तहानेला जरा आवर

Submitted by सुप्रिया जाधव. on 6 November, 2019 - 23:16

तहानेला जरा आवर

झरा मी स्वच्छ पाण्याचा
दुतर्फा साचली डबकी
तहानेला जरा आवर
नको ओंजळ भरू मळकी

नभातिल थेंब पाण्याचा
तशी निर्लेप आहे मी
कमालीची निरागसता
जगी आक्षेप आहे मी
नसो आवाजही साधा
भरवते वीज ती धडकी
तहानेला जरा आवर
नको ओंजळ भरू मळकी

तुझ्यावर भाळले कारण
तुझे काळीज हरणाचे
नसेना का तुझ्यापाशी
तुझे औदार्य कर्णाचे
तुझ्या शब्दांमुळे भरते
जणू बाणासही धडकी
तहानेला जरा आवर
नको ओंजळ भरू मळकी

तुझे-माझे नसो काही
तुझ्या-माझ्यात राहू दे
खुज्या वृत्तीस ह्या माझ्या
तुझे विस्तीर्ण बाहू दे
भुलावण ही तुझी करती
जगतिल माणसे जळकी
तहानेला जरा आवर
नको ओंजळ भरू मळकी

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान