आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आहे का ?

Submitted by सुबोध खरे on 12 December, 2019 - 01:38

हि १९९९ च्या मी महिन्यातील गोष्ट आहे.मी विशाखापटणमच्या नौदलाच्या कल्याणी या रुग्णालयात काम करीत होतो. कारगिलचे युद्ध ऐन जोरात होते.
त्यावेळेला काश्मीरच्या लष्करी रुग्णालयात युद्धात जखमी झालेले जवान मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत होते त्यामुळे ती रुग्णालये (श्रीनगर, उधमपूर आणि जम्मू येथील) भरून गेली होती.त्यातून त्या जखमी रुग्णांचे नातेवाईक तेथे येऊ लागले होते. या सर्व गर्दीमुळे तेथील व्यवस्थेवर ताण पडू लागला होता. म्हणून आता नंतर येणाऱ्या रुग्णांवर जलदगतीने उपचार करण्यासाठी वैद्यकीय प्रशासनाने एक निर्णय घेतला कि जे जे जवान प्रवास करू शकणार होते आणि ज्यांची जायची तयारी होती. त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्या त्यांच्या मूळ राज्यातील लष्करी रुग्णालयात स्थानांतरीत करण्यात यावे.
या प्रणालीत एक हवालदार श्रीनिवास राव म्हणून एक जवानाला (तेलुगु असल्याने) विशाखापटणमच्या नौदलाच्या कल्याणी या रुग्णालयात स्थानांतरीत(trasnfer) केले होते. हा श्रीनिवास राव याच्या पोटात गोळी लागल्याने त्याच्यावर श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात शल्यक्रिया करण्यात आली होती. सुदैवाने त्याची जखम वरवरचीच होती त्यामुळे शल्यक्रियेत पोटात फारशी हानी झालेली नाही असे आढळले होते.
त्यामुळे त्याला फारसा त्रास न होता तो आमच्या रुग्णालयात आला होता. त्याच्या शल्य क्रियेला ७ दिवस झाल्यावर त्याची जखम भरत आल्यावर आमच्या सरांनी (सर्जन कमांडर ओबेरॉय) यांनी त्याला ४ आठवड्याची विश्रांती (sick leave) देण्याचा निर्णय घेतला.पण श्रीनिवास राव त्यावर अजिबात आनंदी नव्हता. त्याचा मावस भाऊ (cousin) वेंकट राव आमच्या रुग्णालयात माझा वैद्यकीय सहाय्यक (क्ष किरण तंत्रज्ञ) म्हणून होता. त्यामुळे वेंकट माझ्या कडे श्रीनिवास रावला घेऊन आला.श्रीनिवास चे घर काकिनाडा च्या जवळ कुठल्या तरी गावात होते पण तो घरी जाण्यास मुळीच तयार नव्हता. त्याचे म्हणणे असे होते कि माझी रेजिमेंट तिथे युद्धात तैनात असताना मी घरी जाऊन आराम कसा करू शकतो?
मी त्याला विचारले कि तू तर आताच शल्यक्रियेतून उठला आहेस तर तू युद्ध कसा करणार आहेस? त्यावर त्याचे म्हणणे हे होते कि युद्ध सामग्रीचे हिशेब आणि लेखाजोखा ठेवायला माणूस लागतोच. हे काम मी करू शकेन म्हणजे रेजिमेंटचा एक सैनिक युद्धासाठी मोकळा होईल. पोटात गोळी लागून सुटीवर पाठवत असताना याला युद्ध यावर जायचे होते. त्याच्या अशा निग्रही बोलण्याबद्दल मला त्याचा फार आदर वाटत होता.

मला मुळात असा नुकताच शल्यक्रियेतून उठलेल्या माणसाला परत युदधावर पाठवणे पटत नव्हते पण श्रीनिवास इतक्या निग्रहाने सांगत होता कि मी ओबेरॉय सरांशी रदबदली करायला तयार झालो. ओबेरॉय सरांची अवस्था सुद्धा माझ्यासारखीच होती त्यामुळे ते पण तयार नव्हते पण केवळ श्रीनिवासच्या निग्रही बोलण्याने ते अतिशय अनिच्छेने तयार झाले. त्यावर श्रीनिवास अतिशय आनंदात होता.

