शिकणे आणि शिकविणे

Submitted by कुमार१ on 19 October, 2019 - 02:06

शिक्षण दोन प्रकारे होत असतं - औपचारिक आणि अनौपचारिक. औपचारिक म्हणजे शाळा व महाविद्यालयात होणारे. ह्या प्रकारात शिस्त असते आणि ते आखीवरेखीव पद्धतीने दिले जाते. पण याची एक बहुतेक ठिकाणी मर्यादाही असते. ती म्हणजे " ऐका, पाठ करा आणि परीक्षेत उतरवा" या त्रिसूत्रीवर ते चालते. त्यात निरीक्षण आणि चौकसपणा यांना फारसे स्थान नसते. हे शिक्षण ठराविक वयोमर्यादेत होते.
याउलट अनौपचारिक शिक्षणाचे आहे. ते समाजात वावरताना सतत होऊ शकते. त्याला कुठलीही वयोमर्यादा नाही; किंबहुना ते आयुष्यभर चालू राहते. ते घेण्यासाठी इच्छाशक्ती हा एकच गुण पुरेसा असतो. याप्रकारे कोणीही कोणाकडूनही काहीतरी शिकू शकतो. त्यातून आपल्या व्यवहारज्ञानाच्या खात्यात भर पडत राहते.

आता या धाग्याचा हेतू सांगतो.
समाजात आपला अनेकांशी कामानिमित्त संपर्क येतो. त्यातल्या प्रत्येकाचे अनुभवविश्व वेगवेगळे असते. त्यानुसार प्रत्येकाकडे दुसऱ्याला सांगण्यासारखी कुठली ना कुठली उपयुक्त माहिती असते. काही प्रसंगात आपण अशा माहितीचे आदानप्रदान सहज करू शकतो - अगदी गप्पा मारता मारता. आता अशा नव्याने कळलेल्या माहितीचा स्वीकार आणि उपयोग करायचा की नाही, हे मात्र संबंधित व्यक्तीवर अवलंबून असते. काही जण असा स्वीकार करून ती शिकलेली गोष्ट आचरणात आणतात, तर अन्य काही त्याकडे सरळ दुर्लक्ष करतात. एवढेच नाही, तर काही जण सांगणाऱ्या व्यक्तीस नाउमेद देखील करतात.
या संदर्भात माझे काही अनुभव सांगतो.

१. माझे एक ठरलेले रिक्षाचालक होते. ते त्यांच्या गाडीला पोटच्या मुलीप्रमाणे जपतात. ती नेहमी स्वच्छ व नियमित देखभाल केलेली असते. त्यांना फोन केला असता रात्री अपरात्री देखील येण्यास तयार असतात. या चालकांची एकच वाईट सवय म्हणजे गाडीतून तंबाखूच्या पिंका रस्त्यावर टाकत राहणे. ते अक्षरशः दर पाव किमी अंतराला एक पिंक टाकतात.
वर्षभर त्यांच्याबरोबर प्रवास झाल्यावर जवळीक झाली होती. आता मी तो थुंकायचा विषय काढायचे ठरवले.

दरम्यान आमच्या भागात एक सुखद घटना घडली. सुमारे ३०० रिक्षाचालकांनी रस्त्यावर न थुंकण्याची जाहीर शपथ घेतली आणि या घटनेला वृत्तपत्रात ठळक प्रसिद्धी मिळाली.
आता मला आमच्या चालकांबरोबर प्रवासाचा योग आला. मग हळूच सुरवात केली, "तुमची गाडी एक नंबर आहे, तुम्ही कधीही व कुठेही येता, मीटर प्रमाणेच चालता… हे खूप आवडते. आता फक्त एक सुचवतो. तेवढे थुंकणे आणि एकूणच तंबाखू सोडता येईल का ? तंबाखूवर्ज्य तुमच्या तब्बेतीसाठी आणि थुंकणे थांबवणे आपल्या स्वच्छ भारतासाठी !"
मग मी त्या ३०० चालकांच्या शपथेचा उल्लेख केला. मला वाटले की त्यावरून ते हा मुद्दा गांभीर्याने घेतील.

