मी दिली आहे सुपारी

Submitted by निशिकांत on 14 November, 2019 - 23:16

वास्तवाच्या काहिलीने जीव हा कातावला
मी दिली आहे सुपारी मारण्यासाठी मला

इभ्रतीचा पंचनामा प्राक्तना केलास का?
श्वास घेण्याचा जगाया मार्ग आहे खुंटला

दोनही होते किनारे चाललेले सोबती
भेटण्याची एकमेका, ना कधी जमली कला

आज चंगळवाद शैली एवढी बेशिस्त की!
वाटते संस्कार जगणे खूप मोठीशी बला

मन जरी भेगाळलेले, कोपरा ओला कसा?
आठवांचा त्या तिथे श्रावण असावा बरसला

माजला काळोख का आरूढता सिंहासनी?
एवढा त्याचा दरारा! सूर्यही अंधारला

पोपटाला पिंजर्‍याचा लागला इतका लळा
दार उघडे ठेवलेले पाहुनी धास्तावला

जन्मलो, मेलो कशाला? उत्तरे मिळती कुठे?
श्वास घेतो, ना उमगता अर्थ मी जगण्यातला

जायचे "निशिकांत"आहे गूढ वाटेने तुला
शाश्वतासाठी तटातट तोड इथल्या शृंखला

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users