गिलहरियाँ

Submitted by विद्या भुतकर on 20 November, 2019 - 18:59

या वर्षी पोरांची शाळा सुरु झाली तेव्हाची गोष्ट. सुरु झाली एकदाची ! तीनेक महिन्यांच्या सुट्टीनंतर आम्ही 'सुटलो' अशा अविर्भावात होतो. खरंतर इथे नवीन वह्या-पुस्तकं, युनिफॉर्म या कशाचंच कुणालाच सोयरं सुतक नसतं. तरी मी आणि नवरा आपलीच शाळा सुरु झाल्याच्या उत्साहात असतो.एक दिवस, 'युनिफॉर्म नाहीत तर निदान नवीन चार कपडे तरी घ्यावे' म्हणून रविवारी दुपारी बाहेर पडलो. त्याच दिवशी स्वनिकने नवीन टुमणं सुरु केलेलं. या पोरांना रोज मागे लागायला काहीतरी कारण कसं मिळतं? त्याला कुठलातरी व्हिडीओ गेम हवा होता. आम्ही घेणार नाही ही खात्रीच त्यामुळे 'दोन महिन्यांनी वाढदिवसाला तरी घ्या असं' आतापासूनच सुरु केलं होतं. नेहमीप्रमाणे या सगळ्याकडे 'वेळ येईल तेव्हा बघू' म्हणून मी दुर्लक्ष करतच होते.

तर मी काय सांगत होते? हां, आम्ही कपडे घ्यायला बाहेर पडलो आणि स्वनिकने बोलायला सुरुवात केली,"आपण असं करू शकतो का? आपण घरातले काही विकू शकतो."

घरातल्या वस्तू विकायच्या म्हटल्यावर मात्र मी कान टवकारले, "म्हटलं काय विकणार? "

स्वनिक,"आमचे जुने toys विकू शकतो."

आणि इथेच माझी वाद घालायची खुमखुमी जागी झाली.

मी,"म्हणजे एकतर मी तुमच्यासाठी खेळणी घ्यायची. ती तुम्ही खेळणार नाहीच. शिवाय आपण १० डॉलरला घेतलेलं खेळणं तू समजा ५ ला विकलंस, तरी ५० टक्के नुकसानच ना?".

हे त्याला पटलं.

त्याने दुसरा पर्याय सांगितला," मग आम्ही तुमच्यासाठी काहीतरी काम करतो. Like getting plates for dinner, clean-up, अशी. आणि तुम्ही आम्हाला पैसे द्या."

मला मजा यायला लागली होती.

म्हटलं,"बाबू ही कामं तर तुम्ही घरी राहता म्हणजे केलीच पाहिजेत. तुम्ही मदत केली तर त्यासाठी पैसे का द्यायचे?".

माझ्या या युक्तिवादावर तो वैतागला. चिडून म्हणाला,"मग आम्हाला कसे पैसे मिळणार? मी काय तुमच्यासारखा जॉब पण करू शकत नाही. "

मला जरासं वाईट वाटलं. त्याचं म्हणणं बरोबर होतंच. I could understand his frustration. इतक्यात कपडे घ्यायला जाणार ते दुकान आलं. पण विषय सोडून जाता येणार नव्हतं. इतक्या वेळ गप्प असलेल्या नवऱ्याने यावर थोडी फिलॉसॉफी सांगण्याचा प्रयत्न केला.

तो म्हणाला,"हे बघ, तुम्ही काही चांगलं काम करता ना तेंव्हा ते आमच्या हार्टच्या गुड अकाउंट मध्ये जातं. तुला त्यासाठी पैसे मिळवायची गरज नाही. फक्त चांगलं काम करा."

आता यातलं आमच्या पोरानं फक्त कामाचं ऐकलं. तो म्हणे,"हां आपल्याकडे मनी बँक आहे. त्यात पैसे जमवू."

पैसे हातात द्यायची इच्छा नसल्याने मग आम्ही फक्त चांगल्या कामाच्या चिठ्ठ्या त्यांच्या बरणीत टाकायचं ठरवलं. आता हा संवाद दुकानात पोचला होता. कुठल्या रंगाची आणि आकाराची पँट त्याला बसते हे बघत असताना, मधेच याचं सुरु होतं.

"माझे आणि दीदीचे पॉईंट एकत्र करायचे. गेमसाठी ५८ लागतील, मग फक्त २९-२९ मिळायला हवेत. "

मी, "का पण? दीदीला व्हिडीओ गेम नको असेल तर? तिला दुसरं काही हवं असेल तर? "

तो,"ओके आपण दीदीचं अकाउंट वेगळं करू पण आम्ही आम्हाला पाहिजे तर एकत्र करू शकतो. "

मी,"बरं."

तो,"पण ५८ पॉईंट झाले की लगेच गिफ्ट घ्यायचं. बर्थडे ची वाट बघायची नाही." असं आमचं negotiation चालूच होतं.

मधेच नवरा,"बस की, बच्चे की जान लोगी क्या?" वगैरे कमेंट टाकत होता. चार कपडे घेऊन घरी परत आलो. आता इतकं ठरलं होतं की 'चांगलं काम केलं की पॉईंट मिळणार'. मग चांगलं काम म्हणजे काय? घरी आल्यावर दप्तर जागेवर ठेवलं, डबा धुवायला टाकला, १ पॉईंट. होमवर्क न सांगता केलं, १ पॉईंट, पियानो प्रॅक्टिस, कराटे प्रॅक्टिस एकेक पॉईंट. गणिताचे दोन पॉईंट... असं करत गेल्या काही दिवसांपासून आमच्या घरात पॉईंट्सनी धुमाकूळ घातलाय. पोरांनी एक चार्ट बनवला आणि त्यावर आम्हाला विचारुनच पॉईंट्स लिहिले.

दीदी मोठी असल्याने आणि तिचा या सिस्टीम (आणि आईबाबांवर) अजिबात विश्वास नसल्याने ती फारसा उत्साह दाखवत नव्हती. स्वनिकने मात्र स्वतःच काम शोधून 'मी सर्वांचे शूज आत ठेवले तर पॉईन्ट मिळेल का? ' वगैरे कामही करून टाकली. आता उद्यापर्यंत त्याचा हा तक्ता पूर्ण होईल. तर त्यांचं असं ठरलंय की या दोन तक्त्यांचे पॉईंट घेऊन व्हिडीओ गेम आणू आणि पुढचा तक्ता पुस्तकांसाठी ठेवू. 'खरंच हे पूर्ण केलं तर आपली आवडती पुस्तकंही विकत घेता येतील' या कल्पनेनं दीदीही एकदम आनंदात आहे. त्यांचा ठरवलेलं काम पूर्ण करत असल्याचा आनंद, आईबाबांच्या मागे लागण्याची चिकाटी, पुढेही काय काय करु शकतो याचा विचार आणि उत्साह पाहून मलाही आता ही अशीच सिस्टीम माझ्यासाठी बनवायची इच्छा होतेय. समोर एक ध्येय ठेवायचं, ते पूर्ण करायला कष्ट करायचे. ते पूर्ण झालं की नवीन ध्येय .....

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

IMG_2805.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तुमच्या पोराने जगाच्या अंतापर्यंत निगोसिएशन्स केल्याने मला फार्फार आनंद झाला आहे. Happy छान Happy

काय झेपलं नाय...

तुम्ही घरी राहता म्हणजे getting plates for dinner, clean-up अशी कामं/मदत केलीच पाहिजेत. त्यासाठी पैसे मिळणार नाहीत. पण

घरी आल्यावर दप्तर जागेवर ठेवलं, डबा धुवायला टाकला, होमवर्क न सांगता केलं, पियानो प्रॅक्टिस, कराटे प्रॅक्टिस, गणित ही मात्र 'चांगली कामं' आहेत. ती केल्यास पॉईंट्स (पैसे) मिळतील? का? कोणासाठी करताय ही 'चांगली कामं'? कोणाचा काय फायदा होतोय त्यातून?

जाऊदेत...

गिलहरियाँ शिर्षक का म्हणे?

विनंती -
हे घरगुती लिखाण/डायरी आहे असं शिर्षकातून किंवा पहिल्या वाक्यातून कळेल असं काही करता येईल का? मी बऱ्याच स्त्रीआयडींचं लेखन वाचणं बंद केलं आहे. तुमच्या नॉन-घरगुती लिखाणातून काहीतरी रोचक मिळते, मिळत राहील अशी आशा अजूनही आहे. शिर्षकातूनच लेखप्रकार कळला तर ते वगळून इतर लेख वाचता येतील.

छान आहे. स्वनिक हुशार आहे.
पॉईंट तक्ता छान आहे.
अ‍ॅमी, कधी कधी मुलांसाठी सुट द्यावी लागते. तुझंच तर दप्तर उचललंस, तुझाच डबा धुवायला दिलास मग कसले पॉईंट असं बोलण्यात पॉईंट नसतो. Happy

छान, मस्त कल्पना..
आपलं एक ध्येय निश्चित करून त्यासाठी हळूहळू कष्ट करायचे, झटायचं, हे विशेष आवडलं Happy

बहुतेक "खारीचा वाटा" म्हणून गिलहरियाँ असावं...
(रामानं खारीच्या पाठीवर तीन बोटं उठवली अशी आख्यायिका आहे. गेल्या पिढीच्या पालकांना बहुतेक तेच माहिती असावं. पाठीवर बोटं उठवल्याशिवाय कार्टी खारीचा वाटा उचलणार नाही!! Wink Happy नव्या पिढीची मज्जा आहे तक्ते नि गिलहरियाँ... Happy )

<<< मी बऱ्याच स्त्रीआयडींचं लेखन वाचणं बंद केलं आहे. >>>
अ‍ॅमीतै,
या वर्षी पोरांची शाळा सुरु झाली तेव्हाची गोष्ट. ..... यावरून कळायला पाहिजे होतं की घरगुती गोष्ट आहे.
तुम्ही विद्यातैंचं लेखन वाचणं पण बंद करायला त्यांची हरकत नसावी.