पण…..
झाले उलटेच ! माझ्या बोलण्यावर ते फाडकन म्हणाले, " मी तंबाखूवाला आहे. मी कशाला त्या शपथविधीत सहभागी होऊ ? जे आपल्याला जमणार नाही त्याची खोटी शपथ कशाला घ्या ? लै लहानपणी हे व्यसन लागलेय, नाय सुटणार".
यावर मी फक्त बघा प्रयत्न करून, एवढेच म्हणालो. मात्र त्यानंतर मी त्यांना फोन करून बोलावणे बंद केले आहे. त्यांचा पर्याय म्हणून मिळालेले गृहस्थ सालस आणि निर्व्यसनी आहेत.
….

२. कार्यालयातील हा एक प्रसंग. काही कारणाने एका कार्यपुस्तिकेतील ३० स्वतंत्र पानांच्या छायाप्रती काढायच्या होत्या. प्रतिमध्ये मजकूर कागदाचे दोन्ही बाजूस असलेला चालणार होते. मी एका पन्नाशी उलटलेल्या कारकुनास ते सांगितले. पुस्तिका त्यांचे हाती देत म्हणालो, " झेरॉक्स काढताना त्या पाठपोट काढा म्हणजे १५ कागदांत काम होईल". माझा सांगण्याचा हेतू हा की १५ कागद वाचवावेत. त्या गृहस्थांना काही ते पटले नाही. ते लगेच मला म्हणाले, " अहो, जरी पाठपोट प्रती काढल्या तरी तो माणूस पैसे तेवढेच घेणार ना; मग आपण कशाला त्याचा कागद वाचवायचा ?" आता मी पुढे काहीही न बोलता गप्प बसलो. कागदाची बचत म्हणजे वृक्षांची बचत, असली बडबड त्यांच्यापुढे करण्यात अर्थ नव्हता ! माझी बोलण्याची ताकद वायाच गेली असती.
एरवी ही या गृहस्थांना एक खोड आहे. त्यांना कुणी किरकोळ खरडण्यासाठी कागद मागितला तरी ते थेट कम्प्युटरच्या प्रिंटरमधील कोरा करकरीत ए-४ कागद अगदी सढळपणे देत असतात. असे अर्धवट खरडलेले कागद लोक खुशाल बोळा करून फेकून देतात.

प्रबोधन ही गोष्ट महाकठीण असते एवढे मात्र या दोन्ही प्रसंगांतून शिकलो.
….

आता एका प्रसंगात मला सहज कसे शिकायला मिळाले ते सांगतो. टुरिस्ट कारने प्रवास करीत होतो. एकीकडे चालकाशी गप्पा. त्यांचे शालेय शिक्षण फक्त चौथीपर्यंत झाले होते. पुढे परिस्थितीमुळे ते थांबवून बरीच अंगमेहनतीची कामे करीत ते मोठे झाले. आता जिद्दीने २ कारचे मालक झाले होते. त्यातली एक ते स्वतः चालवायचे तर दुसरीवर नोकर चालक ठेवला होता. त्या नोकराचे काही लबाडीचे अनुभव ते मला सांगत होते. दिवसअखेरीस तो गाडीतील गिऱ्हाईक पोचवून या मालकांना गाडी परत देई. असे काही नोकर एव्हाना बदलून झाले होते. हे नोकर त्यांच्या प्रवासातील गाडीच्या छोट्यामोठ्या खोट्या तक्रारी सांगत आणि दुरुस्तीसाठी पदरचे पैसे घातल्याचे सांगून ते मालकाकडून उकळत. त्यापैकी एक ठरलेली थाप म्हणजे एक चाक पंक्चर झाल्याची. त्याचे सहसा बिल मिळत नाही आणि मालक कशी खातरजमा करेल ? या गाड्यांचे स्पेअर चाकही तसे जुनेच झालेले असते.

सुरवातीस मालकांनी नोकरावर विश्वास ठेवून त्याला पंक्चर चे पैसे दिले. मात्र वारंवार असे होऊ लागल्यावर ते शहाणे झाले ! आता ते नोकरास गाडी सोपविण्याआधीच चारही चाकांच्या आतल्या बाजूस विशिष्ट ठिकाणी खूण करून ठेवतात. जर का खऱ्या पंक्चरसाठी चाक उतरवले तर ती खूण खात्रीने पुसली जाते. अशा प्रकारे पंक्चरचा खरेखोटेपणा सिद्ध होतो.
वरवर दिसायला किती साधी गोष्ट आहे ही. पण ते ती अनुभवातून शिकले होते आणि ती ऐकून माझेही बसल्याबसल्या शिक्षण झाले. हे खरे अनुभवजन्य शिक्षण.
…….

