बेस कॅम्प डायरी भाग ६

Submitted by मधुवन्ती on 29 November, 2019 - 22:19

1.JPG

१२ ऑक्टोबर २०१४
-----------------------
कालचा दिवस आरामाचा होता. मी ‘कालापत्थर’ला जायचं रद्द करून लॉजवरच राहिले. आज परतीच्या प्रवासाला निघायचं होतं आणि सरळ ‘फेरिचे’ गाठायचं होतं. खाली उतरायचं असल्यामुळे चालणं कठीण नव्हतं. ग्लेशियर पार करून, डोंगर उतरून, लोबुचेला लवकरच पोहोचले. जवळच्याच एका लॉजवर ‘हॉट लेमन’ घ्यायला गेले आणि समोरच दिसली,माझ्या बरोबरच गोरकशेपला आलेली एक इस्रायली मुलगी. ती आता परतत होती आणि ऑक्सिजन मास्क लावून तिला बसवलं होतं. ‘हाय अल्टिट्यूड’मुळं तिला श्वास घ्यायला त्रास होत होता.तसंही रोजच rescue helicopters येता जाताना दिसत होती. बऱ्याच जणांनी गोरकशेपहून खाली उतरायच्या ऐवजी चार्टर हेलिकॉप्टर केलं होतं.

10.JPG

‘थुकला’ला पोहोचल्यावर थोडावेळ विश्रांतीसाठी थांबले, तर तिथंदेखील काही australian बायका अल्टिट्यूड सिकनेसने हैराण होत्या.जास्त वेळ तिथे न थांबता डोंगर उतरू लागले. साधारण तासाभरात फेरिचेला पोहोचले. सामान ठेवून थोडी भूक भागवल्यावर नुसतंच डायनिंग रूममध्ये बसून राहायचा कंटाळा आला होता. मग थोडी बाहेर पडले. आमच्या हॉटेलमालकाशी गप्पा मारत होते, तेव्हाच समोरून येणाऱ्या माणसाकडं बघून तो म्हणाला,"Oh! look who we have! peter!!" पीटर इटलियन होता आणि इथून जवळच असलेल्या ‘ग्लास पिरॅमिड’च्या ऑब्झर्व्हेटरीमधे शास्त्रज्ञ म्हणून काम करीत होता. नेपाळचा हा भाग म्हणजे त्याचे दुसरे घरच जणू. त्याची ओळख करून घेऊन त्याच्याशी गप्पा मारत असताना तो म्हणाला,"We are expecting a cyclone from India!....but you don't have to worry as you are going down!you will have some rains on the way!" ‘हुदहुद’ची ही पूर्वसूचना होती, हे नंतर काठमांडूला पोहोचल्यावर कळलं.आकाशाचे रंग बदलत होते. त्याचबरोबर समोर दिसणाऱ्या शिखरांवरदेखील सोनेरी रंग झळकत होता. "not everyone can see this beauty!" हे पीटरचं म्हणणं किती खरं होतं!

15.JPG

त्या सौंदर्याला जमेल तसं डोळ्यांत आणि कॅमेऱ्यामधे बंदिस्त केलं..हळूहळू अंधार वाढत गेला. परत डायनिंगमधे जाऊन व्हेज मोमोज खाता खाता इतर लोकांशी गप्पा चालू होत्या. तेवढ्यात जवळच्या medical post मधली एक डॉक्टर आली आणि तिने विचारलं,"anyone can speak and understand chinese here?" तिच्या दवाखान्यात एक चायनीज बाई अल्टिट्यूडचा त्रास होतो, म्हणून आली; पण तिला अजिबात इंग्लिश बोलता येत नव्हतं. अनुवादकाची मदत घेऊन डॉक्टर तिला समजवायचा प्रयत्न करत होती, कीपुढं जाणं तिच्या प्रकृतीच्या दृष्टीनं धोकादायक ठरू शकेल.तिनं खाली परत जाणं हितावह होतं; परंतु बाई हट्टी वाटत होती. तिला कोणत्याही परिस्थितीत वरपर्यंत जायचंच होतं...अशा किती जणांच्या आशा-आकांक्षा, अतिआत्मविश्वासाने क्षणात धुळीला मिळाल्या असतील! शेवटी निसर्गाचा यथोचित आदर करणंच आपल्या हातात आहे, हेच खरं! निसर्गाचा कौल मान्य करावाच लागतो.

१३ ऑक्टोबर २०१४
-----------------------

कालचं भाकीत ऐकून आम्ही आज लवकरच निघायचं ठरवलं होतं;कारण आज उतार असला तरी अंतरही खूप होतं आणि त्यामुळे वेळेत पोहोचणं आवश्यक होतं. फेरिचेहून निघालो, तेव्हा थंडी होती. सूर्योदय व्हायचा होता, म्हणून असेल असं वाटलं. आजचा आमचा मुक्काम होता ‘नामचे’ला. सरळ आणि दरीच्या कडेने जाणारी सुंदर वाट चालत ‘पांगबोचे’ला पोहोचलो. वातावरण ढगाळ होतं. सूर्यसुद्धा उगवल्यापासुन ढगाआडच होता. त्यामुळे थंडी जास्तच जाणवत होती. पीटरचे शब्द आठवले...वातावरण खराब व्हायला लागलं होतं, ‘पांगबोचे’ला उतरून ‘देबुचे’ला पोहोचले. हे एक छोटंसं गाव आहे. इथे खरं म्हणजे जेवायला थांबायला हवं होतं; पण झपाट्याने बदलत जाणारं हवामान बघून शक्य तितक्या लवकर पोहोचायला हवं, असं ठरवुन चालत राहिले. देबुचे ते ‘तेंगबोचे’ दरम्यान खूप दाट आणि सुंदर ऱ्होडोडेंड्रॉनचं जंगल लागतं.खूपसे पक्षी जणू माझ्यासाठीच समोरून उडत होते. हा रस्तादेखील फारशी वर्दळ नसलेला, ‘तेंगबोचे’नंतर ‘फोर्चे थांगा’ या नदीच्या जवळच्या गावापर्यंत तीव्र उतार आहे. उतार म्हटलं, की गुडघ्यांची वाट!! वर चढताना जितकं नाही, तितकं लक्ष उतरताना द्यावं लागत होतं. थोडं लक्ष इकडे तिकडे गेलं की पाय घसरलाच! त्यात बारीक बारीक पाऊसही सुरू झाला.थोडासा पडून थांबेल असं वाटणारा पाउस वाढतच चालला होता.शेवटी ‘फोर्चे थांगा’ला एका लॉजमधे थांबले.सकाळी ब्रेकफास्टनंतर पोटात काहीच नव्हतं. ‘हॉट लेमन’ मागवलं. हेतू हा, की तोवर पाऊस थांबतोय का ते बघावं. डायनिंग रूममधे एका मोठ्या जॉर्डनियन ग्रुपशी ओळख झाली. त्यांच्यातल्या ‘मझडेल’शी बराच वेळ गप्पा मारल्या.मी इंडियाहून आले आहे, म्हटल्यावर तिने सलमानखान,शाहरुखखान अशा स्टार व्यक्तींची नावे घेऊन हिंदी पिक्चर आणि कलाकार कसे फेमस आहेत, हे सांगितलं! सर्वांत लोकप्रिय कलाकारांमधे तिथेसुद्धा अमिताभ बच्चनचीच वर्णी लागलेय! ही मंडळीही ‘नामचे’ला निघाली होती. त्यामुळं मागून येणारं कोणीतरी आहे या मानसिक समाधानात त्यांचा निरोप घेऊन निघाले. पाऊस न थांबता उलट अजूनच वाढला होता. त्यामुळे माझा रेनकोट इरल्यासारखा चढवून चालायला सुरुवात केली. आता नदीवरचा पूल ओलांडून थोडा चढ चढून मग सरळ वाट होती. हा चढ वाटला होता त्यापेक्षा कमी होता आणि चालणं सुखकर होतं. पाऊस पडत असल्यामुळं हवामान थंडगार बनलं होतं आणी लवकरच सरळ वाटेला लागून डोंगरांमागुन डोंगर ओलांडणं चालू झालं. पुढचं वळण गेलं, की आलंच ‘नामचे’... असं वाटत होतं; पण ‘नामचे’चे ‘नामोनिशाण’ही कुठं नव्हतं.
बऱ्याच डोंगरांना वळसे घालून शेवटी पाच वाजता ‘नामचे’ला पोहोचले. आता पाऊस कमी होत होता. ‘नमस्ते लॉज’मधे पोहोचले, तेव्हा सणसणून भूक लागली होती. त्यामुळे गरमागरम fried Rice खाऊन अंधारू लागलेल्या ‘नामचे’ला खिडकीतून बघत वेळ छान गेला. आजचं हे लॉज घरगुती होतं. एका नेपाळी कुटुंबाने चालवलेलं. त्यामुळं त्यांचं बुद्धाचं प्रार्थनाघरसुद्धा बघता आलं. उद्या आम्ही ‘नामचे’लाच राहणार होतो.