श्रीनिवास मला परत परत धन्यवाद देत होता आणी मला अतिशय शरम वाटत होती कि युद्धावर तो जाणार होता आणी तो मला धन्यवाद देत होता. त्याला ओबेरॉय सरांनि रुग्णालयाच्या ऑफिसातून वार्रंट घेऊन आपले जम्मू पर्यंत आरक्षण करायला सांगितले. त्याप्रमाणे त्याने आपले वार्रंट घेतले पण मुळात मी महिना असल्याने लष्करी कोटा आधीच फुल होता. त्याची विनाआरक्षण जायची तयारी होती. पण मी त्याला निक्षून सांगितले कि विनाआरक्षण मी तुला पाठवणार नाही. आपले आरक्षण दाखव आणि मगच तुला डिसचार्ज देईन.

त्यावर मी त्याला एक सरकारी कागदावर रेल्वे च्या आरक्षण पर्यवेक्षकाला आरक्षण देण्यास विनंती करणारी चिट्ठी लिहून दिली कि हा सैनिक कारगिलला जात आहे त्याला आरक्षण देण्यात यावे.श्रीनिवास वेंकटला घेऊन विशाखापटणम रेल्वे स्टेशन वर गेला. दुर्दैवाने तो आरक्षण पर्यवेक्षक सुट्टीवर होता. त्यावर वेंकट त्याला घेऊन एका (तिकीट तपासनीसाकडे) TTE कडे गेला. त्या TTE ने त्यांच्या कडे दोनशे रुपये मागितले. वेंकट ने त्याला वारंट आणि मी दिलेली चिट्ठी दाखवली आणि सांगितले कि हा युद्धासाठी चालला आहे, सुट्टीवर मजेसाठी नाही त्यावर त्या TTE ने त्याला हे सांगितले कि तुला आरक्षण हवे असेल तर दोनशे रुपये दे .आतातर आमचा पैसे कमावण्याचा काळ आहे (मे महिन्याच्या सुट्टीचा काळ) तर उगाच जास्त वाद घालू नकोस. मला वेळ नाही. दोनशे रुपये काढ आणि परवाचे आरक्षण घेऊन जा.

यावर ते दोघे दोनशे रुपये देऊन ते आरक्षण घेऊन आले. श्रीनिवास नाही नाही म्हणत असतानाही वेंकट ने मला हि गोष्ट सांगितली. संतापाने माझ्या अंगाची अतिशय लाही लाही झाली. पण माझा संताप नपुंसक होता.

माझ्या मनात श्रीनिवासला दोनशे रुपये द्यावे असे आले. पण एकतर त्याने ते घेतले नसते आणि त्याचा अपमानही झाला असता. अधिकारी असूनही मी एका सैनिकाला मदत करू शकलो नाही याची लाजही वाटत होती.

याच वेळी माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला कि सर्वसामान्य भारतीय म्हणुन आपले चारित्र्य काय आहे?

२) तेथेच काम करीत असताना आमच्याकडे समुद्रावरील चांदीपूर आणी गोपालपूर(chandipur on sea आणी GOPALPUR on sea) येथून सैनिक रुग्ण म्हणून येत असत. हा भाग ITR (INTERIM TEST RANGE) म्हणून अग्नी पृथ्वी इत्यादी क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यासाठी होता. हा भाग समुद्राच्या जवळ असल्याने दलदलीचा होता त्यामुळे तेथे डास खूप होते आणी पूर्ण काळजी घेऊनही थोडे फार सैनिक मलेरियाची शिकार होत. दुर्दैवाने तेथे FALCIPARUM मलेरिया फार होता आणी मधून मधून एखादा सैनिक मेंदूत मलेरिया झाल्याने किंवा मलेरियाचा मूत्रपिंडावर प्रभाव झाल्यानेBlackwater fever( http://en.wikipedia.org/wiki/Blackwater_fever) तेथील रूग्णालयातून आमच्या कडे अतीव दक्षता विभागात स्थानांतरीत होऊन येत असे. असा तातडीचा रुग्ण येत असे तेंव्हा तो रुग्णवाहिकेतून येत असे त्यावेळेला बहुतांशी त्याची पत्नीनेसत्या वस्त्रानिशी त्याच्या बरोबर येत असे.
आता हा माणूस अतिदक्षता विभागात भरती झाला कि त्याच्या बायकोला त्या विभागातील रुग्णाच्या नातेवाईकांना असलेल्या विश्रामगृहात खोली दिली जात असे या खोल्यांचा प्रभारी अधिकारी मी होतो. बर्याच वेळेला या स्त्रीया केवळ नेसत्या वस्त्रानिशी आणि जुजबी पैसे घेऊन आलेल्या असत आणी काही दिवसात त्यांचे पैसे संपत. नवरा अतिदक्षता विभागात, खिशात पैसे नाहीत, रूग्णालयात ओळख नाही अशा बिकट परिस्थितीत मी पाच सहा स्त्रियांना तीनशे चारशे रुपये खिशातून काढून दिले होते.

