द म्युझिक रुम- नमिता देविदयाल

Submitted by रैना on 16 April, 2009 - 05:28

नमिता देविदयाल- यांचे द म्युझिक रुम वाचले. मला आवडले. कथानकासाठी ही लिंक वाचा-
http://www.telegraphindia.com/1070928/asp/opinion/story_8367570.asp

केसरबाईंवरील माहितीसाठी
http://www.underscorerecords.com/artists/details.php?art_id=40

अनेक वर्ष काही प्रश्नांची उत्तरं शोधत होते ती काहीशी सापडल्यासारखी वाटली. हा नमिता यांचा संगीतशिक्षण प्रवास, त्यांच्या गुरु जयपूर घराण्याच्या धोंडूताई कुलकर्णी (केसरबाई केरकर आणि भूर्जीखा साहेब यांच्या शिष्या) यांच्याकडे २ तपांहून अधिक काळ चाललेले संगीत आणि जीवनमुल्ये शिक्षणाचा प्रवास, रागदारी, घराणे आणि भारतीय संगीत परंपरेवरील चिंतन, गुरूकॄपेने लाभलेली संगीतानुभूती आणि आत्मानूभूती, त्यात पत्रकरितेची आणि विवेकवादाची जीवनानुभुती, आणि या सगळ्याची सांगड घालायची धडपड. तीळातीळानी, रियाजाने घटवत जाणारा षड्ज. " My "sa" is improving, a few sesame seeds at a time". {हे Diaspora लेखकांचे खटकतं तरी याजागी दुसरी काय बरं उपमा देता येईल? आणि ह्याच उपमा पाश्चात्यांना विलायती म्हणून मोहून टाकत असाव्यात हे बुकरच्या वाढत्या पुरस्कारप्राप्त यादीतले लेखक वाचून वाटतं. तरीही फक्त त्यासाठीच तर लिहीले नसावे , ईतकी शंका घेण्याइतपत लेखक आपण सगळ्यांनीच वाचले आहेत आणि मनात निषेध व्यक्त केला आहे. :-). }

केसरबाई केरकरांचे व्यक्तिचित्र बहूतेकांनी तरी पुलंच्या मैत्र मध्येच वाचले असेल. मी स्वतः त्यांचे ध्वनिमुद्रण फक्त राजन पारिकरांच्या पानावर ऐकले आहे. त्या व्यक्तिचित्रणाला पूर्ण छेद देत, आडपडदा न ठेवता, आणि तरीही सीमारेषा पार न करता विवेकनिष्ठ चित्रण या पुस्तकात वाचले. "बाई", त्यांचे सूर , त्यांची साधनाआणि बेसूर रंगढंग आणि निव्वळ संगीत परंपरा चालू रहावी म्हणून घराण्याबाहेरच्या केसरबाईंना, जुल्माचा रामराम स्वीकारून तालीम देणारे ते अल्लादिया खाँ साहेब.
गुरु धोंडूताईंचे ध्यासनिष्ठ जीवन आणि संगीत विषयक चिंतन, ईश्वरभक्ति, सोसलेले आघात, आर्थिक कोंडमारा, आयुष्यभर न सुटलेला तोल,, जयपुर घराण्याच्या सर्वेसर्वांच्या कडून मिळालेली तालीम, प्रतिभा आणि तरिही सगळं अनुरुप असताना कूठेतरी शिंकलेली ती नशीब नामक माशी-योग्य प्रमाणात न मिळालेलं ते दुमदुमतं यश/प्रसिद्धी - याबाबतीत ही पूर्ण नियंत्रीत /समतोल विचार नमितानी नोंदवलेले आहेत. भारतीय संगीत परंपरेतील "गुरु " आणि त्यांची मर्जी सांभाळतांना आपल्या गुरुबाबत असे लिहीणे आणि टोकाच्या उदात्तीकरणापासून दूर राहणे, आणि तरीही गुरुमधील अलौकिकाची जाण ठेवून लिहीणे सोप्पे नाही.

हिंदू / मुस्लिम सांगीतीक विचारधारा आणि त्यांची घट्ट वीण हाही एक महत्वाचा धागा. त्यातले अल्लादिया खाँ खरं म्हणजे हिंदू होते वगैरे मिथकं. केसरबाई आणि त्या प्रतिस्पर्धी मालू (? ह्या कोण हे मात्र कळले नाही), धोंडूताई आणि त्यांचे प्रतिस्पर्धी (ह्या कोण ह्याचा मात्र अंदाज लागला), हेवेदावे आणि कपट- हे ही, काही सांगीतीक दंतकथा तानसेन आणि स्वामी हरिदास/ अल्लाह, घराण्याची प्राणपणाने जपण्याची गुपिते, ग्रांट रोड मधल्या शारिरव्यापाराच्या भांगेतली ती अभिजात आणि पिढीजात शास्त्रीय संगीताची तुळस, रागांग आणि श्रुती यावरील गुरुभाष्य सगळेच सुरेख लिहीले आहे. तेवढीच (मला)महत्वाची वाटते ती नमिताबाईंची डोळस वाटचाल, त्यांना पडणारे प्रश्न आणि कित्ती नाही म्हणले, विद्रोही सिगरेटींच्या धुम्रवलयात सोडली तरी सूरात आणि कैवल्यात लीन होऊ पहाणारी त्यांची सापडलेली आणि न सापडलेली उत्तरं- वाचाच !!