12.JPG
१४ ऑक्टोबर २०१४
------------------------
एका दरीमधे खालून वर पसरलेल्या या गावात बरंच काही करण्यासाठी होतंआणि आमच्याकडे एक दिवस हाताशी होता. त्यामुळे लुक्लाला जाऊन थांबण्यापेक्षा‘नामचे’ला एक दिवस द्यावा, असं ठरलं. त्यामुळे एकूणच दिवस थोडा आरामातच चालू झाला. ‘साउथ वेल्श’चा एक ग्रुप ओळखीचा झाला होता. त्यांच्याबरोबर ‘एव्हरेस्ट ८८७८ कॅफे’मधे पिझ्झा पार्टी करून झाल्यावर मार्केटमधे फेरफटका मारला. थोडीशी खरेदी केली.आयरिश कॅफे नावाच्या एका पबमधे Into Thin Air बघायला गेलो. इन्स्टिट्यूटमधे हा चित्रपट बघितला होता आणि आपण हा कोर्स का करतोय, असा विचार क्षणभर मनात चमकून गेला होता. पहाडांमधे attitude आणि Ignorance घेऊन गेल्यावर काय भयंकर घडू शकतं हे दाखवणारी ही सत्य कथा. फार जुनी नाही...Rob Hall नावाच्या एका अतिशय कुशल गिर्यारोहकाचे प्रोफेशनल क्लायंट्स आणि एका हिमवादळात त्या सर्वांचा झालेला मृत्यू एका वास्तवाची जाणीव करुन देतो, ते म्हणजे इथे नियमांचं पालन काटेकोरपणे करावंच लागतं. पिक्चर संपवून बाहेर पडेपर्यंत पाउस सुरू झाला होता. आमचं लॉज तसं जवळच होतं. त्यामुळे पळत पायऱ्या चढायला लागले, तर जोरदार धाप लागली आणि मग लक्षात आलं आपण अल्टिट्यूडवर आहोत;समुद्रसपाटीवर नाही!!

20.JPG

उरलेली संध्याकाळ पावसाला सुरुवात झाल्यामुळे डायनिंग रूममधेच बसावं लागलं. बाहेर पाऊस वाढत होता आणि आम्ही गरमागरम जेवणाबरोबर ‘छांग’चे (तांदळाची दारू)घुटके घेत पावसाचा आनंद घेत बसलो होतो. आमच्या हॉटेलमालकाने हा पाऊस अजून ४-५ दिवस थांबणार नसल्याचं भाकीत केलं होतंच. पण तरीही आम्हाला उद्या ‘लुक्ला’ला पोहोचायला हवं होतं; कारण १६ तारखेचं आमचं परतीचं विमान होतं. त्यामुळे पावसाला म्हटलं, ‘आज रात्रभर जे पडायचं ते पडून घे रे बाबा! उद्या मात्र आकाश मोकळं असू दे!’

