समुद्र-शंखशिंपले

Submitted by सामो on 4 December, 2019 - 10:48

समुद्राची गाज ऐकणे हा तुझा आवडीचा छंदच होता म्हणा ना. आपण कॉलेजचे तास बंक करून समुद्रकिनार्‍यावर गाज ऐकत तासनतास घालवले आहेत. तुला समुद्र आणि आकाशाच्या शांत नीळाईची ओढ असायची. समुद्राचा धीरगंभीर आणि मर्यादाशील स्वभाव तुला आकर्षित करायचे.
याउलट समुद्रपक्षांची झेप, नारळीची झाडे, भणाणणारा खारा वारा हे माझे वीक पॉईंट्स असत. मला आकर्षक वाटणारी अजून एक गोष्ट जी केवळ माझ्या हट्टाखातर तू करत असे ती म्हणजे - चपला हातात धरून, मऊ मखमली रेतीतून चालणे. आठवतं तुला सुबक, कंगोरेदार , सोनेरी अथवा शुभ्र शंख-शिंपले मिळवण्यासाठी मी किती अट्टाहास करीत असे ते. गिर्रेबाज, जीन्यासारख्या दातेरी कडा कोरीवकाम असलेला शंख मिळवण्यासाठी माझा आटापीटा चालत असे.

तू मात्र मिष्कीलपणे माझी धडपड न्याहाळत म्हणत असे - "अगं वेडे पण नाही मिळाला शंख तर काय आभाळ कोसळणार आहे का?" आणि मी थोडी वैतागून म्हणत असे - "हो माझ्यावर कोसळणार आहे. मला सुंदरसा , पूर्ण आणि शुभ्र शंख तरी हवा नाहीतर जांभळी शिंपल्याची डबी तरी हवी, गुलाबी बसकट शंखही चालतील पण पूर्ण आणि मला आवडणारे हवे."

यावर का कोण जाणे थोडासा गंभीर होऊन तू म्हणत असे - "काही गोष्टी या शोधण्याच्या नसतात, खणून काढण्याच्या तर अजिबातच नसतात. जेव्हा समुद्राला इच्छा होइल तेव्हा तो त्याच्या पोटातून तुझ्या पायावर एक भेट आणून सोडेल. जितके शोधशील तितक्या तुझ्या भेटी तुझ्यापासून अधिक दूर पळतील." हा तुझा प्रतिवाद, हे तुझे तत्वज्ञान मला अजिबातच पटत नसे आणि मी अधिकच खणत असे, शोधत असे, हताश होत असे.
आता अर्ध्याहून अधिक आयुष्य सरल्यावर मला माहीतदेखील नाही तू कुठे आहेस, पण समुद्राची जागा प्रत्यक्ष जीवनाने घेतली आहे आणि शंख-शिंपल्यांची सुंदर नात्यांनी. अजूनही त्याच आसुसलेपणाने मी शोधते आहे आणि दर वेळेला रिकाम्या हाताने अन भरल्या डोळ्याने तुझे शब्द आठवते आहे-"काही गोष्टी या शोधण्याच्या नसतात, खणून काढण्याच्या तर अजिबातच नसतात. जेव्हा समुद्राला इच्छा होइल तेव्हा तो त्याच्या पोटातून तुझ्या पायावर एक भेट आणून सोडेल. जितके शोधशील तितक्या तुझ्या भेटी तुझ्यापासून अधिक दूर पळतील." . कधी? का माझ्यापाशी तुझ्या स्वभावातील शीतलता नाही? का मला शाप आहे -"सतत शोध घेण्याचा आणि न सापडण्याचा". दिवस न दिवस माझा त्रागा वाढतच आहे. रात्र रात्र माझ्या उशा अश्रूंनी भीजतच आहेत. मला मात्र खात्री आहे तू जिथे कुठे असशील समुद्र आणि आयुष्य शांतपणे उपभोगत असशील. असो, तू म्हणतोस तशी नि:संग होऊन वाट पहाण्याचा प्रयत्न करेन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान मुक्तक.

<<< दिवस न दिवस माझा त्रागा वाढतच आहे. >>>
आयुष्यात मग एक वेळ अशी येते की वाटते, शंख मिळाला काय आणि नाही मिळाला काय, कमीतकमी समुद्रकिनार्‍यावर छान चालता तर आले आणि तोंडावर येणारा तो वारा मस्तपैकी अनुभवता तर आला ना. त्यातून मग एखादा छोटासा शिंपला जरी मिळाला तरी शंखाहून गोड.

हाहाहा करेक्ट फार वर्षांपूर्वी हे मुक्तक लिहीलेले. आज मी फार समाधानी आहे. गेले ते दिन गेले.... आणि बरे झाले ते गेले Happy

चांगलं लिहीलंय!
"गेले ते दिवस"..हे बरं झालं... हवं ते सापडलं की आधीच्या भावना विरुन जातात. पण मनातली ती माणसं..त्यांच काय होतं?...याची उत्सुकता आहे. त्यावर काही लीहावंसं नाही वाटत?

आवडलं!

आयुष्यात मग एक वेळ अशी येते की वाटते, शंख मिळाला काय आणि नाही मिळाला काय, कमीतकमी समुद्रकिनार्‍यावर छान चालता तर आले आणि तोंडावर येणारा तो वारा मस्तपैकी अनुभवता तर आला ना. त्यातून मग एखादा छोटासा शिंपला जरी मिळाला तरी शंखाहून गोड.>> +१

खूप सुंदर लिहिलंय ..

आयुष्यात मग एक वेळ अशी येते की वाटते, शंख मिळाला काय आणि नाही मिळाला काय, कमीतकमी समुद्रकिनार्‍यावर छान चालता तर आले आणि तोंडावर येणारा तो वारा मस्तपैकी अनुभवता तर आला ना. त्यातून मग एखादा छोटासा शिंपला जरी मिळाला तरी शंखाहून गोड. >>
क्या बात है, हे पण आवडलं

छान लेख....माणसाचं आयुष्य असच असतं ना...सारखं कशा ना कशा पाठी धावत रहायचं.... सामो प्रतिसाद आवडला. बरं झालं गेले Happy

आयुष्यात मग एक वेळ अशी येते की वाटते, शंख मिळाला काय आणि नाही मिळाला काय, कमीतकमी समुद्रकिनार्‍यावर छान चालता तर आले आणि तोंडावर येणारा तो वारा मस्तपैकी अनुभवता तर आला ना. त्यातून मग एखादा छोटासा शिंपला जरी मिळाला तरी शंखाहून गोड. >> हे फार आवडले.

>>>>>>सारखं कशा ना कशा पाठी धावत रहायचं>>>>> येस!!! अगदी बरोब्बर!
______
सर्वांचेच ,प्रतिसादक, वाचक आभार.