येशील का ग एकदाच परतोनी तू आई

Submitted by दत्तप्रसन्न on 13 December, 2019 - 00:33

सवेंचि उघडी लोचन मी सकाळी
असायचीस तू काढीत रांगोळी दारी
बिलगून तुला पाठीशी घट्ट मी राही
स्वर्गीय ती मिठी वाटे पुन्हा हवीशी
येशील का ग एकदाच परतोनी तू आई...

काहीच न बोललो तरी तुला सर्व कळायचे
कधी उदास कधी थाऱ्यावर चित्त ते नसायचे
फिरायचे अशावेळी हात तुझे पाठीवरी
प्रेमळ थाप ती वाटे पुन्हा हवीशी
येशील का ग एकदाच परतोनी तू आई...

कधी उशिर आणि कधी गडबड किती
धांदल ती उडे वरी चिडचिड वेगळी
तोंडात दोन घास बळेच तू भरविशी
पोटातली ती भूक वाटे पुन्हा हवीशी
येशील का ग एकदाच परतोनी तू आई...

तिन्हीसांजेच्या कातरवेळी मन गलबलून जाई
हुरहूर अनामिक कसलीतरी कंठ दाटून येई
शिकवलीस शुभंकरोती प्रसन्नता चित्तास देई
वंदनासाठी पाऊले तुझी वाटे पुन्हा हवीशी
येशील का ग एकदाच परतोनी तू आई...

दमली काया गात्रे शीणली
कधी हुंदका कधी नेत्रातून झिरपे पाणी
कुशीत तुझ्या शिरोन द्यावे झोकूनी
शांतगाढ झोप वाटे पुन्हा हवीशी
येशील का ग एकदाच परतोनी तू आई...

Group content visibility: 
Use group defaults

खूप भावनाप्रधान.. खरंच बऱ्याचदा वाटतं आजकाल, परत लहान होता आलं, परत आपल्या आईच्या हातून जेवता आलं तर, मार खाऊन का होईना, पण शांत निजता आलं तर किती बरं होईल. असो...