एक कविता कर्णासाठी ( वृत्त- भवानी)

Submitted by माउ on 22 November, 2019 - 21:06

एक कविता कर्णासाठी ( वृत्त- भवानी)

अस्वस्थ वाहती ध्यास तसे नि:श्वास नदीच्या काठी
वाळूत उभा रोखून भान विसरून कुणाच्या साठी

मायेने धरले हात थेंब डोळ्यात जन्मतः होते
आयुष्य कोरडे श्वास सजवते त्यास ऋणांचे नाते

चेहरा असा रेखीव चित्त संजीव सुवर्णी छाया
घामाची होती फुले कवचकुंडले शोभते काया

लेऊन भरजरी ऊन सूर्य घेऊन चालतो आहे
तो रोज जनांचे शाप जरी निष्पाप साहतो आहे

स्वप्नात चंद्रसावली मस्तकी धुली तिच्या चरणाची
आईने भरता साद त्यागले वाद वाट सरणाची

तो मृत्युंजय अनिमेष न ठेवी द्वेष क्षेत्री भारती
कोरून युगांवर नाव घेतसे ठाव स्वप्नसारथी!

-रसिका

Group content visibility: 
Use group defaults

वृत्तबद्ध कविता हा मला सर्वात जास्त आवडणारा प्रकार. तुमची शब्दपेरणी सुद्धा उत्तम आहे.
'वाह!' म्हणायला लावणाऱ्या अनेक जागा आहेत.
Happy

ओहोहो!! काय मस्त जमलिये. सुंदर!!
>>>>> लेऊन भरजरी ऊन सूर्य घेऊन चालतो आहे
तो रोज जनांचे शाप जरी निष्पाप साहतो आहे>>>>>>>>>