१९९९ साली हि रक्कम मला पण कमी नव्हती परंतु एकाही स्त्रीने माझे पैसे बुडवले नाहीत. महिन्या दोन महिन्यांनी का होईना पण कोणातरी सैनिकाच्या हाती हे पैसे येत असत ( हे अंतर सहाशे ते साडे सहाशे किमी असावे).

एकीकडे अशी माणसं आणि दुसरीकडे अशीही माणसं पाहिली.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

राज्य घटनेत सर्व प्रश्नांची उत्तर आहेत.
Tn शेषन साहेब च्या अगोदर निवडणूक म्हणजे एक लोकशाही च्या नावावर चाललेला एक तमाशाच होता.
निवडणूक कशी घ्यावी ह्या विषयी जे निर्देश होते त्याला कचऱ्याची टोपली दाखवली होती.
पण शेषन साहेब आले आणि घटनेनी दिलेल्या अधिकाराचा पूर्ण वापर करून निवडणुकीचे स्वरूपच बदलून दाखवले.
समाजात निरनिराळ्या वृत्तीचे लोक असतात.

बहुसंख्य समाज भ्रष्टाचारी आणि स्वार्थी असताना त्याच समाजातून आलेला एकच घटक या सगळ्यापासून अलिप्त आणि पवित्र आहे असे मानण्याचा भोंदुपणा हे आपले राष्ट्रीय चारित्र्य आहे.

कारगिल युद्धाच्या वेळी वेगवेगळ्या भागातून दिल्ली, अंबाला कॅण्ट आणि जम्मूपर्यंत रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. यातल्या ब-याचशा गाड्यांमधे डिफेन्स कोटा होता. संरक्षण मंत्री क्जॉर्ज फर्नांडीस यांनी ट्रूप्सच्या तत्काळ मूव्हमेंटसाठी रेल्वे ला व्यवस्था करायला लावली होती.

मुंबई , पुणे सारख्या स्टेशनात एम सी ओ कार्यालय सतत गजबजलेलं असायचं. अंबाला, चंदीगड इथेही सैनिकांसाठी वेगळी व्यवस्था होती. याशिवाय सिव्हीलिअन कोट्यातही व्यवस्था केली गेली होती.

रेल्वे युद्धाच्या वेळी आर्मीला खूप महत्वाचे सहकार्य करते. त्यात काही चुका होतात तेव्हां त्यांना ऑडीटला ही सामोरे जावे लागते. ही कामाची पावती असते.
https://cag.gov.in/sites/default/files/audit_report_files/Chapter_3_ARMY...

एमसीओ कार्यालबाबत माहिती
https://cag.gov.in/sites/default/files/audit_report_files/Chapter_3_ARMY...

स्लीपवर क्लास असलेल्या ट्रेन्स मधे तर रेल्वेने ऐनवेळी चार चार डबे जास्तीचे लावले होते. ज्यादाच्या ट्रेन्स सोडल्या. थर्ड एसी किवा सेकंड एसी एण्टायटल असलेल्यांना थोडा प्रॉब्लेम येत होता. बाकी रेल्वेची व्यवस्था अत्यंत चोख होती. युद्धाच्या काळात कर्मचा-यांनी देखील देशप्रेमाच्या भावनेने भारून खूप काम केले.
एखादा किडलेला असेल. असे सर्वत्रच असतात. अगदी सैन्यातही असतात. कारगिल वॉरमधेच एका कर्नल कडे पाकिस्तानी नोटा सापडल्या होत्या.
युद्ध संपल्यानंतर आणि ती लाट ओसरल्यावर मात्र सहकार्य नसेल मिळाले. ऑगस्ट महीन्यापासून जखमी कैदी यायला सुरूवात झाली होती. परतापूर , ह्युंडेर इथल्या मिलिटरी हॉस्पिटलमधे अत्यवस्थ रूग्णांवर उपचार झाले. काहींना चंदीगढ ला हलवले होते. इंडीयन एअर फोर्सने सुद्धा खूप सहकार्य केले.

