लबाड लांडगे

Submitted by Asu on 15 October, 2019 - 01:50

लबाड लांडगे

आरबीआय उगवता सोटा
बँकेत पैसा झाला खोटा
असून खाती भरपूर साठा
खातेदार ठरला घरी भामटा

असुनी खरा मालक घरचा
झाला आज दीन भिकारी
पोट भरण्या सांजसकाळी
वणवण भटके दारोदारी

ओझे कुणाचे कुण्या खांदा
रोजचे जगणे झाले वांधा
लबाड लांडगे दूऽर पळाले
शेळ्या-मेंढ्या रडवून गेले

गोरगरीबांच्या कष्टांचा पैसा
धनिक उडविती पाणी जैसा
कुंपणच जर का शेत खाई
देणार कवण मग भरपाई

बँकेत पैसा सुरक्षित नाही
पैसा ठेवावा कुठल्या ठाई
अंधार दाटला उजेड नाही
असुरक्षित दिसते पाई पाई

अन्याय कसा हा करशी देवा
धनदांडगे लबाड खाती मेवा
दिनरात करुनी कष्ट अन् सेवा
हेच नशिबी का आमुच्या देवा

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults