सामान्य माणसाच्या आगतिकतेची 'suffer' - Joker (स्पॉयलर)

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

माणूस जगतो म्हणजे नक्की काय? जगण्याची व्याख्या प्रत्येकाची निराळी असते, पण या जगात काही लोकांसाठी श्वास घेणे आणि रोजची भाकरी मिळवून पोट भरणे हेच जगणे असते. कुणाच्याही अध्यात मध्यात नसतानाही शांतपणे श्वास न घेऊ देणार्‍या आणि रोजची भाकरी ही सुखाने न मिळू देणार्‍या दुनियेचा आपण भाग असू तर आयुष्य कसे होते ते 'जोकर' खूप प्रभावी पणे सांगून जातो.

गॉथम शहरातला एक अत्यंत सामान्य गरिब माणूस ऑर्थर आपल्या आईसमवेत जगण्याची धडपड कशी करतो आणि त्याला पदोपदी दुनिया कशी चित करते, त्याच्या कमकुवत असण्याचा कसा फायदा घेते आणि मग ऑर्थर कसा पेटून उठतो याचे गडद चित्रण म्हणजे जोकर. हा सिनेमा नसून एक आक्रोश आहे.

चित्रपटाला सांगावी अशी कथा नाही तो एका अतिसामान्य माणसाचा रोजच्या आयुष्यतला अनुभव आहे. म्हातार्‍या आईसोबत गरिबीत दिवस कंठणारा ऑर्थर छोटे मोठे काम करून चरितार्थ चालवण्याचा प्रयत्न करत असतो पण पदोपदी येणार्‍या अडचणी, मानसिक धक्के, पैशांची चणचण यामुळे शिवाय काही शारिरिक व्याधींमुळे त्रस्त झालेला ऑर्थर असाच एकदा एका बंद होऊ घातलेल्या म्युझिक हाऊसचे उर्वरित सामान विकले जावे म्हणून जोकर चा वेष धारण करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचे 'काम' करताना, एक टवाळ मुलांचा गट त्याच्या हातातला फलक पळवून नेतो तो परत मिळवण्याच्या धडपडीत तो फलक तुटतो शिवाय जोकर त्या टारगट मुलांचा मार ही खातो. तिथे त्याच्या कमकुवत असण्याची पहिली झलक आपल्याला दिसते आणि त्या कमकुवतपणाचा फायदा घेणारी दुनियाही.

ऑर्थर च्या आयुष्याकडून फार अपेक्षा नाहीत. त्याला स्टॅण्डअप कॉमेडियन बनायचे आहे, आणि त्याचे दोन आयकॉन एक म्हणजे मेयर पदी उभा असलेला थॉमस वेन आणि टिव्हिवरचा सुत्र संचालक मुरे फ्रँकलिन यांच्याकडूनही अपमान सहन करावा लागतो तेव्हा आतून कोसळलेला जोकर आपल्याला दिसतो. गरिबी, अनिश्चित कामाचे स्वरूप, डिप्रेशन, आजारी आई आणि अंधारलेलं भविष्य हेच खरं जोकरचं आयुष्य आहे.

संपुर्ण सिनेमात जितके संवाद आहेत त्यापेक्षा जास्त प्रतिकांचा केला गेलेला वापर आपलं लक्ष जास्त वेधून घेतो. चित्रपटाच्या सुरूवातीला पार्श्वसंगिताच्या जागी ऐकू येणार्‍या शहरातल्या हालहवाल सांगणार्‍या बातम्या, थॉमस वेन नं गरिब लोक हे 'जोकर' आहेत असं म्हणणं आणि गरिब लोकांनी जोकरचा वेष धारण करून रॅली काढणं. रँडलनं स्वतःहून ऑर्थरला स्वसंरक्षणार्थ दिलेली बंदूक , थॉमस वेन हा आपला जन्मदाता आहे हे समजल्यावर त्याच्याकडे जाऊन फक्त प्रेमाची आणि दोन शब्दांची अपेक्षा करणार्‍या ऑर्थरला जेव्हा वेन नाकारतो तेव्हा तो घरी येऊन संपुर्ण फ्रिज रिकामा करून त्यात जाऊन बसतो. या आणि अशा अनेक विलक्षण प्रसंगांनी सिनेमा फार प्रभावी बनला आहे.

