निर्भया

Submitted by Asu on 1 December, 2019 - 01:31

प्रियांकावर हैदराबादला झालेल्या गॅंग रेपच्या निमित्ताने निर्भयाची आठवण झाली. आपल्याला क्षणाक्षणाला निर्भयाची आठवण होत रहावी असे प्रसंग पुन्हा पुन्हा घडतात यासारखे दुर्दैव नाही.
मी आतापर्यंत शक्य असेल त्या त्या वेळेस माझ्या लिखाणातून अशा नराधमांना लिंग विच्छेदनाची शिक्षा द्यावी असे सुचवलेले आहे. अशा शिक्षेमुळे अपराध्याला वैयक्तिक शिक्षा तर होईलच पण तथाकथित पुरुषत्वाची जखम आयुष्यभर चिघळत राहील आणि तो पुन्हा असा गुन्हा करू शकणार नाही. तसेच कमावता हात गमावून त्याच्या कुटुंबियांना त्याच्या या दुष्कृत्याची शिक्षा भोगावी लागणार नाही
.

निर्भया

मद्यधुंद नयन अंगारे
जाळीत होते त्रिभुवन सारे
तशात दिसली सुंदर हरिणी
खेळत होती हिरव्या कुरणी

घेरूनि त्या अल्लड तरुणी
करिती लांडगे विपरीत करणी
पाहुनी असहाय, केविलवाणी
त्वेषे गाती बिभत्स गाणी

जाळ्यात कधी चुकुनि पडता
होती गरीब बापुडवाणी
फुशारक्याही तरी मारिती
निर्लज्ज, नराधम, दीड शहाणी

नकोच शिक्षा कैदेची
सुधारण्याची भिक्षा कैची !
वासनांध हे लिंग पिसाट
छाटा यांचे लिंग सपाट

पुरुषार्थाचे लिंग झडू दे
जखम लज्जेची तशीच सडू दे
अद्दल घडू दे दुष्कर्माची
जिवंत मरणे जगण्याची

पुरुषा नाही लिंग शुचिता
फिरती मोकाट, नारी भोगिता
नाही नारी भोग्य, पतिता
विसरा आता योनी शुचिता

सीता, सावित्री आणि उर्मिला
नका आठवू वंद्य अबला
निर्भया तू अवतार सबला
दानव वधण्या जगी प्रकटला

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults