भिजून गेलो

Submitted by निशिकांत on 14 December, 2019 - 00:12

असाच कोठे तरी जायचे म्हणून गेलो
आठवणींची रिमझिम आली, भिजून गेलो

दार तुझ्या स्वप्नांचे टकटकताना कळले
झोप तुझीही सखे हरवली, निघून गेलो

झंझावाती चाहुल नाही कशी लागली?
जरी कैकदा मनी तुझ्या वावरून गेलो

नकोस समजू भल्या पहाटे, तुला टाळले
सूर्य उगवता, धुक्यासवे मी विरून गेलो

मस्ती होती मला स्वयंभू मी असल्याची
तू गेल्यावर क्षणात एका सरून गेलो

देहदान केल्यावर माझ्या ध्यानी आले
सर्वार्थाने मृत्यूनंतर जगून गेलो

मुखवट्याविना जसा पाहिला मूळ चेहरा
मलाच माझी घृणा वाटली, दुरून गेलो

सुशिक्षितांची ओढत री, मतदाना दिवशी
मित्रांसोबत सहलीला मी निघून गेलो

फरपट होती माझ्याही "निशिकांत"जीवनी
पण तिरडीवर जाताना मी सजून गेलो

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users