राहता राहिला एक प्रश्न-
धोंडूताईंचे गाणं किंवा नमिताचं खरं कसं होतं /आहे ? पुस्तकाला साजेसं आहे का? हा माझ्या डोक्यात वळवळणारा किडा. पण त्यानी काय फरक पडतो ? (हाही एक किडाच). शब्दात तरी त्यानी मूर्त रुप घेतलय ना ? पण मग पाय मातीचे निघाले तर ?

आपल्याला काय वाटतं ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलंयस. शास्त्रीय मला काहीच कळत नाही, पण नमिताबाईंची डोळस वाटचाल जाणून घेण्यासाठी तरी नक्कीच वाचावे लागेल.

  ***
  दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
  पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

  रैना,
  अलका देव मारुलकरांचे याच विषयावरचे पुस्तक वाचले का ?

  नाही दिनेशदा. जरा सांगा ना त्या पुस्तकाबद्दल.

  धन्यवाद स्लार्टी. Happy

  छान लिहिलं आहेस. भारत वारी करेपर्यंत दोन-एक डझन नवी पुस्तकं माझ्या विश लिस्ट मधे जमा होणार अशाने.

  खाँ >>> khaO.n

  >>> छान लिहिलं आहेस. भारत वारी करेपर्यंत दोन-एक डझन नवी पुस्तकं माझ्या विश लिस्ट मधे जमा होणार अशाने.

  अनुमोदन! Happy

  खाँ : khOM असंही लिहिता येतं. Happy

  मस्त लिहिलं आहेस. वाचायला हवं आता.
  भरप्पांचं 'मंद्र'ही याच विषयावर आहे. त्यातील सारी पात्र ओळखू येतात. आणि कलेकडे लक्ष द्यायचं की त्या कलाकारांच्या मातीच्या पायांकडे हा प्रश्नही पडतो.

  सिंडी, स्वाती- धन्यवाद. लिहीले आता नीट .
  यादी ना- होना- मला पण घरचा अहेर मिळत असतो सारखा. पुस्तकं- एक या दो बस्स (वाचायला नाही विकत घ्यायला)- पण ती आपली मारुतीच्या शेपटी सारखी वाढतात. आता ट्ण्याची, चिनुक्सची आणि शोनूची वाचायची आहेत ती यादी लांबतच चालली आहे. Happy

  चिनूक्स- धन्यवाद. आता मंद्र गेले माझ्या यादीत.

  रैना, त्या पुस्तकाचे नाव बहुतेक स्वरमयी असे आहे, मला खात्री नाहि.
  अत्यंत तयारीच्या गायिका असून देखील ( मी स्वतः त्यांचे गायन प्रत्यक्ष ऐकले आहे, अनवट राग अगदी सहज सुंदर गातात त्या ) त्यांची उपेक्षाच झाली. याचे अस्वस्थ करणारे वर्णन या पुस्तकात आहे. हे पुस्तक त्यानी स्वतः लिहिलेय का आणखी कुणी, ते पण आता आठवत नाही.
  या क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे आता. नव्या कलाकारंची अक्षरशः घुसमट होतेय. अनेक कलाकार, ज्याना प्रत्यक्ष ऐकलेय, त्यांच्या गायनाच्या सीडीज वगैरे उपलब्धच नाहीत.
  या क्षेत्रात तीच तीच नावे आणि त्यांच्या मैफीली असे सध्या झालेय खरे.

  रैना, या पोस्टमधील एका आढ्यखोर गायिकेची एक मैफील मी ऐकली होती. त्याना एका रसिकाने, एका चीजेची फर्माईश केली तर ती गायिका म्हणाली, तो काय या वेळी गायचा राग आहे का ? काहिही फर्माइश करता म्हणजे काय ?

  आणि अगदी आवर्जून ( कदाचित परत ) लिहिण्यासारखा किस्सा आहे, बेगम परवीन सुलताना यांचा. मी कॉलेजमधे असताना, त्या आल्या होत्या. गायल्याही. मध्यंतरात मी त्यांची स्वाक्षरी घ्यायला गेलो, तर त्यानी विचारले, " बेटा, मेरा गाना पसंद तो आ रहा है ना ?".
  मी पाय धरले त्या थोर कलाकाराचे !!!

  रैना, मस्त लिहिले आहेस. अजुन एक पुस्तक वाढले यादीत माझ्यापण.

  स्वरमयी हे प्रभा अत्रे यांचे आत्मचरित्र आहे बहुदा.

  ही आढ्यताखोर गायिका म्हणजे नक्कीच किशोरी आमोणकर असणार...