विद्यातै,
लेख आवडला. लेकाला थोडे बोनस पॉइंट पण द्या जरा, ही (त्याच्यावतीने) विनंती Wink आमचेपण निगोसिएशन्स Lol

विद्यातै,
लेख आवडला. लेकाला थोडे बोनस पॉइंट पण द्या जरा, ही (त्याच्यावतीने) विनंती  आमचेपण निगोसिएशन्स 

नवीन Submitted by उपाशी बोका on 22 November, 2019 - 03:19
+111

Lol..... किती क्यूट. हुशार आहे स्वनिक, या वयात पण मस्त निगोशिएशन स्किल्स आहेत. आणि न रडता चिडता आपल्याला हव ते व्यवस्थित चर्चा करून मिळवण खरच कौतुकास्पद.
बाकी ही पॉईंट सिस्टीम आमच्याकडे पण होती. वेगळ्या कारणासाठी. मुलांवर ही मस्त लागू होते.

आम्ही घेणार नाही ही खात्रीच >>>मला वाटले मीच जास्त कठोर मातृहृदयी आहे की काय जी मुलांच्या मागणीला लग्गेच हो म्हणत नाही
बाकी लेख मस्तच झालाय एकदम,मुळात तुमचे साधे घरगुती लेख पटकन रिलेट होतात त्यामुळेच जास्त आवडतात त्यामुळे लिहीत राहा Happy

पाठीवर बोटं उठवल्याशिवाय कार्टी खारीचा वाटा उचलणार नाही!! >>>>> Lol
यावरुन एक फॉरवर्डेड जोक आलेला तो आठवला. पुर्वी पालक मुलांना कोणकोणत्या कारणांवरुन मारायचे. Happy

बाकी लेख मस्तच झालाय एकदम,मुळात तुमचे साधे घरगुती लेख पटकन रिलेट होतात त्यामुळेच जास्त आवडतात त्यामुळे लिहीत राहा >>> + १२३

ॲमी यांचा रिप्लाय पाहून आठवलं मी लिहीणं का बंद केलं होतं ते. माझ्या आयुष्यात फार काही घडत नाही. जे घडतं ते लिहीलं जातं. कल्पनेतून खूप भारी लिहीता येईल इतकी हुशार आहे असं वाटत नाही. तोचतोचपणा येत आहे हे तेव्हां कमेंटमधूनही जाणवू लागलं होतं. मग बंदच झालं लिखाण. आता मधेच परत लिहायची इच्छा झाली म्हणून लिहीलं. असो.

कमेंटबद्दल सर्वांचे आभार. Happy आठ वर्षांच्या मानाने स्वनिकचे negotiation skills माझ्याहून चांगले आहेत. मजा येते त्याच्याशी वाद घालायला.

विदया.

आयुष्यात फार काही घडत नाही. जे घडतं ते लिहीलं जातं. >>म्हणून तर तुमचे लेख पटकन रिलेट होतात,
कल्पनेतून खूप भारी लिहीता येईल इतकी हुशार आहे असं वाटत नाही. >>पुन्हा तेच म्हणेन,घरगुती छोट्या प्रसंगांतून मोठ्या गोष्टी आपोआप उलगडल्या जातात आणि त्या जास्त काल्पनिक नसल्याने लवकर रिलेट होतात,

राहता राहिले लिखाण बंद करण्याबाबत तर शेवटी निर्णय तुमचा आहे ,तुमचा लेख आवडणे किंवा न आवडणं हा वाचकाचा चॉईस असू द्या आणि लिहिणं न लिहिणं तुमचा,
घरगुती गोष्टीबद्दलचे लेख एखाद्याला आवडत नसतील तर मला तरी त्यात काही चुकीचे नाही वाटत पण मला मात्र खूप जास्त आवडतात,

एक वेगळा विचार -- प्रत्येक घरच्या कामाला तुम्ही गुण द्यायला लागलात तर मुलांचा असा पण विचार होऊ शकतो कि अमुक त्या कामाला गुण नाहीत तर ते काम का करायचे? आणि एकदा त्यांची (गुणांची) गरज सम्पली कि नंतर पण ते काम का करायचे?

एखादी चांगली गोष्ट केल्यामुळे केवळ गुणात्मक किंवा पैशातच फायदा होतो असे नाही तर चांगुलपणाचे समाधान आणि उत्कृष्ट व्यक्ती म्हणून विकास होण्यासाठी निस्वार्थपणे काम करणे आवश्यक आहे हेही मुलांना पटवणं देणे आवश्यक आहे.

यासाठी आपला मुलगा लहान असेल परंतु आपल्या मुलीला समज येऊ लागली आहे तेंव्हा तिला काम केले = आर्थिक/ गुणात्मक फायदा असे समीकरण डोक्यात बसणे कदाचित बरोबर नाही. व्यत्यास म्हणजे आर्थिक/गुणात्मक फायदा नसेल तर काम का करायचं?

शेवटी ती आपली मुले आहेत त्यांना कसे वाढवायचे याचा समग्र विचार आपण करत असालच.

परंतु या नाण्याची दुसरी बाजू दाखवण्याचा हा प्रयत्न आहे कदाचित तो चूक हि असेल.