माणूस जगण्याच्या धडपडीत काय काय भोगतो, कशाकशाला सामोरा जातो? त्याला पराकोटीचे दु:ख आणि नैराश्य येते तेव्हा तो आतून कणाकणाने कोसळतो. यात काही लोक हीच आगतिकता मूठ वळून उराशी बाळगून आयुष्य कंठतात तर ऑर्थर सारखे लोक या वर उपाय शोधताना कधी हिंसा करू लागतात हे सांगणं कठिण.

हिंसा ही हिंसा असते पण जोकर मधली हिंसा ही आपल्याला हिंसा वाटतच नाही उलट न्याय वाटतो. कारण ऑर्थर सारखं आयुष्य जगणार्‍या माणसाला जेव्हा या आगतिकतेचा शेवट कुठे आणि कसा आहे? याचे उत्तर मिळत नाही तेव्हा हिंसा हा एकच उपाय त्याला सर्व गोष्टींवरचा जालिम इलाज म्हणून दिसतो.

आगतिकतेकडून हिंसेकडे वाटचाल होत जात हा जोकर संपुर्णपणे बदलून जातो. लहान मुलांच्या इस्पितळात अ‍ॅक्ट करताना बंदूक बाळगल्याबद्दल नोकरीतून काढून टाकल्यावर जेव्हा ऑर्थर घरी परतत असतो तेव्हा लोकल ट्रेन मध्ये एका मुलिला छेडणारा तीन सभ्य लोकांचा गट आणि त्यावेळी नेमके हसण्यावर नियंत्रण नसल्याने आलेले अवेळचे हसू हे ऑर्थरला पुन्हा एकदा त्या तिघांच्या मारहाणीचा बळी बनवते, आणि अचानक त्याला आठवते की आपल्या कमरेला छोटी बंदूक आहे, अचानक ती बाहेर काढून तो ठो ठो करून त्या तिघांना संपवतो... आणि तिथे जोकरला आपल्यातल्या 'शक्तीची' सुक्ष्म जाणिव होते.

थॉमस वेन कडे इमाने इतबारे केलेल्या नोकरीचे फळ म्हणून काही मदतीची अपेक्षा करणार्‍या ऑर्थरच्या आईचे एक पत्र जे तिने वेन ला लिहिलेले असते ते ऑर्थर वाचतो आणि त्यात आपण त्याचेच आपत्य असल्याचे त्याला कळते. त्याच्याकडे जाऊन त्याची फक्त भेट घेण्याची इच्छा असणार्‍या ऑर्थरला वेन सांगतो की तुझी आई मनोरुग्ण होती आणि तु दत्तक मुल आहेस, माझं मुल नाहीस. त्या माहितीच्या आधारे तो आई ज्या मनोरुग्णालयात होती तिथे जाऊन शिताफिने तिची फाईल हिसकावून घेतो या आशेखाली की ही माहिती चुकिची असावी. पण थॉमस वेन ने आपल्या राजकिय बळाचा वापर करून ऑर्थर आपले अपत्य असल्याच्या सर्व खुणा मिटवलेल्या असतात.

त्या नंतर जेव्हा ऑर्थरची आई आजारी पडून इस्पितळात दाखल होते तेव्हा मात्र ऑर्थर साफ पेटून उठतो. आणि त्याला या सर्व अडचणींवर उपाय एकच ती म्हणजे हिंसा हे त्याला मनोमन पटते आणि तो आईचा इस्पितळातच उशिखाली श्वास गुदमरवून खून करतो. आईच्या मृत्यू चे सांत्वन करायला आलेला रँडल जोकरचे दुसरे भक्ष ठरते. कारण स्वसंरक्षणार्थ रँडलने स्वतःहून दिलेली बंदूक जेव्हा ऑर्थरकडून लहान मुलांच्या इस्पितळात 'अ‍ॅक्ट' दरम्यान खाली पडते तेव्हा रँडल मालकाला सांगतो की ऑर्थरनेच ती त्याच्याकडून मागच्या आठवड्यात ती खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व प्रसंगामुळे ऑर्थरची नोकरी गेलेली असते.

