डोहात काळजाच्या काळोख दाटलेला

Submitted by द्वैत on 20 November, 2019 - 11:31

डोहात काळजाच्या
काळोख दाटलेला
करूया प्रवाही म्हणतो
हा जन्म साचलेला

वाहून जाऊदे ही
दुःखे युगायुगांची
हो श्वास मोकळा हा
श्वासांत गुंतलेला

कापून टाक सारे
ते दोर वापसीचे
ठेवू नकोस यादीत
कोणीच संगतीला

घायाळ ह्या मनावर
फुंकर नको कुणाची
देऊ नकोस थारा
कुठल्याच भावनेला

ही वेदना अनामिक
चुकली कधी कुणाला
जोखून पाह सारा
व्यवहार सांधलेला

जा दूर दूर तेथे
जेथे नसेल कोणी
कोणी सतावलेला
कोणी दुखावलेला

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोहात काळजाच्या
काळोख दाटलेला
करूया प्रवाही म्हणतो
हा जन्म साचलेला...............वाह द्वैत! मस्तच! __/\__

चोखून पाह सारा
व्यवहार सांधलेला..............येथे जोखून पाह सारा असे हवे आहे का? म्हणजे मला तसे वाटले.

छान! Happy

सुरेख!
देऊ नकोस थारा
कुठल्याच भावनेला...अंतिम सत्य!