रेल्वे बाबत गौरवास्पद लेख एका वर्तमानपत्रात आल्याचे आठवते.

आपली प्रचंड लोकसंख्या, त्यामानाने कमी असलेली साधन संपत्ती, आपल्यावर असलेली कित्येक शतकांची गुलामगिरी त्यामुळे मला पण मिळेल, पुरेसे आहे, मला काळजी करायची गरज नाही ही भावना आपल्यात आतूनच नाहीये. देशाची परिस्थिती सुधारली की अशी अपेक्षा करूया की लोकं पण बदलतील.

घटना 1999 सालची म्हणजे बाजपेयीं भाजपा काळातली,

म्हणजे वाजपेयी काळात देशास चारित्र्य नव्हते की काय ?

मूळ मुद्दा समजून घेतला नाही असे वाटते.

यात रेल्वे वर टीका नाही किंवा आर्मीची भलावण नाही.

लष्करी जवानांच्या बायका या सामान्य घरातून आलेल्या( बहुसंख्य या खेड्यातूनच आलेल्या असतात) असतात आणि त्या फारच क्वचित लष्करी वातावरणात किंवा शिस्तीत राहतात तरीही प्रामाणिकपणे पैसे परत करताना आढळल्या.

याउलट एकदा सत्ता हातात आली कि त्याचा गैरवापर (मग तो आर्थिक कारणासाठी / कोणत्याही कारणासाठी असो) करण्याची वृत्ती का होते?

घटना 1999 सालची म्हणजे बाजपेयीं भाजपा काळातली,

म्हणजे वाजपेयी काळात देशास चारित्र्य नव्हते की काय ?

ब्लॅक कॅट

तुमचे डोके सरळ चालतच नाही का?

>याउलट एकदा सत्ता हातात आली कि त्याचा गैरवापर (मग तो आर्थिक कारणासाठी / कोणत्याही कारणासाठी असो) करण्याची वृत्ती का होते?>> कारण सत्ता माणसाला भ्रष्ट करते. ही शक्यता गृहित धरुनच व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर होवू नये यासाठी नियम, पडताळणी, तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही याची वारंवार जाणीव करुन देणारी सक्षम यंत्रणा आवश्यक असते. मात्र अशी यंत्रणा कार्यक्षमतेने चालण्यासाठी सामान्य नागरिकाचे जागरुक असणे देखील तितकेच आवश्यक आहे. मी नियम मोडणार नाही आणि इतरांनी मोडले तर आवाज उठवणार असे बहुसंख्य नागरीकांनी केले तर फरक पडतो. अमुक एक अधिकारी लाच खातो हे माहित असताना सगळ्यांनी मिळून तक्रार करण्या ऐवजी जर का लाच देवूनच काम होईल हे गृहित घरुन लोकं निमुटपणे लाच देणार असतील तर तोच शिष्ठाचार होणार. 'माझ्या गावात लाच मागायचे धाडस कुणीही करत नाही' असे अभिमानाने सांगण्याइतपत नागरीकांचा अंकुश हवा.
अमेरीकेतील वास्तव्यात जाणवलेली गोष्ट - रोजच्या वावरात, सरकारी कामकाजात अडवणूक होत नाही. कारण नागरीक तक्रार करतील, त्याची दखल घेतली जावून चौकशी होईल, गैरवर्तनाची शिक्षा होईल याची बहुतेकांना खात्रीच असते. तरीही संधी मिळाली की गैरवर्तन घडते. अशावेळी तक्रार करणे, पाठपुरावा करणे होवून शिक्षा होते तसेच व्यवस्थेत असलेल्या त्रुटींचा कशाप्रकारे वापर झाला याकडे लक्ष देवून त्या दूर करायचा प्रयत्न केला जातो.
तुम्ही वर टीटीइ चे उदाहरण दिले आहे. तर 'हा आमचा कमाईचा सिझन आहे' असे उघडपणे , मग्रुरीने बोलणे हे व्यवस्था किती पोखरलेली आहे हेच दाखवते. ही वरकमाई होते कारण बहुसंख्य लोकं असे पैसे देतात. आता एकदा भ्रष्ट वर्तन आहे म्हटल्यावर, देशासाठी लढणार्‍या, सीमा सुरक्षित राखणार्‍या जवानालाही लुटायला लाज कसली वाटणार?

