अंदाज अपना अपना - एक Lokal किस्सा

Submitted by A M I T on 1 November, 2019 - 02:25

लोकलमध्ये माझ्या शेजारी एक कमी शिकलेला गृहस्थ बसलेला होता. मी कमी शिकलेला का म्हणालो, याचा खुलासा पुढे येईलच. जलद लोकलमध्ये शक्यतो नेटवर्कची समस्या असते. त्या गृहस्थाने मोबाईलवर अमेझॉन ऍप उघडला. सर्चबॉक्समध्ये Many Pars असा सर्च दिला.
माझा अंदाज - कदाचित हा इसम पर्स (Purse) शोधत असावा. इंग्रजी कच्चं असल्यामुळे स्पेलिंग चुकली असावी.
नेटवर्क कंपन्यांच्या कृपेने त्याच्या मोबाईलवर ऍमेझॉनचं दुकान उघडलं नाही. त्यानं ते प्रकरण 'पर्स'नली घेतलेलं असावं, कारण लगेच त्याने दुसरा सर्च दिला - Violet. ह्यावेळी स्पेलिंग अगदी करेक्ट किंवा मोबाईलच्या आगाऊपणामुळे ऑटोकरेक्ट.

माझा अंदाज - याला जांभळ्या रंगाचं काहीतरी हवंय. पण नक्की काय? नुसताच रंग टाकून सर्च दिला. पुन्हा नेटवर्क कंपन्यांनी ढिम्म राहून आपले अंतरंग दाखवले.

त्याने त्या सर्चबॉक्समध्ये पांढऱ्यावर काळी अक्षरे उमटवून Many Pars असा पुन्हा मघाचाच सर्च दिला.
माझं स्वगत - याला एकच पर्स हवाय ना, मग हा Many पर्स असा सर्च का देतोय? त्याने नुसता पर्स मागितला असता तरी ऍमेझॉनने त्याला ढिगाने पर्स दाखवले असतेच की... अवघडे !!
मी त्याच्या मोबाईलमध्ये गुंतलेले माझे डोळे दुसरीकडे वळवले.

तोवर तिकडे ऍमेझॉननं दुकान उघडून त्याला असंख्य पर्स दाखवले. बहुतेक सगळ्याच पर्समध्ये नोटा कोंबलेल्या दिसत होत्या.
माझा मघाचा चुकलेला अंदाज - त्याने जो Many Pars असा सर्च दिला होता, तो प्रत्यक्षात Money पर्स असा होता. बरोबर आहे! ज्याला पर्सची अचूक स्पेलिंग लिहता येत नाही तो many हा शब्द तरी कसा बरोबर लिहील. हे मी आधीच ओळखायला हवं होतं.
ऍमेझॉनवाल्यांनी आपल्या ग्राहकाच्या मनातलं अगदी अचूक ओळखलं व त्यांनी त्याला त्याच्या एका चीजवस्तूच्या नाना तऱ्हा दाखवल्या.

त्या ग्राहक-दुकानदाराच्या नात्याकडे बघ्याच्या भूमिकेतून स्वतःची करमणूक करून घेणाऱ्या माझ्यासारख्या तिऱ्हाईताच्या तर्काला त्या उभयतांनी छेद दिला.

जाता जाता एवढंच सांगतो, त्या इसमाने Violet म्हणून जो सर्च दिला होता, तो प्रत्यक्षात त्याला Wallet असा द्यायचा होता, हे माझ्या उशिरा लक्षात आले.

माझा अजून एक अंदाज चुकला होता. खरंच अवघडे !!!

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

यावरुन एक किस्सा आठवला, एकदा डॉक्टर कडे गेले होते आणि माझा नंबर येईपर्यंत मोबाईल मध्ये काहीबाही बघत बसले होते. अशीच फेबु वर एक रेसिपी बघत होते माझ्या शेजारी बसलेली बाई सतत माझी स्क्रीन बघत होती आणि मला अगदी irritate करत होती. असाच थोडा वेळ गेला आणि मग तिने अचानक विचारले, " डाळीचं पीठ घातलं काहो आत्ता? माझं जरा लक्ष नव्हतं". मी शॉक...

" डाळीचं पीठ घातलं काहो आत्ता? माझं जरा लक्ष नव्हतं". मी शॉक... >> Rofl कहर आहे हे !
एकूण आपल्याकडे दुसर्‍याच्या पर्सनल स्पेस चा अजिबातच विचार न करण्याच्या कल्चर मधे अगदी बसतात हे किस्से.

(भारतात) असताना ट्रेन / बस मधे हे हमखास होणारे प्रकार आहेत , मॅगझीन्/न्यूज पेपर सगळे कॉमनली वाचतात आजूबाजुचे. त्याची जागा आता फोन ने घेतली .

हा माझा आणि मैत्रिणीचा किस्सा -
आम्ही थर्ड इयरला असताना वीकेंडला क्लास असायचा. परत येताना दर रविवारी मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेन लेट असायच्या. त्यामुळे कधी अर्धा-पाऊण तास खोळंबा व्हायचा. सहसा जागा मिळायची नाही स्टेशनवर बसायला. त्या दिवशी दोन सीट्स रिकाम्या दिसल्या पण मधल्या सीटवर एक माणूस बसला होता. आम्ही त्या सीटसपाशी जाऊन तो बाजुच्या सीटवर वसला तर बरं असा अंदाज घेऊ लागलो. म्हणजे आम्हाला एकमेकींच्या बाजूला बसायला बरं. पण तो काही मधली सीट सोडायला तयार नव्हता. शेवटी आम्ही दोघी त्या माणसाच्या अलीकडे- पलीकडे1 बसलो. गप्पा मारणे तर काही शक्य नव्हते. तो पेपर वाचत बसला होता.
मैत्रीण : ए बघ श्रीदेवी च लग्न झालं
मी : आं! कोणाशी?
मैत्रीण : ती प्रेग्नंट पण आहे !
मी : कोणीतरी तिला श्रीमुखात लगावली म्हणे स्वत:च्या लग्नाच्या रिसेप्शनला---
इथे मधला माणूस उठून निघून गेला. आम्ही दोघी एकमेकींच्या बाजूला बसलो.

Pages