नाराजी

Submitted by निशिकांत on 28 October, 2019 - 00:59

(एका सावलीतील झुडुपाला आणि उन्हातील वृक्षाला पाहून सुचलेली हलकी फुलकी कविता. गहन आशय शोधू नये )

जन्म जाहला वृक्षाखाली
कळले जन्मुन आल्यावरती
ऊन पोळले कधी न मजला
थंड सावली डोक्यावरती

हिरवी पाने फुटली तेंव्हा
थथरलो मी वार्‍यावरती
जो तो टकमक मलाच बघतो
छाप टकतो सार्‍यावरती

दुसरी रोपे उन्हातली ती
मनात करती हेवा
उन्हात आम्ही उभे आमुचे
पाप काय रे देवा?

भेदभाव का प्रभू आमुची
कशी विसरली सेवा?
आम्हा दिधली रखरख माती
अन् त्याला का मेवा?

उंची मज ना कधी लाभली
वाढ खुंटली माझी
पोरी मजला पोर समजती
कुणी न म्हणती दाजी

सावली मला माझी नाही
जखम वाहते ताजी
उन्हातल्या झाडांनी मजवर
आज मारली बाजी

सावली मला शाप जाहली
हीच खरी नाराजी
वॄक्ष म्हणाया मजला मीही
नाही आता राजी

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झुडपाचे मनोगत छानेय..
[तुम्ही वर दिलेली टिप लक्षात न घेता कविता वाचली तर आशय गहनच आहे.. Happy ]