पुढचा प्रवास

Submitted by pkarandikar50 on 22 November, 2019 - 02:02

पुढचा प्रवास
काल किंवा कदाचित परवा असेल,
एक मोठी गंमतच झाली.
म्हणजे मला चक्क मरणच आले.
हो, अगदी खेळ खल्लास झाला.
मी आपला दुपारी निवांत घरी
आरामखुर्चीत पडून वाचत होतो काही बाही
तर एकाएकी अक्षरे अंधुक झाली,
काही दिसेनासे झाले.
मला वाटले, चष्म्याची काच पुसायला झालीय वाटतं
तशी कानात एक धीरगंभीर आवाज ऐकू आला,
“चल, आटप लौकर. संपला तुझा इथला मुक्काम.
निघायला हवं आपल्याला.”
माझी समजूत होती,माणसांना परलोकात न्यायला
काळेकभिन्न यमदूत येतात, रेड्यावर बसून,
पण इथे तर कुणीच दिसत नव्हते…
फक्त एक आवाज.
त्याला एक अलौकिक गंध होता आणि हळुवार स्पर्शही.
अंगावर सुखद रोमांच उठवणारा.
मी चमकून म्हटले,” म्हणजे,
निघायचं का मी, परलोकात जायला?”
किंचित हसून तो आवाज म्हणाला,
“हा आपला लोक, तो परक्यांचा लोक,
असं काही नसतंच. आपण सगळेच वाटसरू.
एक टप्पा गाठला प्रवासाचा की थोडा मुक्काम करायचा
नि परत निघायचं, पुढच्या प्रवासाला.”
हे सगळेच अचानक, अतर्क्य घडत होते, फारच घाईघाईत.
“ठीक आहे पण मला वेळ दे ना थोडासा,
निदान निरोप तरी घेऊ दे माझ्या माणसांचा.”
ह्यावेळी तो आवाज गालातल्या गालात हसत म्हणाला,
“ह्या मुक्कामी येते वेळी, कुणाची परवानगी घेतली होतीस
आणि निरोप कुणाकुणाचा घेतला होतास,
काही आठवतंय का तुला?”
माझ्याकडे काही उत्तरच नव्हते, तशी तोच पुढे म्हणाला,
“माणसं ही माणसंच असतात.
ही माझी माणसं, ती तुझी माणसं
अशी वाटणी करण्याचा अधिकार
तुला रे कुणी दिला?”
त्याच्याशी वाद घालण्यात काही अर्थच नव्हता,
हे एव्हाना आलेच होते माझ्या लक्षात.
मी चष्मा काढून ठेवला, ऊठलो,
एक आळोखा दिला आणि सवयीप्रमाणे
आरशात डोकावलो, केस ठीक करायला,
तर बेटा माझा चेहराच गायब झालेला.

(आगामी कविता-संग्रहातून)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

उत्तम !

मृत्यूचेही आपलेपणाने
स्वागत सुंदर केले आहे
मुखवटा माझा गळून गेला
मी मात्र तसाच उरलो आहे

छान