अपालूसा

Submitted by अतुल ठाकुर on 15 November, 2019 - 17:59

AppaloosaPoster.jpg

अगदी नवीन असे वेस्टर्नपट मला फारसे मानवत नाहीत. हा माझा मागासलेपणा असेल पण कठोर अशा निसर्गाशी जुळतील असे रापलेले चेहरेच आता दुर्मिळ झालेत. तो हेन्री फोंडा नाही, जॉन वेन नाही, चार्लस ब्रॉन्सन नाही आणि रँडॉल्फ स्कॉटही नाही. मात्र "अपालूसा" हा याला सणसणीत अपवाद. तसा हा पारंपरिक वेस्टर्न चित्रपट म्हणता येणार नाही. यात ती कुरणे नाहीत. पोकरवरुन होणार्‍या मारामार्‍या नाहीत. गुरेढोरे नाहीत, घोड्यांचे कळप नाहीत. मात्र त्या हॅटस आहेत, मार्शल आहे, जेल आहे, घोडे आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती टिपीकल गनफाईट आहे.

मार्शल आणि त्याचा जिवलग मित्र प्रदेशात शांतता प्रस्थापीत करण्याचे काम करत हिंडत असतात. कुणीही त्यांला आपली समस्या सांगावी, त्यांच्याशी करार करावा आणि तेथे असणार्‍या गुंडांचा बंदोबस्त करावा. अशा एका कामासाठी ही दुक्काल अपालूसा या टाउन मध्ये येते आणि सुरु होते एक चित्तथरारक कथा. ती येथे सांगण्यात अर्थ नाही. पाहण्यातच मजा आहे.....

एड हॅरीस आणि व्हीगो मॉर्टीनसन यांनी जुन्या कलाकारांची आठवण यावी असा अभिनय केला आहे. त्यात देखिल व्हीगो खासच. त्याला लूकच इतका टिपिकल दिला आहे कि तो अगदी एकोणिसाव्या शतकातलाच वाटतो. त्याने त्याच्या बोलण्याची ढबही तशीच ठेवली आहे. त्यामानाने एड हॅरीस मार्शल म्हणुन कमकुवत वाटला पण त्याने अभिनयाने ती उणीव भरुन काढली आहे.

खरं तर वेस्टर्नपटात इतकी मध्यवर्ती स्त्रीभूमिकाच दुर्मिळ आणि त्या भूमिकेला इतके कंगोरे असण्म हे तर फारच दुर्मिळ. "अपालूसा" बद्दल लिहायचं म्हणजे या भूमिकेतला जो वेगळेपणा आहे त्याबद्दल बोलावंच लागेल. काळाच्या फार पुढची गोष्ट येथे सांगितली आहे. नायिका ही जो कुणी पुरुष वरचढ ठरेल त्याबाजूला झुकते. तिला तिची सुरक्षितता महत्त्वाची वाटते. तिला नायकाचा स्वाभिमान, बाणेदारपणा यांच्याशी काहीही घेणंदेणं नसतं. तिला मध्येच कधितरी नायकाचा मित्र जास्त वरचढ वाटतो तर ती त्याच्याकडेही झुकते. त्याने नकार दिल्यावर त्याच्यावर संतापतेही. अतिशय गुंतागुंतीचं असं हे पात्र रेने झेल्वेगरने सुरेख रंगवले आहे. रेने झेल्वेगरसारखी अभिनेत्री असल्यावर दृश्य एका वेगळ्याच पातळीवर पोहोचते हा अनुभव आहे. या पात्रामुळेच हा वेस्टर्नपट अगदी वेगळा झाला आहे.

जो पुरुष समाजात वरचढ त्याच्यात आश्रय शोधणारी नायिका आणि तिच्या प्रेमात पार गुंतलेला मार्शल या दोघांमध्ये योग्य अयोग्य काय याचा अंदाज घेणारा मार्शलचा जिवलग मित्र व्हीगो आणि संधी मिळताच मार्शलचा पराभव करायला टपलेला खलनायक असा हा सामना आहे. एका वेगळ्या पठडीतला नितांतसुंदर वेस्टर्नपट.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users