19.JPG

१५ ऑक्टोबर २०१४
-----------------------

सकाळी उठून पाहिलं, तेव्हा पाऊस थांबलेला होता आणि छान ऊन पडलं होतं. पावसानं आमचं ऐकलं होतं म्हणायचं! नाश्ता करून उतरायला सुरुवात केली. TIMS च्या चेक पोस्ट पाशीच आमची परमिट्स पुन्हा एकदा तपासण्यात आली आणि त्यांच्या वहीत ‘एक्झिट’ची नोंद केली. तिथेच ट्रेक पूर्ण केल्याचं certificate सुद्धा मिळत होतं.बराच उतार उतरून ‘फाकडिंग’ला पोहोचायचं होतं. वाटेत याक खेचरं आणि उतरणाऱ्या लोकांची अक्षरश: गर्दी झाली होती. त्यामुळे त्यातून वाट काढण्यात बराच वेळ गेला. फाकडिंगला पोहोचून कॉफी पिऊन परत वाटचालीला सुरुवात केली. लुक्लाची वाट उताराची असली, तरी अंतर बरंच होतं आणि अंधाराच्या आधी तिथे पोहोचणं आवश्यक होतं. मजल-दरमजल करत शेवटी एका ब्रिटिश आजोबांनी जेव्हा सांगितलं you are almost there!...तेव्हा थोडं बरं वाटलं.सहा वाजेपर्यंत ‘हॉटेल पॅरेडाइज’मधे पोहोचले. आज आमचा ट्रेक संपला होता. डायनिंगमधे बसले असताना बऱ्याच जणांशी ओळखी झाल्या. अमेरिकेचे रिक आणि लिसा दोन दिवसांपासून फ्लाइट्स नसल्यामुळे अडकून पडले होते. तीन युरोपियन मित्रांचाही बराच दंगा चालला होता. बराच वेळ त्यांच्याशी गप्पाटप्पा करण्यात गेला.गेल्या दोन दिवसांपासून धुक्यामुळे विमान उड्डाणे झाली नव्हती. उद्याचे आपले विमान वेळेत काठमांडूसाठी उडेल, अशी आशा करत बिछाना गाठला.

१६ ऑक्टोबर २०१४
-----------------------

आज जाग आली तीच विमानांच्या आवाजाने! जवळच असलेल्या एअरपोर्टवर पोहोचून चेक इन करून आमच्या नावाचा पुकारा होण्याची वाट बघत विमाने बघत बसलो.दोन दिवसांचा backlog असल्यामुळे बरीच गर्दी होती; तरीही इथले कर्मचारी व्यवस्थित कसलाही गोंधळ न होऊ देता सगळं सांभाळत होते.९.३० वाजता आमच्या विमानाचा क्रमांक पुकारला गेला आणि पुढच्या
दहा मिनिटांत विमान धावपट्टीवर उड्डाणासाठी तयार होतं. vertical drop असलेला take off अनुभवणंदेखील रोमांचक होतं.आमच्या विमानाने काठमांडूच्या दिशेने झेप घेतली होती आणि आम्ही आमच्या छोट्याशा विमानातून दिसणाऱ्या हिमाच्छादित शिखरांचं पुन:पुन्हा डोळे भरुन दर्शन घेत होतो.
... एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक करणं जर पंढरीच्या वारीला जाण्यासारखं असेल, तर एव्हरेस्ट चढून परत येणं म्हणजे सदेह वैकुंठाला जाऊन परत येण्यासारखं आहे.या सर्व एव्हरेस्टवीरांना सलाम!

काठमांडुला पोहोचलो मात्र, माझ्या मोबाईल वर सर्वांचे फोन येउ लागले,आमच्या खुशालीची चौकशी करणारे, तेव्हा कळले की दोन दिवसांपासुन आम्हाला संपर्क करण्याच्या प्रयत्नात सर्व होते परंतु पर्वतांमधे संपर्क होणे शक्य नव्हते,अन्नपुर्णा भागात मोठे हिमवादळ झाले होते आणि त्यात कित्येक गिर्यारोहक म्रुत्युमुखी पडले होते. हे वादळ खरेतर पीटर ने सांगितल्या प्रमाणे आमच्या वाटेवरच यायचे परंतु अचानक त्याची दिशा बदलली, हे सर्व आम्हाला मात्र इथले वर्तमानपत्र पाहुन कळले आणि मग त्याचे गांभिर्य लक्षात आले,आम्ही समजत होतो तितके हे
साधारण वादळ नव्हते तर!
आम्ही मात्र या सगळ्यातुन सुखरुप परत आलो होतो

21.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला मदत हवी आहे...एकच ब्लोग अनेकदा अपलोड झाला आहे, एक भाग सोडुन बाकिचे डीलीट करण्यासाठी काय करावं लागेल