सुबोधजी, छान लेख! राष्ट्रीय चारित्र्य (किंवा त्याचा अभाव) बरेच वेळा जाणवतो. मला एका निवृत्त सेनाधिकार्याचं भाषण कारगिल युद्धानंतर ऐकलेलं आठवलं. ते म्हणाले होते की सैनिकांविषयीच्या तुमच्या कृतज्ञतेच्या जाणीवा युद्धकाळात जरा होल्ड वर ठेवा आणी युद्धज्वर ओसरल्यावर त्या प्रकट होऊ द्या. त्यावेळी त्या जवानांना आणी त्यांच्या कुटुंबियांना त्याची अधिक गरज असते.

समाजात रामायण महाभारत काळापासून दोन भिन्न शक्ती कार्यरत असलेल्या आढळून येतात, वाईट आणि चांगली माणसे समाजातच असतात , वाईट लोक आहेत म्हणून सज्जनांना किंमत आहे नितीवान व भ्रष्ट हे जे समाजाचेच दोन घटक असल्याने आहे ते स्विकारने भागच आहे.ही व्यवस्था कधिच सुधारणार नाही.

समाजभान दुर्दैवाने खूप कमी आहे भारतामधे.. दुसऱ्याचा विचार करणे माहीत च नसते कित्येकांना.....राष्ट्रप्रेम असेल तरच समाजाचा विचार करणार ना....वाईट वाटले ती घटना वाचून.

खरे सांगायचं झाले तर हा देश भौगोलिक म्हणजे फक्त भौगोलिक प्रदेश आहे.
पाहिले भारतीय आणि नंतर स्वतःची ओळख हे फक्त कागदावरच वाक्य आहे.
प्रत्येक्षात असंख्य गट आहेत आणि त्या असंख्य गटाचा अस्ताव्यस्त पने एकत्र केलेला समूह म्हणजे भारतीय नागरिक.
देशावर बिलकुल प्रेम नसलेला आणि फक्त नाटकी प्रेम व्यक्त करणारा समाज.
ब्रिटिश लोकांनी त्यांच्या सोयीसाठी ह्या विविध गटा ना प्रशासनिक हेतू नी एकत्र आणले .
नाही तर असा एकसंघ प्रदेश एका राजवटी खाली कधीच आला नसता माझे स्पष्ट मत आहे भारताला कोणतेच राष्ट्रीय चरित्र नाही .

Rajesh188 यांच्याशी सहमत. त्यांनी जे लिहिले ते खरेच आहे. राष्ट्र हा विचार आपल्याकडे नाही, त्यामुळे चारित्र्य कुठून असणार?

युद्धजन्य स्थितीत सैनिकांबद्दल गळा काढायची पद्धत आहे, पण त्यानंतर शून्य. सैनिकसुद्धा सैनिक होतो तो फक्त देशप्रेम आहे म्हणून नाही. अर्थात कित्येकजण देशासाठीच सैन्यात जातात, त्यांना देश म्हणजे सर्वस्व वाटते, सर्वोच्च त्याग करायची तयारी असते हे सत्य आहे, अशा लोकांबद्दल आदर आहेच, त्या त्यागाची तुलना नाही. पण बरेच जण सैन्यात 'शिरा' हे वाचून जातात हेही खरे आहे. Happy Happy तसे नसते तर सैन्यभरतीसाठी हजारो रुपये दिले गेले नसते.

आता अकाली गेलेल्या सैनिकांसाठी एका वेबसाईटवर आपण पैश्यांची मदत करू शकतो. तिथे मदत करणारे खूप आहेत. पण तरीही सार्वजनिक जीवनात वागताना 'हा माझा देश, मी याचे देणे लागतो' ही भावना जवळजवळ नाहीच.

ते म्हणाले होते की सैनिकांविषयीच्या तुमच्या कृतज्ञतेच्या जाणीवा युद्धकाळात जरा होल्ड वर ठेवा आणी युद्धज्वर ओसरल्यावर त्या प्रकट होऊ द्या. त्यावेळी त्या जवानांना आणी त्यांच्या कुटुंबियांना त्याची अधिक गरज असते.
>>>>>>+१

तुमचे डोके सरळ चालतच नाही का?

