावंसं वाटतं. छायाचित्रं काढण्याचं मुळातंच कसब अंगी नसल्यामुळं असेल कदाचित पण , ह्या एखाद्या वास्तूचं अथवा शिल्पाचं छायाचित्रं काढावं असं चटकन ध्यानातंच नाही येत. आयुष्यात प्रयत्न करूनही एक 'न' उमगलेली कला म्हणून कायमच ही खंत उरेल आणि उत्कृष्ट छायाचित्र करांच्या बद्दल आदर (आणि हेवा) दोन्हीही वाटत राहील.>> अहो कशाला खंत करता. सगळ्यांना सगळ्या गोष्टी जमल्याच पाहिजे असं कुठे आहे. तुम्ही इतका सुंदर लिहिता कि आपल्याला का असं लिहायला जमत नाही, अशी माझ्यासकट कितीतरी जणांना खंत वाटत असेल.
एखाद्या स्थळाला भेट देताना त्या ठिकाणची अभ्यासपूर्ण निरीक्षणं करणे आणि आपल्याला आलेला अनुभव इतरांबरोबर वाटणं कि कला सुद्धा वाखाणण्याजोगी आहे.

मोबाइलमध्ये फोटो काढण्याची सोय झाली आणि सर्वजण छायाचित्रकार झाले.
कारण फोटो सुंदर होण्यासाठी तो १) आठवण म्हणून काढलेला असतो,
२) योग्य वेळी शटरचे बटण दाबावे लागते,
३) कित्येक फोटो भराभर काढून नंतर हवा तो ठेवता येतो.
हे सर्व मोबाइलमुळेच शक्य झाले.

अप्रतिम.. मनापासून लिहिलं आहे.. आवडलं.
पायची ऊपमा चपखल.

उत्तरेकडे शैव आणि दक्षिणेकडे वैष्णव हे नक्की बरोबर आहे का? मला वाटतं की उलटं असावं. >> देवांच्या लॉजिकने तरी बरोबर आहे.
शैवांचा पूज्य देव ऊत्तरेकडे कैलास पर्वतावर आणि वैष्णवांचा दक्षिणेकडे सागरात.

यवन शब्द ग्रीकांना वापरलेला सापडतो>> बलपूर्वक लुटालूट वगैरेंच्या संदर्भाने असेल तर म्लेंच्छ. जसे आपण सगळ्या गोर्‍यांना फॉरेनर म्हणतो त्या अर्थाने अपल्यापेक्षा वेगळा दिसणारा बाहेर प्रांतातला म्हणून बहुधा यवन वापरतात.

वेगवेगळ्या वयात प्रत्येक अनुभूतीचा वेगळ्या दर्जाचा आनंद मिळतो . पु. ल. चे हरितात्या तरूणपणी धडपड्या मनुष्य वाटायचा तर आता एक विरागी साधक वाटतो.
वेरूळचे ते अद्भूत सौंदर्य पहाताना , आपल्या जगून झालेल्या जगरहाटीचे आपल्या द्रुष्टीत उतरलेले परिमाण , त्या शिल्पाच्या व्यक्तित्वाचा ज्यास्त ज्यास्त खोल ठाव घेत जाते.
तुमचे या सार्‍या अनुभवाचे कथन शिल्पाच्या सौंदर्याला साजेसेच झाले आहे.
वा:

हं अगदी बरोब्बर "म्लेंछ" अत्यंत चपलख शब्द. "यवन" पेक्षा म्लेंछ म्हणणे जास्त योग्य ठरेल. धन्यवाद "हायझेबनर्ग" ! आता तशीसुद्धा दुरुस्ती वर मूळ लेखात केलेली आहे, तुम्ही सुचवलेल्या शब्दा प्रमाणे.

@वावे , शैव आणि वैष्णव यांचा उत्तर आणि दक्षिण ह्या दिशाही संदर्भ योग्य आहे, त्यात कुठे गफलत नाहीये. "हायझेबेर्ग" केलेलं स्पष्टीकरण सुद्धा अगदी हेच सांगतंय.

@पशुपत : अगदी योग्य आणि समर्पक उदाहरण, जे काताळातल्या शिल्पांना लागू तेच साहित्यातल्या व्यक्तिरेखांना सुद्धा !

@बन्नू , धन्यवाद तुमच्या टिप्पणी बद्दल. अगदी योग्य आहे, सर्वच कला अंगी असायला हव्यात ही अपेक्षाच अवास्तव आहे. A picture is worth thousand words हे जरी सत्य असलं तरी टाकाने उमटलेल्या शब्द सुमनांनी सरस्वती ची जेवढी काही म्हणून आराधना हातून घडेल तेवढं पुण्य ही पदरी मिळेल...त्यामुळे हे ही नसे थोडके !

लेख आवडल्याच्या नोंदीकरिता पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.