गूज

Submitted by सामो on 23 November, 2019 - 03:50

आई तुझ्या चरणांची सेवा घडू दे
तुझ्यावरी आई माझा जीव जडू दे
कोल्यांची बाय तू लाडाची हाय
तुलाच माझ्या मनीचं ठाय
डोंगरावर तुझा दरबार भरू दे
तुझ्यावर आई माझा जीव जडू दे
लेकरांवर तुझी पाखर हाय
चंदनपालखी तुझी दिमाखात जाय
माणिकमोत्यांची फुलं तुला वाहू दे
चाफेनं आई तुझी परडी भरु दे
खणानारळानं तुझी ओटी भरीन
तांबुलविडा आई तुला अर्पिन
चरणांची आई तुझ्या सेवा घडू दे
तुझ्यावर बाय माझा जीव जडू दे
___________________________________
रेणु राजाची सुकन्या ऋषी जमदग्नींची भार्या
परशुरामाची जननी आई एकविरा भवानी
उधो उधो माझ्या अंबेचा दुर्गा भवानी कालिकेचा
________________________________________

अष्टमीच्या रात्री आभाळभर चांदण्यांची परडी उपडी होते. कार्ला गडावरती किर्रर्र काळोखाचं राज्य सुरु होतं. झोंबणाऱ्या वाऱ्याचे बोल तेवढे दर्याखोर्यात घुमत असतात. गडाभोवतालचं किर्रर्र रानही चिडीचूप निद्रेच्या आधीन झालंल असतं. त्या वेळी. गडावर चिटपाखरू जागं नसतं. गडावरच्या तलावात पडलेलं चंद्राचे प्रतिबिंब वातावरणाची गूढता अधिकच टोकदार करतं. अशा वेळी गडावर पाऊल ठेवण्याचं धाडस करू नका. आई ची चांदणझोका घेण्याची ही वेळ असते. जंगली श्वापदांच्या सान्निध्यात, पती काळभैरावासहित क्रीडेचा समय असतो. त्यात व्यत्यय आणण्याचे धैर्य मर्त्यच काय , अमर्त्य लोकांतही कोणास नाही.
हां पहाट फुटली झुंजूमुंजू होऊ लागलं कि गडाला जाग येईल. आईचा सौम्य रूपाचा समय. तेव्हा दर्शनाला जा. सुदैवी असाल तर तीच गर्दीतली एक होऊन तुमच्या भेटीला येईल. कासवी जशी तिच्या पिलांना नजरेनेच सांभाळते तशी सौम्य रूपातली आई तिच्या लेकरांवर मायेची पाखर घालत असते. उगीच तिला अनेकरूपा या नावाने शास्त्रकार संबोधत नाहीत.
तुम्हाला येणारा प्रत्येक अनुभव तिचा प्रसाद आहे. श्रद्धा ठेवण्या ना ठेवण्याने वास्तवात फरक पडत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

छान

>>>>>>>>>>रेणुकादेवी. माझ्या मामाचा गाव, माहूरगड.>>>>>>>>
वा!!!
अजिंक्यराव पाटील, परवा 'कुलदेवता' या सर्चने, युट्यूब विंचरुन काढली तेव्हा सापडले, की खण नारळाने आपण ओटी भरतोच. नैवेद्य दाखवतो पण जेवण केव्हा पूर्ण होतं तांबूलविडा अर्पण केल्यावरती. तेव्हा सर्व देवींना तांबूलविडा जरुर अर्पण करावा. त्यांना आवडतो असे एका शास्त्रकारांचे म्हणणे पडले.
डिसेंबरात, भारतात यायचे वेध लागलेत आणि आईच्या दर्शनाचेही.

आमच्या गावात, उन्हाळ्याचे गार वारे सुरु झालेले आहेत. रात्री खिडकी उघडी टाकून, पंखा लावुन निद्रेच्या आधीन होण्याचे दिवस. वाराही सुगंधाची लयलूट करणारा. आज 'झुलतो बाई रास झुला' गाणे ऐकता ऐकता कार्ला गडावर मनाने, पोचलेही. आईची तीव्र आठवण आली. खरं तर मनाला लक्ष डोळे फुटले आणि मीच महादेव होउन आईचे रुप न्याहाळले. ती तशीच चांदणझोक्यावरती, आत्ममग्न, अतिशय रुपवान, अशी भासली.मंत्रमुग्ध होउन गेले होते.

https://www.youtube.com/watch?v=i-Nk0DDicbE
______________
एकवीरा माऊलीची गद्य प्रार्थना-
चित्ते कृपा समरनिष्ठुरता च दृष्टा
त्वय्येव देवि वरदे भुवनत्रयेऽपि ॥
वात्सल्यामृत पाजुन लाडावणारी माऊली हे तुझे रुप डोळ्यांसमोर आणणे थोडे कठीणच. याउलट धाकदपटशाने, शिस्तीचा बडगा उगारुन , पापौघाचा नाश करणारी अशी वरवर कठोर , परंतु मनाने कोमल अशा रुपांत तू तुझ्या भक्तांना परिचित. जिथे समरांगणी आपल्या खड्गाने राक्षसांचा वध करुन , त्यांचे भले तू साधतेस तिथे तुझ्याच बालकांचे भले झाल्याशिवाय कसे बरे राहील! विष्णुदास तुला ‘विचित्र खेळ मांडणारी गारुडीण’ म्हणुन संबोधतात. जिथे आमची सर्वाधिक आसक्ती तेच विषय तू समूळ उखडतेस अशा रीतीने माझ्या पदरामध्ये घाललेले वीषसुध्दा मला मान्य. तू उन्हातान्हात रखडवलस तरी माझ्या तोंडुन अवाक्षर निघणार नाही. आधिव्याधी सर्व तुझा प्रसाद. माझी वणवण तुझी प्रदक्षिणा. गरुडीच्या पिल्लांला काळरुपी सर्पाचे भय ते काय. आणि हे सत्य कळण्याचतच जन्म गेले तरी पुन्हा उद्या मी हे सारं शहाणपण विसरुन जगापुढे तोंड वेंगाडणार आहेच. तेव्हा आता शुध्दीत असतानाच साकडं घालते आई तुझ्या वाटेवर आले आता मोकलु नकोस.
आदि शंकराचार्यांचेच शब्द उधार घेउन प्रार्थना करते - मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि ।
एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु ॥

छान लिहिलंय..
आईची सेवा करायला... ज्याच्याकडे जे आहे तेवढेही पुरते.
' तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी
सेवा मानून घे आई'

https://youtu.be/P3CVQ3Xx6pg

इवलासा पोपट झाले आणि भुर्रकन आईच्या मांडीवरती जाउन बसले. तिने कौतुकाने मला जवळ घेतले. नुकताच पावसाचा शिडकावा होउन पहाटे पहाटे परसभर प्राजक्त-चाफ्याचा सडा पडला होता. चटकन फूल बनुन आईच्या कोमल पावलांवर माथा टेकविला.तिला भूक लागली तेव्हा तिला तृप्त करणारा घास बनले. काळमुखात जायचे की आईचा प्रसाद ते तुम्हीच ठरवा. वय वाढेल तसे पिकल्या करवंदासारखे, गोड होत जायचे की कडू ते तुम्हीच ठरवा.