तुमच्यापैकी अनेकांना असे दोन्ही प्रकारचे अनुभव आले असतील- अनौपचारिक शिकण्याचे आणि शिकविण्याचे. ते इथे जरूर लिहा. त्यातून आपल्या सर्वांचेच अजून शिक्षण होईल अशी आशा आहे.

**********************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> ते घेण्यासाठी इच्छाशक्ती हा एकच गुण पुरेसा असतो. याप्रकारे कोणीही कोणाकडूनही काहीतरी शिकू शकतो >>>>
+ 786
हे महत्त्वाचे आहे .

छानच धागा आहे डॉक्टर!
____
मध्यंतरी सौम्य उन्हाळा होता, सकाळी ६:३० वाजता हवा तरीही जरा थंडच होती. वारा तर येतोच हडसन नदीवरचा त्यामुळे गारवा होताच. मी शेजारच्या स्टारबक्स मध्यस्टाउन कॉफी-बेगल वगैरे नाश्ता घेत होते. तेव्हा एक मनुष्य बेबी स्ट्रोलर घेउन आत शिरला. आई ग्ग!!!२ की ३ वर्षांचा एक चक्क अतोनात handsome म्हणजे फक्त गोड नाही तर देखणं बाळ त्या स्ट्रोलरमध्ये होतं. अनेक जण कौतुकाने पाहू लागले. नंतर तो माणुस कॉफी घेउन बाहेर पडला व मीही योगायोगाने बाहेर जाउन, एका कठड्यावर बसून मजा, रहदारी बघत उरलेली कॉफी पिऊ लागले. थोड्या वेळात माझ्या लक्षात आले ते बाळ फार रडतय. तो माणूस जेरीस आलाय पण याचं रडणं काही थांबत नाही. मग मी त्यांजपाशी जाउन म्हटलं - "किती थंडी आहे नाही आज? त्याला थंडी वाजत असावी."
यावर तो माणुस इतका अपसेट झाला, मला म्हणाला "तू काय त्याची आई आहेस काय? माइंड युअर ओन बिझनेस. " आणि अशा अर्थाचंच. बाप रे! मी म्हटलं हेर न्यु जर्सीअन्स उद्धट असतात ऐकलं होतं. आज पुरावा मिळाला. आता परत कोणाच्या खाजगी गोष्टींत नाक खुपसायचे नाही.

वरील सर्वांचे आभार .

** आता परत कोणाच्या खाजगी गोष्टींत नाक खुपसायचे नाही.
>>>>
असा धडा अनेक प्रसंगी मिळतो खरा ! आपले तोंड बंद ठेवण्याचे शिक्षण असेच अनुभवातून मिळते.

खूप सुंदर धागा आहे. यावर छान चालत्या बोलत्या प्रतिक्रिया येतील असे वाटते. विचार करून माझे अनुभव उद्या शेअर करतो.

लग्नानंतर नवा दोघांचा संसार थाटला होता. दोघे संध्याकाळी कामावरून येताना दुधाची पिशवी घेऊन यायचो. घरी फ्रीज नव्हता. मग ते तापवून ठेवायचो. थंडीत ते व्यवस्थित चालले होते. उन्हाळ्याची सुरवात झाली. आता मात्र दूध सकाळी उठल्यावर नासू लागले.

दुकानदाराशी बोलताना त्याने एक महत्वाचे सांगितले. दूध घरी आणल्यावर नेहमी दोनदा उकळायचे ( साधारण 2 तासांच्या अंतराने). मग नाही नासत.
पुढे ही सवय बराच काळ उपयोगी पडली.

आताच दुसऱ्या धाग्यावर एका साध्या प्रश्नातून अनौपचारिक शिक्षण असे झाले :

* प्रश्न :
आगगाडीचे "अप" आणि "डाऊन" कसे ठरवतात?