मुरे फ्रँकलिन च्या कार्यक्रमात बोलावणं आल्यानंतर जोक सांगावा लागेल तेव्हा आपण आपली बंदूक काढून स्वत:वर गोळी झाडण्याचे ठरवलेला ऑर्थर अचानक लाईव्ह कार्यक्रमात आपल्या पुर्वी झालेल्या अपमानाचा बदला घेत मुरेवरच गोळी झाडून त्याला ठार करतो. 'तु असं का केलंस हे विचारताना.. जोकर हासत सांगून जातो " नाऊ आय हॅव नथिंग टू लूज" आणि इथे जोकर खरा (जाणिवपुर्वक) बदललेला आपल्याला जाणवतो. कारण रुढार्थाने त्याची एकमेव जिवंत जबाबदारी म्हणजे त्याची आई, ती सुद्धा आता जबाबदारी म्हणून अस्तित्वात नसते, शिवाय जगण्यासाठी केलेली पुरेशी धडपड ही तोकडी पडलेली असते.

ऑर्थरचे झालेले अपमान लाक्षणिक अर्थाने मानव्य सुलभ घटनेतून घडलेले असतात (रँडल बंदुकिच्या बाबतीत उलटणे, मुरे ने ऑर्थरच्या एकमेव स्टॅन्डअप कॉमेडीच्या कार्यक्रमाची आपल्या कार्यक्रमात खिल्ली उडवणं, आणि थॉमस वेन सारख्या मोठ्या माणसाने त्याचे पालकत्व नाकारणे) पण पदोपदी येणार्‍या अपयशाचा मनात साठत जाणारा खच आणि जाच हा आगतिक ऑर्थरला प्रतिकात्मक आणि हिंसात्मक जोकर बनवतो.

थॉमस वेन च्या विरोधात काढलेल्या रॅली दरम्यान ऑर्थर पोलिसां कडून पकडला जाऊन गाडीतून नेला जात असताना जबरदस्त अपघात होतो आणि जखमी होतो. तिथे आपल्याला वाटते अरेरे आता थॉमस वेन वाचणार आणि जोकरचा सूड अर्धा राहणार, पण मनातली खदखद ही फक्त एका जोकर मध्ये नसते तर संपुर्ण जनमानसात असते हे दाखवून देत रॅलिमधलाच एक जोकर थॉमस वेन चा बळी घेतो आणि तिथे आपल्या मनातले सुडाचे एक वर्तुळ पुर्ण होते. जखमी अवस्थेतच जोकररूपी ऑर्थर त्या कारवर उभा राहून नाचतो.

जोकर पाहताना आपण आंतर्बाह्य हादरून जातो. सिनेमातल्या हिंसेपेक्षा ऑर्थरचे विविध प्रकारचे हसू, त्याच्या कुपोषित शरिराची ठेवण, त्याचे डिप्रेशन, त्याची आगतिकता आणि दुनियेची रक्त पिण्याची आणि कातडी बचाऊ नियत जास्ती अंगावर येते. अनेक प्रसंग हे आपल्याला प्रश्नांकित करतात, सोफीचे अस्तित्व, तिचा ऑर्थरच्या आयुष्यातली भुमिका किंवा महत्व, समुपदेशनाच्या दरम्यान जेव्हा ऑर्थर सांगतो की मला इस्पितळात ठेवलं होतं तेव्हा मला बरं वाटत होतं आणि शेवटी पण तो तिथेच दिसतो त्यामुळे कोणते प्रसंग हे त्याच्या मनात आणि कोणते प्रत्यक्षात घडलेत याचा विचार प्रेक्षक नक्की करतात.

चित्रपट पाहताना प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रसंगात स्वतःची ऑर्थरशी असलेली समानता शोधतो, आणि आपण नाही निदान त्याने तरी त्याच्या आगतिकतेविरूद्ध आवाज उठवला आणि न्याय मिळवला याचे समाधान मानतो कारण आपण सगळे जण मनात जोकर असतो पण ऑर्थरसारखे प्रत्यक्ष जोकर होऊ शकत नाही हेच खरं.

**************************************************************************************************

Director - Todd Phillips
Writer – Todd Phillips and Scott Silver
Cast -
Arthur Fleck - Joaquin Phoenix
Murray Franklin - Robert De Niro
Sophie Dumond - Zazie Beetz
Arthur’s mother - Frances Conroy
Thomas Wayne - Brett Cullen
Randall - Glenn Fleshler
Social Worker (Counsellar) - Sharon Washington

विषय: 
प्रकार: 

छान परीक्षण!

