निर्झर

Submitted by दत्तात्रय साळुंके on 7 November, 2019 - 01:57

निर्झर
काळोखाची दुलई ओढून
झोपी गेला रात्री डोंगर
कलकल परि रव करीतो
उरात लपविलेला निर्झर

दरीदरीतून नाद घुमत
ऐकू येते‌ मधुर संगीत
निजले प्राणी अन पक्षीही
गातो निर्झर अंगाई गीत

जरी झोपले जग भोतीचे
निर्झर पहारा देत राही
मुखप्रक्षालन फेसाळ करुनी
रोज सकाळी ताजा होई

सुर्यदेवा तो करीतो नमन
सातरंगांचे लावून निरांजन
जागली झाडे, पक्षी, प्राणी
गातो डोंगर ईश स्तवन

पुजाअर्चा सरता निर्झर
भक्तीभावाने पुढे चालला
काठावरच्या तरु लतांना
फळाफुलांचा बहर आला

शिंपण करीता शेतमळ्यांचे
जागर जगण्याचा झाला
चराचरात चैतन्य जागले
प्राशन करीता अमृत प्याला

आनंदचा कंद अनोखा
आनंदच उधळीत जातो
पाषाण हृदयी कातळही
प्रेमाने पाणी पाणी होतो

परोपकारे वाहात राहावे
हेच तयाल ठावूक असते
जरी मार्गात आले धोंडे
शहाण्याने थांबायचे नसते
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आनंदचा कंद अनोखा
आनंदच उधळीत जातो
पाषाण हृदयी कातळही
प्रेमाने पाणी पाणी होतो

अगदी मस्त जमली आहे कविता. Happy

छान