माझं दप्तर झालयं..!!

Submitted by अमृत जोशी on 13 December, 2019 - 11:16

माझं दप्तर झालयं..

एखादी कविता जेव्हा,
अर्थाशिवाय वाचतो मी.
जरी त्यातला प्रत्येक शब्द,
स्मृतीमध्ये भरतो मी.

तेव्हा भरत असतो दप्तरात, मी कवितेच पान..!

हलकाफुलका विनोद,
मनात असते नोंद-वही..
विनोद कळतो मला,
हसणं तरी फुलत नाही..

तेव्हा भरत असतो दप्तरात, मी विनोदाची जाण..!

माणसातच आहे देव,
जर मानला तर.
पैसे देऊन देवळात दर्शन,
घेतो जोडून कर.

तेव्हा भरत असतो दप्तरात, मी डोळसपणाचं भान..!

लाच देणं वाईट,
काम कितीही अडलं जरी..
मी चारल्याशिवाय राहत नाही,
पासपोर्ट, लायसन्ससाठी तरी.

तेव्हा भरत असतो दप्तरात, मी तत्वांची शान..!

जातीभेद विसरावा हे
पक्क असतं ठाऊक.
पण जातीबाहेर लग्नाविषयी.
अजून होतो भावूक.

तेव्हा भरत असतो दप्तरात, मी समानतेचं गान..!

मला कविता वळत नाही..शब्द-स्मरण असून ..
मला हसणं जमत नाही.. जरी विनोद समोर बसून..

मी डोळस होत नाही..आत दृष्टी असून..
तत्वसुद्धा पाळत नाही..माहितीत सारी असून..

समानता मी मानत नाही..मनात खोल पटून..
अर्थ लावत नाही त्याचा, जे आत असतं साठून..

खूप मला वळत नाही, जरी आतून असतं कळून..
दप्तराला कुठे येतो का हिशेब..खिशात गणिताच पुस्तक धरून?

खरचं,
माझं दप्तर झालय....!!

Group content visibility: 
Use group defaults