देवदिवाळी

Submitted by अनन्त्_यात्री on 28 October, 2019 - 08:52

{महास्फोटापासून (Big bang)सुरू झालेली ही वैश्विक दिवाळी महाविलयाच्या (Big crunch) देवदिवाळीपर्यंत चालूच राहील.
शारीरिक अस्तित्वाला क्षणभंगुरपणाची मर्यादा असूनही चिरंतनाचा ध्यास असलेली मानवी प्रज्ञा महाविलयाच्या क्षणी कोणत्या अनुभवांना सामोरी जाईल याचे एक संभाव्य शब्दचित्र}:
=============================

स्थलकालाच्या कणाक्षणातून
तरंग उठतिल मग अखेरचे
सीमेवर असण्या-नसण्याच्या
क्षणभर उमलून मिटेल काही

जाणीव नेणीव कुठली? जेव्हा
कोसळतील द्वैतांच्या भिंती
विश्वद्रव्य लवथवुनी पुन्हा
निराकार होईल लवलाही

चिरंतनाच्या अवघड वेणा
सोसून हसणारे क्षणभंगुर
उजळत जाईल हलके हलके
विस्कळखाईत विझतानाही

Group content visibility: 
Use group defaults