* उत्तर:
मध्य रेल्वेचे उदा घेतो.
तिचे मुख्यालय मुंबई. त्यामुळे तिथून तिच्या विभागात किंवा अन्यत्र सुटणारी गाडी 'डाऊन' आणि नेहमी विषम क्रमांकाची ( २२१०५)

आता तीच गाडी जेव्हा मुंबईकडे परतीचा प्रवास करेल तेव्हा झाली 'अप' आणि सम क्रमांकाची ( २२१०६).

… असे साधेसोपे पण महत्त्वाचे अनुभव जरूर लिहा.

लग्नानंतर जेव्हा वेगळा संसार थाटला तेव्हाचा एक प्रसंग लिहितो. घर लावून वगैरे झाले होते. सकाळी उठून किराणा दुकानात पोहे आणायला गेलो.

दुकानदाराने विचारले, "कुठले पोहे?" मला एकदम कळलेच नाही. पुन्हा मी म्हणालो, अहो, पोहे द्याना, त्यात कुठले काय विचारता?"
मग ते म्हणाले, " जाड की पातळ?"
मी: कुठले नेतात लोक नेहमी ?

मग त्यांनी मला मूलभूत गोष्ट सांगितली. जर कांदेपोहे करायचे असतील तर जाड, आणि चिवडा करायचा असेल तर पातळ.

… असे हे माझे पोहे शिक्षण ! वयाच्या २७व्या वर्षी झाले.

आमचे पहिले ड्रायव्हर अगदी मी लहान होतो त्यावेळपासून आमच्याइथे कामाला होते. त्यांना हे तंबाखूचं व्यसन होतं. हे तंबाखुवाले लोक ती मळण्यापासून थुंकून बाहेर टाकायला हाताचाच वापर करतात. मला तर त्यांचा फार राग यायचा या कारणाने. सर्वजण त्यांना हे व्यसन कस वाईट आहे वगैरे सांगायचे पण ते अभिमानाने म्हणायचे मी चौथीपासून खातोय आणि मला काही होणार नाही. नन्तर भारीतली गाडी आल्यावर तर आम्हाला हा त्रास जरा जास्तच जाणवायला लागला. मला नवीन गाडी घेऊन बाहेर मिरवण्याची भारी हौस पण त्याआधी मला कोलिन/स्यानिटायझर वापरून तीच स्टेरिंग साफ करावा लागे. पुढे काही महिन्यातच त्यांना लकव्याचा सौम्य झटका आल्याने त्यांनी ते काम सोडलं आणि आम्हीही काही वाईटपणा न घेता यातून सुटला म्हणून सुटकेचा श्वास सोडला.

मला डाळी ओळखता येत नसत, गव्हाचे पीठ आणि ज्वारीचे पीठ ओळखता येत नसे.. एकदा कांदेपोहे करण्यासाठी मी पातळ पोहे भिजवले होते, तोही फरक कळत नसे..
नंतर कधीतरी लहान बहिणीने समजावल्यानंतर ह्या गोष्टी कळल्या.. तिने समजावले तेव्हा मी 8वीत असेल आणि बहीण 2रीत (फेसपाम)

आमच्या घरी धाकटी बहीण व्यवहार चतुर आणि मी नुसताच पुस्तकी कीडा म्हणून ओळखल्या जात असू..

असे हे माझे पोहे शिक्षण ! वयाच्या २७व्या वर्षी झाले.>> 27 व्या वर्षी पोह्यातला फरक सांगावा लागणार्‍या व्यक्तीस दुकानातून पोहे आणण्याची ऑर्डर सहसा त्या व्यक्तीच्या मातोश्रींनी दिलेली नसते असे दुकानदारांचे सुद्धा शिक्षण झाले असेल. Proud
(हलकेच घ्या डॉक्टर काका)

वरील सर्वांचे अनुभव आवडले. येउद्यात अजून.