तो शब्द अगतिक असा असायला हवा ना??

छान लिहिलेय..

सामान्य माणसाची अगतिकता त्याला शेवटी स्वतःच्या हातात कायदा घ्यायला भाग पाडत असेल तर अशा जगाचे भविष्य काय असेल? या जगात असंख्य आर्थर केवळ जिवंत आहेत म्हणून जगताहेत. चित्रपट पाहून एखाद्या आर्थरला पडद्यावरील आर्थरचे अनुकरण करावेसे वाटले तर ....

छान लिहिलंय. ऑर्थर ची अगतिकता पूर्णपणे सुन्न करते. ट्रेन मधल्या प्रसंगा पासून तर फारच. डायरेक्शन आणि फिनिक्स ची ॲक्टिंग तर केवळ अप्रतिम. चित्रपट अंगावर येतो. तरी आवडला म्हणेन.

एक रिक्वेस्ट- बरीचशी कथा सविस्तर लिहिल्यामुळे या धाग्याच्या टायटल मधेच "स्पॉयलर" असे लिहिले तर बरे होईल.

माफ करा. चित्रपट रिलिज होऊन एक महिन्यापेक्षा जास्त झाल्याने आणि आता बर्‍याच थिएटर्स मधून बर्‍यापैकी बाहेर पडला आहे.
त्यामुळे सर्वांनी पाहिला असेल असे धरून लिहिले. (मी स्वतः फारच उशिरा पाहिला) कारण आम्ही गेलो तेव्हा शो जवळ जवळ रद्द होऊ घातला होता कारण आम्ही दोघीनिंच बुकिंग केले होते. पण अजून लोक अचानक आल्याने पहायला मिळाला.

छान लिहिलम्य.
सिनेमा बघायचा राहिलाच.

सगळीकडे गतिकता न लिहिता गतिकता असं का लिहिलंय?

पण थॉमस वेन ने आपल्या राजकिय बळाचा वापर करून ऑर्थर आपले अपत्य असल्याच्या सर्व खुणा मिटवलेल्या असतात>>> this is your assumption only. There is not slightest hint about this in the movie. He was adopted only and his mother use to torture him.

मंदार ++

मला तर सुटल्यासारखे वाटले आर्थर 'वेन' नाहीये पाहून. जोकर आणि बॅटमॅन हाफ ब्रदर्स? मला कल्पना करूनच विचित्र वाटले. टॉड फिलिप्सला अजून कोणी डोक्यावर घोंगडी टाकून दणके का दिले नाहीत असा विचार रेटल्याबद्दल असे वाटले.
चित्रपट सरळ साधा आहे... एकातून एक निर्माण होणार्‍या प्रसंगांची ही शृंखला आहे. त्यात मला आर्थर अगतिक वाटला नाही... IT is about who is more crazy and cynical, society at large or Arthur?
आर्थर आणि मरीचा शेवटचा ईंटर्व्यू सगळे ऊलगडतो. जिथे आर्थरची ऊत्तरे संपतात तिथे तो हिंसा करतो.
सिनेमा ठीक आहे.. अभिनय अप्रतिम आहे.

चित्रपट रिलिज होऊन एक महिन्यापेक्षा जास्त झाल्याने आणि आता बर्‍याच थिएटर्स मधून बर्‍यापैकी बाहेर पडला आहे. त्यामुळे सर्वांनी पाहिला असेल असे धरून लिहिले.>>
Another sample of USK survey.

छान लिहिलयस.
अभिनय उत्तम. सिनेमा पन छाने.
बाकी बॅटमॅन आणि जोकर भाऊ आहेत या कल्पनेनेच खड्डा पडलेला माझ्या पोटात पण मग ते तस नाही म्हटल्यावर जीव भांड्यात पडला.
त्याचे तसे वागणे, हसणे हे सारे त्याच्या जीवनातल्या उतारचढावांवरुन आलेली प्रतिक्रिया आहे.
त्याच्याबद्द्ल वाईट वाटत राहते शेवटपर्यंत, किव येत राहते त्याची पण त्यामुळे त्याने केलेल्या खुनांना बरं झालं अस म्हणावसं वाटल नाही मला.
चांगल्या कलाकृतीवर चांगल्या व्यक्तीने लिहिलं कि बर वाटत. छान झालस तू लिहिलस ते.