नवीन Submitted by सुबोध खरे on 12 December, 2019 - 18:15. >>

जाऊद्या भाऊ, त्याच्या डोक्यात मेंदूच्या जागी अरबस्तान मधील वाळू भरलेली आहे.

म्हणजे भाजप काळात जास्त भ्रष्टाचार होता का?
नवीन Submitted by बोकलत on 12 December, 2019
म्हणजे भाजप काळात जास्त भ्रष्टाचार होता का?
नवीन Submitted by बोकलत on 12 December, 2019
>>> हे असे सुटिये माबोवर असल्याने चांगले लिहिणारे लोक इकडं येत नाहीत.

बहुसंख्य लोक काही जाज्वल्य देशप्रेम म्हणून लष्करात भरती होत नाहीत. त्यात मी सुद्धा आहेच.

मी एक चांगले मेडिकल कॉलेज म्हणून ए एफ एम सी ला गेलो. ते आवडले म्हणून नौदलात कमिशन घेतले. अन्यथा एम बी बी एस झाल्यावर ७५००० भरून मला बाहेर पडता आले असते. तेवढे पैसे माझ्या आईबापांकडे होते सुद्धा.

परंतु एक चांगले करियर म्हणून मी लष्करात गेलो.

आपण सर्व जितके देशभक्त आहात तितकाच मी देशभक्त आहे.

देशभक्तीहि कोणत्याही सेवेची मक्तेदारी नाही.
परंतु लष्कर आणि इतर सेवा यात एक मूलभूत फरक आहे आणि तो म्हणजे तेथील प्रशिक्षण आणि विचार सरणी.

जसे न्यायासन आपल्या सामाजिक प्रतिमेबद्दल जागरूक आहे तसेच लष्कर सुद्धा

कारण या दोन्ही सेवांकडे सामान्य माणूस "शेवटचा उपाय" म्हणून पाहत असतो. त्यामुळे आपली प्रतिमा मलिन होऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न या दोन्ही सेवात केला जातो.

१८ वर्षाचा राजाराम चव्हाण किंवा शिवाजी कदम भरती होतो तो बहुधा एक सन्माननीय सरकारी नोकरी म्हणून.
पण लष्करात भरती झाल्यावर त्याला प्रशिक्षण दिले जाते कि स्वतःच्या अगोदर कर्तव्य आणि स्वार्थाअगोदर देशकर्तव्य. यामुळेच तुटपुंजी शस्त्रास्त्रे आणि जेमतेम सुखसोयी असतानाहि हीच सामान्य माणसे जीवावर उदार होऊन लढतात आणि असामान्य शौर्य दाखवतात.
लष्करातही भ्र्रष्टाचार आहे परंतु तो बऱ्याच वरच्या पातळीवर आहे आणि त्याचा सामान्य सैनिकाला त्रास होत नाही. नुसतेच असे नाही तर आपण भ्रष्ट नसलात तर लष्करात आपल्याला कोणताही त्रास होत नाही.

अशी स्थिती बऱ्याच सरकारी नोकऱ्यांत नाही. तेथे आपण स्वच्छ असलात तर ते आपल्या वरिष्ठ आणि कनिष्ठ दोन्ही पातळीवर पचत नाही.

भ्रष्ट पना किंवा बेइमानी ही माणसाच्या माणसाच्या स्वभावात असते (रक्तात असते असं ही म्हणू या) कोणत्या प्रशिक्षणे प्रामाणिक पना स्वभाव मध्ये येत नाही पण majburi मुळे तात्पुरता येवू शकतो.
जो मुळातच प्रामाणिक आणि कर्तव्य nisht आहे तो कोणत्या क्षेत्रात काम करत असला तरी तसाच प्रामाणिक असतो.
आणि जो मुळातच भ्रष्ट आणि कर्तव्य nisht नाही तो संधी मिळाली की त्याचा फायदा उचलतो.ह
आपल्या सैन्य दलाची संख्य करोडो मध्ये असेल मग हेच जेव्हा माजी सैनिक होतात आणि समाजाचा भाग होतात तेव्हा कोणतेच भ्रष्ट काम करत नाहीत असे दिसत नाही.
सामान्य लोकांसारखे लाच देवून काम करून घेणे,जमिनी हाडपणे , गुंडा गर्दी करणे ह्या सर्वात सहभागी असतात.

