उत्क्रांती!

Submitted by सामो on 25 October, 2019 - 15:40

उत्क्रांती!

अजुन जीवसृष्टीही अस्तित्वात आली नव्हती,
पृथ्वीवर एका टप्प्यावरती अचानक जलचर जीव निर्माण होऊ लागले होते, Paleozoic time,
पृथ्वी एका मोठ्या स्थित्यंतरातून चालली होती,
जेव्हा.........................
मी मासा होतो, आणि तू बेडुकमासा होतीस,
आठवतं तुला,
शेवाळ्यावर पहुडलेले, चिखलात लडबडलेले, टपाटप उड्या घेत आपण एकमेकांवर बुद्धीहीन प्रेम करत होतो.
निव्वळ अस्तित्वात येणं हाच तेव्हा साजरा करण्याच मोठा प्रसंग होता,
अशा पृथ्वीच्या शैशवकाळीही, तू आणि मी एकमेकांच्या जोडीने बुद्धीहीन पण आनंदमय जीवन जगत असताना मृत्यु पावलो.
.
उत्क्रांती! पृथ्वीवरचा लाव्हा थंड होत होता,
आणि मातीत उगवल्याप्रमाणे, खवल्याखवल्याचे असे, वाळूत,
चिखलात सरपटणारे उभयचर बनुन आपण अस्तित्वात आलो,
पायाच्या ३ नख्यांनी वाळूवर, चिखलावर एक अनाम भाषा चितारु लागलो,
मंदगतीने सरपटत होतो, जेव्हा आपण प्रेताच्या थंडगार स्पर्शासारखे शीत् रक्ताचे प्राणी होतो,
तेव्हाही अंधारात चाचपडत, आशेचा, सूर्याचा किरणही नसताना,
एकमेकांवर प्रेमच करत होतो, एकमेकांना लपेटून प्रेम उपभोगत होतो. असेच दोघे मृत्यु पावलो,..
.
परत उत्क्रांती! पक्षी बनुन आकाशात झेप घेताना,
डहाळ्याडहाळ्यांवरुन उड्या घेत, पिसारा पंख फुलवत तुला मी लुभावत होतो,
तेव्हाही हे सखे आपण चोचीत चोच घालून एकमेकांच्या प्रेमातच आकंठ डुंबत होतो,
आठवतं तुला?
चमचमणार्‍या नदीच्या पात्रावर मोठ्ठा केशरी चंद्र आठवतो तुला?
.
उ-त्क्रां-ती! मला अणकुचिदार सुळे होते,
तू केसांनी नखशिखांत मढलेली अतिशय सुंदर अशी मला भासत होतीस,
जेव्हा आगटीचा शोधही लागला नव्हता
आणि आपल्या गुहेच्या अंधारात चाचपडत, मेलेल्या प्राण्यांची हाडे किणकिणत, खणखणत असताना
आपले प्रेम भरास येत होते तेव्हाही आपण एकमेकांचेच होतो.
मी दगडाला धार लावुन, पाणवठ्यावर आलेल्या महाकाय मॅमथचि शिकार करते वेळी
आणि नंतर छाती पिटत, आरोळी ठोकुन, अन्य भाईबंदांना, तुला बोलवताना,
कच्च्या मांसाचे लचके तोडत जेव्हा तू माझ्याकडे कृतज्ञतेने पहात होतीस तेव्हाही तू माझी प्रेयसी होतीस.
.
आज, आपण दोघेच कँडल-लिट डिनरडेटवर भेटलो आहोत.
खाण्याकडे लक्ष कमीच आहे, कधी एकमेकांशी गप्पा मारण्यात आपण दंग आहोत,
तर कधी एखाद्या क्षणी कुठे एकमेकांच्या डोळ्यात पहात, मूक साद घालत,
एकमेकांवर तेच उत्कट प्रेम करत आहोत. आणि म्हणुनच प्रिये,
आज ते आपले सारे जन्म आठवु यात,
मी होतो मासा आणि तू बेडुकमासा.
हा पेला त्या आठवणीकरता, आपल्या तेव्हापासूनच्या आदिम आकर्षणाकरता, उत्कट प्रेमाकरता.

Group content visibility: 
Use group defaults

शेवाळ्यावर पहुडलेले, चिखलात लडबडलेले, टपाटप उड्या घेत आपण एकमेकांवर बुद्धीहीन प्रेम करत होतो.
>>

प्रेम आजही बुद्धीहिनच केले जाते
अन्यथा ते प्रेम नसते.

Happy छान ओळख करून दिली कवितेची. देवाचा उल्लेख आहे मूळ कवितेत तो यायला हवा (का माझा वाचताना सुटला). कारण देव व उत्क्रांती ह्याबद्दल फार उलटसुलट चर्चा होते.