@ किल्ली
ज्वारी/गहू पीठाबाबत सहमत. मला ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ छान करता येते व नियमित करतो. घरी एकदा दोन्ही पिठांच्या डब्यांची अदलाबदल झाली होती. तेव्हा मी चुकून गव्हाचे पीठ घेऊन ते मळू लागलो अन सगळे चिकट झाल्यावर घोळ लक्षात आला. तरीही नेटाने ते मी थापलेच !
ही दोन्ही तयार पीठे आम्ही गिरणीतून आणतो. दोन्ही एकदम घेताना ते चालक नेहमी विचारतात की ज्वारीच्या प्लास्टिक पिशवीवर लिहून देऊ का? अर्थात मीही होच म्हणतो !

@ हाब,
सहमत ! Bw
आज इतक्या वर्षांनीही मी त्या दुकानदारांचा चेहरा आणि माझे ते शिक्षण विसरलेलो नाही. हल्ली घरी पातळ पोहे आणणे जवळपास नसतेच. तरीही जेव्हा केव्हा मी पोहे आणायला जातो तेव्हा ‘जाड पोहे’ म्हणताना मी ‘जाड’ हा शब्द किंचित जोरातच उच्चारतो ! तेव्हा मला ‘त्या’ गुरुचे नेहमी स्मरण होते.

काल कांदे विकत घ्यायला गेले असताना आणखीन दोनजणी आल्या. कांद्याचा भाव बघून (80/-) त्यांतील एकजण जरा विचारात पडली.. दुसरी कांदे निवडू लागली आणि म्हणाली, 'महागाईचं तरी कधी खायचं आपण'"..
मला आवडला हा दृष्टिकोन :स्मित : आता महागाईचं काहीही (अनिवार्य) घेताना हे शिक्षण लक्षात ठेवणार.

नवीन परिसरात राहायला गेलो तेंव्हाची गोष्ट. जवळ असा एकच पेट्रोल पंप होता, साधारण फसवणारी लोक आहेत हे लक्षात आल्यापासून मी कधीही फुल्ल पेट्रोल भरायला लागले, म्हणजे 200 च टाकून ते आधी मुद्दाम 50 च भरायचे ऐकूच आलं नाही असं दाखवून नंतर कुणीतरी सांगितलं मशीन मध्ये सेटिंग केलंय सो एकतर वेगळा आकडा सांगायचा नाहीतर फुल्ल करायचं. त्यातही एके दिवशी फुल्ल केलं बिल झालं 230 आणि तो शहाणा भय्या म्हणे 330। त्याने लगेच दुसऱ्याच पेट्रोल भरायला घेतलं आणि पाहिलं reading गेलं. मला वेड्यात काढून म्हणायला लागला मॅडम चलो देदो पैसे. मला रागच आला माझ्यासोबक्त लहान मुलगी होती माझी, मी थोडा आवाज चढवला तर ती रडायला लागते, मी तिला समजावलं की हेबघ हे काका जरा जास्त पैसे घेत आहेत, आपण त्यांना समजावू.
मी भैय्या ला म्हणाले, मुझे बिल दो. तरी तो ऐकेचना, मग मात्र जर आवाज चढवून म्हणलेच बिल दिखाव नाही तो मॅनेजर को बुला,
मग त्याने चुपचाप बिल दिल आणि 230 घेतले,
बायका म्हणून शांत बसून फसवणारे खूप असतात.

उच्चशिक्षण आणि व्यवहारज्ञान यातील फरक स्पष्ट करणारी आमच्या शेजारची एक घटना :

रविवार होता. माझ्या दारावरची बेल वाजली. शेजारचे गृहस्थ होते. म्हणाले की आमच्या घरचा विजेचा फ्युज उडालाय. त्यांना मिक्सर चालवायचा होता. तर माझ्याकडे आणू का असे म्हणाले. मी हो म्हणालो. ते म्हणाले की त्यांच्याकडेचा एक इलेक्ट्रिक point खराब झाल्याने फ्युज गेलाय. आता दुकाने उघडली की ते माणसाला बोलावतील. माझ्याकडून त्यांनी मिक्सरचे काम केले.

संध्याकाळी मी त्यांची चौकशी केली- फ्युज बसला का म्हणून. पण मामला एकदम सोपा होता. त्यांच्या कामवाल्या बाई आल्यावर त्यांनी यांना सांगितले की मेन बोर्डाच्या इथले बटन बघा. ते खाली गेले असेल. अन ते बघताहेत तर काय ! खरेच तसे होते. ते ‘ट्रीप’ झाले होते. ते नुसते वर केले अन लाईट चालू.