>>लष्करातही भ्र्रष्टाचार आहे परंतु तो बऱ्याच वरच्या पातळीवर आहे आणि त्याचा सामान्य सैनिकाला त्रास होत नाही. नुसतेच असे नाही तर आपण भ्रष्ट नसलात तर लष्करात आपल्याला कोणताही त्रास होत नाही.>>
केवळ स्वतः भ्रष्ट नसणे पुरेसे असते का की इतरांच्या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करणेही अपेक्षित असते? वरच्या पातळीवर असाल आणि भ्रष्ट नसाल तर काय? खरे तर सामान्य सैनिकाला खरेच वरच्या पातळीवरच्या भ्रष्टाचाराचा त्रास होत नाही असे समजणे याला भाबडेपणा म्हणावे का की सारवासारव . काही झाले तरी भ्रष्टाचाराचा त्रास झिरपत खालपर्यंत पोहोचणारच ना!

सैनिक निवृत्त झाला की त्याला नागरी जीवनात एकजीव व्हायला फार त्रास होतो. 15 वर्षे आपण बंदूक चालवायचे प्रशिक्षण घेऊन उत्तम नेमबाज होता त्याचा नागरी जीवनात काडीचा उपयोग नसतो. त्यांना नोकऱ्या मिळतात त्या सुद्धा रखवालदार, खाजगी सिक्युरिटी एजन्सी मध्ये इ जेथे त्याला फार वाईट वागवलं जातं.हिडीस फिडीस केली जाते. जो माणसं भाबडी असतात तो उरी फुटतात आणि काही मग दारूच्या व्यसनात पडतात. असे अनेक निवृत्त सैनिक दुर्दैवाने दारूच्या व्यसनी लागलेले मी नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात पाहिले आहेत.
जी बिलंदर असतात ती इतर लोकांसारखी लबाड्या करणे लाच खायला घालून कामे करून घेणे हे लवकर शिकतात. सामान्य सैनिक शेवटी नाईलाज म्हणून यामध्ये पडतो. उदा स्वतःचे ड्राय व्हिंग लायसन्स काढण्यासाठी पैसे द्यावे लागतात. मिलिटरी ड्रायव्हिंग लायसन्स साठी त्याने 15 वर्षात एक दमडी दिलेली नसते.
रेशनकार्ड गॅस कनेक्शन काढण्यासाठी लष्करात एक पैसा द्यावा लागत नाही.
मी निवृत्त झालो 16 एप्रिल 2006 ला.
1 मे 2006 ला माझा भविष्य निर्वाह निधी माझ्या खात्यात जमा झाला, 1 जून ला संतोष फंड( gratuity) आणि 1 ऑगस्ट ला सुटीचे पैसे खात्यात जमा झाले. कुठेही पत्र ना लिहिता किंवा कुणाच्या मिनतवाऱ्या न करता. पैसे खायला घालणे तर स्वप्नात सुद्धा आले नाही.
ज्यांना विश्वास ठेवायचा आहे त्यांनी ठेवावा नाहीतर सोडून द्या!

चांगला विषय आहे. तुमचे अजुन काही अनुभव असतील जे गुप्त ठेवायचा नियम नसेल, असे अनुभव वाचायला आवडतील.

सुबोध खरे,
माझे जवळचे नातेवाईक सैन्यात होते. अगदी सैन्यातच जायचे हे सुरुवातीपासून ठरवून हे क्षेत्र निवडले. त्यांना जो अनुभव आला त्यावरुन मला पडलेला प्रश्न. माझ्या मते भ्रष्टाचाराच्या बाबतीत अमुक लेवलला नसाल तर असाल तर असे काही नसते. या ना स्वरुपात त्याची झळ लागतेच. मग ते कधी कमी दर्जाचे साहित्य असते तर कधी इतर काही.
बाकी पिएफ, ग्रॅज्युटी, उरलेल्या रजेचे पैसे हे हक्काचे. माझ्या कुठल्याच नातेवाईकाला मग तो सैन्यात असो वा नागरी नोकरीत, व्यवस्थितच मिळाले. त्यासाठी त्रास पडला नाही.

