ठेवला शब्दांवरी विश्वास आम्ही

Submitted by द्वैत on 24 November, 2019 - 14:58

ठेवला शब्दांवरी विश्वास आम्ही
सोसला आजन्म मग वनवास आम्ही

चेहरा ना वाचता आला कुणाचा
त्यामुळे ठरलो इथे नापास आम्ही

घेतले नाही कुणाशी वैर साधे
जाहलो नाही कुणाचे खास आम्ही

आखले भवती स्वतःच्या एक रिंगण
मोजला ना रिंगणाचा व्यास आम्ही

एकमेका टाळतो आता घरी पण
भेटतो रस्त्यामध्ये हमखास आम्ही

न्यायदेवानेच डोळे झाकल्याने
भोगतो आहोत कारावास आम्ही

चांगले आले दिवस देशास इतके
आवळूनी रोज घेतो फास आम्ही

जीवना घेऊ नको कुठली परीक्षा
मोजतो आहोत बाकी श्वास आम्ही

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users