<< मग ते म्हणाले, " जाड की पातळ?"
मी: कुठले नेतात लोक नेहमी ? >>

------ दोन्ही प्रकारचे (आणि असलेच तर तिसरा मध्यम) पोहे आणायचे. आजकाल पातळ पोहे पण खूप पातळ झाले आहेत. आणि जाड पोह्यांची जाडी पण कमी झालेली आहे.

तिसरा मध्यम >>>>
बरोबर ! पण हा प्रकार अगदी मोजक्या दुकानांत असतो.
आता पोहे या विषयाचा बराच अभ्यास झाला आहे. Bw

नायलॉन पोहे समजलेत . दिवाळीच्या आधी नेहमीच्या दुकानांत भाजके पोहे येऊ लागतात... वगैरे

आम्ही नवीनच राहायला गेलो होतो. येऊन सहा महिनेच झाले होते. कोणाची फार ओळख नव्हती. समोरच्या फ्लॅटमधलेही आमच्यासारखेच नोकरीमुळे दिवसभर घरी नसायचे. त्यामुळे लॅच असूनही आम्ही दाराला कुलूप लावून जात असू.
लग्नानंतरची पहिलीच दिवाळी होती. दोन दिवस जोरात साफसफाई केली. दाराला लावायचं पितळेचं कुलूपही चकचकीत केलं.....
ऑफिसला आम्ही दोघंही सोबत निघत असू. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जातांना कुलूप लागेना. तरीही नवऱ्याने शक्तीचे प्रयाग करुन ते लावलं.
संध्याकाळी मी आधी येत असे. दिवाळीसाठी पणत्या, हार, फुलं, नारळ, भाज्या असं बरंच सामान घेऊन मी घरी आले. दार उघडायला गेले तर उघडेना. बरीच खटपट करुन पाहिली. नंतर खाली जाऊन वॉचमनला चावीवाला घेऊन येशील का विचारलं. तर त्याने आता इतक्या उशिरा मिळणार नाही असं सांगितलं. तेव्हा आतासारखे मोबाईलही नव्हते.नवरा अजून दोन तासांनी येणार होता. सामान घेऊन खाली बसं एवढाच पर्याय होता. पण मग सगळ्या बिल्डिंगला कळलं असतं. इतक्यात मला एक उपाय सुचला. थंडीचे दिवस असल्याने पर्समध्ध्ये कोल्ड क्रिम होतं. मी ते चवीला चोपडलं आणि चावी फिरवली. कुलूप उघडलं!
त्या घटनेपासून मी धडा घेतला कि, कुठलीही अवघड गोष्ट खटपट करुन तात्पुरती झाली असेल तर पुन्हा पडताळून पाहायची. घाईघाईत काम आटपायचं नाही. सकाळीच कुलूप आता लागलंय पण उघडतंय का, हे पाहायला हवं होतं. किंवा लावायला नको होतं.

Tv सिरियलच्या माध्यमातुन कणिक मळायला आणि पुर्या करायला शिकले.. हा उद्योग आई घरात नसताना केला खरा पण नंतर किचनचा पसारा आवरताना नाकीनऊ आलेले. त्यादिवशी आईनी केलेल कौतुक आणि मला मिळालेला ओरडा आजही आठवतो.. Happy

** असे हे माझे पोहे शिक्षण ! वयाच्या २७व्या वर्षी झाले.Submitted by कुमार१ on 19 November, 2019
>>>
पोहे शिक्षण अजूनही चालूच आहे !

नुकताच आलेला अनुभव. दुकानातून दहा-बारा वस्तू घेतल्या तेव्हा घाईत त्यांनी बांधलेली प्रत्येक गोष्ट नीट तपासून घ्यायची राहिली.
त्यांना अर्धा किलो जाड पोहे असे सांगितले होते. घरी येऊन पाहतो तर ते बारीक आकाराचे, जवळपास मोठा तांदूळ असावा असे.

मग गृहमंत्र्यांनी सांगितले,
" त्याला दगडी पोहे म्हणतात !"

आता हे पोहे जरा जास्त काळ भिजत ठेवून मग फोडणीला देत आहे.