घरट्याची उब

Submitted by दत्तप्रसन्न on 23 October, 2019 - 16:44

मुलं का लगेच मोठी होतात
का बरं इतकी शहाणी होतात?
काल परवा पर्यंत कडेवर बसलेली
आज कुशीत मावेनाशी होतात

घरात चालणारा अखंड चिवचिवाट
आता एकदम बंद होतो
उत्साही बोलकं असणारं घर
आता कसं शांत आणि गंभीर वाटतं

दिवाळीचा फराळ ज्यांच्यासाठी करायचा
तेच आता मोजून मापून खातात
चकल्या लाडू आणि अनारशांनी
आपलीच वजनं वाढू लागतात

चार चौघात काय बोलतील ह्याचा नेम नसणारे
आज इतके समंजस पणे बोलतात
इतके ही समजूतदार होऊ नका रे कार्ट्यानो
कि बालिश झाल्यासारखे वाटेल आम्हालाच

फटाके आणि कपड्यांचा हट्ट करणारे
तुमच्यासाठीही काही घ्या असं म्हणतात
पर्यावरण जपण्यासाठी
दिवाळी साधी साजरी करू असा आग्रह धरतात

कधी गर्दीत हरवतील म्हणून
घट्ट पकडलेले त्यांचे चिमुकले इवलेसे हात
आता मात्र आपल्याच हातात मावेनासे होतात
आपणंच कुठे अडखळताना पटकन येऊन सांभाळतात

चिऊ काऊच्या गोष्टींशिवाय न जेवणारे
वेगवेगळे पदार्थ करून आज आपल्याला वाढतात
अंगाईगीत ऐकूनच झोपणारे
न चुकता रोज पांघरूण घालतात

घाबरू नकोस ज्यांना सांगायचो
त्यांच्या नुसत्या असण्याचाच किती आधार वाटतो
जाणार आहेत घरट्यातून उडून एकदिवस
कल्पनेने हिअंगावर काटा येतो

उंच उंच घ्यारे झोका
गाठा नवी क्षितिजं शोधा वेगळ्या वाटा
काळजी आमची करू नका बाळांनो
आनंदात तुमच्या आनंद आमचा

दिवस रात्र काम करताना
तहानभूक विसरून मेहनत घेताना
एवढं फक्त लक्षात असूद्यात
पुरेसं असतं एकवेळची शांत झोप आणि दोन वेळचं पोटभर खायला

कराल कधी अडचणींचा सामना
दिसणार नाही मार्ग पुढचा
ठेवा विश्वास स्वतःवर
आणि चांगल्या विचारांवर श्रद्धा

कमरेइतकंच काय ते पाणी असतं
धीर नसतो खचू द्यायचा
सांगतो कमरेवरतीच हात ठेवून
पंढरीचा सावळा विठोबा

कर्तत्वकर्मे कठोर असताना
आपुलकी मनातील जपत रहा
तारेवरची कसरत आहे हि
पण ह्यातच खरी आहे मजा

नवी नाती करताना
जुन्या मातीचा सुगंध घेत चला 
आपल्या गावाकडची नाळ पकडून
नवनिर्मितीचा ध्यास धरा

गावाला आहेत आई बाबा
तुमची वाट बघत गणपती आणि दिवाळीला
जमेल तसं येत जा चिमण्यांनो
घरट्याची उब विसरू नका, घरट्याची उब विसरू नका

Group content visibility: 
Use group defaults