सैनिक निवृत्त झाला की त्याला नागरी जीवनात एकजीव व्हायला फार त्रास होतो. 15 वर्षे आपण बंदूक चालवायचे

एका सैन्य रिटायर्ड डॉकटरमुळे माझी एक नोकरी गेली, त्याची स्टोरी कधीतरी लिहीन

नागरी जीवनात एकजीव व्हायला त्रास होणे समजू शकते. हे सामावणे काहीसे सोपे होण्यासाठी काय उपक्रम उपलब्ध आहेत? सामान्य नागरीक काय मदत करु शकतात? वयाची अट शिथील करुन, ट्रेनिंग देवून पोलीस दलात नोकरी वगैरे असे काही शक्य आहे का? /केले जाते का?

काही निवृत्त सैनिकांना हत्यारी पोलीस म्हणून भरती मिळू शकते तर काही लोकांना सी आय एस एफ मध्ये लोकांची झडती घेणे सारख्या नोकऱ्या ही मिळतात. मागच्या आठवड्यात मी त्रिची ला रंगनाथ स्वामी मंदिरात गेलो असता तेथे मेटल डिटेक्टर ने तपासणी करणारे दोन पोलीस इंजिनियर रेजोमेंट मधून निवृत्त झालेले होते. पण एकंदर अशा जागा कमीच असतात
बाकी सैनिकांना निकृष्ट रेशन कपडे दारुगोळा मिळणे ही नित्याची बाब आहे त्यात त्यांचा काय दोष आहे? जे आहे त्यात काम चालवणे हा शिस्तीचा भाग आहे असे सांगून त्यांना गप्प बसवले जाते कारण लष्करी अधिकाऱ्यांच्या हातात सुद्धा काहीही नसते.

आता मी बरीच उदाहरणे माझ्या मित्राची बघितली आहेत .
20/२२ वर्ष नोकरी झाल्या नंतर नोकरी करण्या पेक्षा निवृत्त होण्यात जास्त आर्थिक फायदा.
निवृत्तीचे सर्व फायदे प्लस निवृत्ती वेतन ह्याचा हिशोब केला तर चालू पगार पेक्षा जास्त महिन्याला इन्कम होतो.
पहिला सैनिकांना पगार कमी होता त्या मुळे निवृत्ती वेतन आणि बाकी लाभ सुधा कमी होते पण आता निवृत्त झाल्या नंतर दुसरी किरकोळ नोकरीची काहीच गरज लागत नाही

माझया ऑफिसची सुजज्ज सुरक्षा यंत्रणा आहे. आणि त्यात खालच्या लेव्हलला जिथे दीर्घकाळ उभे राहावे लागते त्यात सगळे रिटायर्ड मिलिटरी जवान आहेत. वरच्या लेव्हला जे आहेत त्यांना ट्रेन करण्यासाठी स्वतःची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे जिथे मिलीतरीतले लोक त्यांना ट्रेनिंग देतात. सैन्यातून आल्यामुळे सेक्युरिटीला दीर्घकाळ ड्युटी करायची सवय आहे, शिस्त आहे व ते लोकांकडूनही तशीच शिस्त पाळवून घेतात. 15 ऑगस्ट/26 जानेवारीला पूर्ण पोशाखात परेड होते. त्यामुळे त्यांनाही अजून सैन्यात असल्यासारखे वाटत असणार. त्यांच्यामुळे कॅम्पसवर व्यवस्थित शिस्त असते. प्रशस्त मोकळ्या रस्त्यांवर लोकांच्या गाड्या शांतपणे 30 च्या स्पीडने जाताना बघून गम्मत वाटते. कॅम्पसच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही असलात तरीही 30 चे लिमिट मोडायची हिम्मत करू शकत नाही, कारण कुठल्या झाडामागे सेक्युरिटी स्पीडगन घेऊन उभा असेल सांगता येत नाही Happy Happy आता तर सेक्युरिटीचा ड्रेस घालून पुतळे उभे केलेत जागोजागी. कुठला सेक्युरिटी आणि कुठला पुतळा हेही कळत नाही.

बाकी वॊचमन, सेक्युरिटी, कचरेवाला इत्यादी लोकांना हिडीसफिडीस करणे हे आपले राष्ट्रीय चारित्र्य आहे.

Pages