कविता माझी अशी खट्याळ आहे कि...

Submitted by दत्तप्रसन्न on 14 October, 2019 - 17:17

कविता माझी अशी खट्याळ आहे कि
जेव्हा खूप वेळ असतो आणि
लिहायचा पण मस्त मूड येतो
तेव्हा सुचत नाही म्हणजे नाही

ती सुचते हे म्हणणहि
तितकंसं बरोबर नाही
ती येते आपणहून तिच्या मर्जीने
काळ वेळेचं गणित तिला मान्यच नाही

ती असते अवखळ फुलपाखरू कधी
भिरभिरत येते लगट करू पाहते
ऐन कामात हट्ट करीत बसते
ओरडतो मी तेव्हा तिच्यावरही

मग कशी लांब जाऊन अगदी रुसून बसते
वाटतं मग वाईट मलाही
थोड्यावेळाने जवळ ये म्हंटलं
तर हॅट म्हणून लांब पळून जाते

कवितेशी झालं आहे आता नातं अतूट
तिनंच स्वतःहून निर्मिलं ते खरं
होती इतकी वर्षं लपून कुठे ती ?
असो, वेळेत आली हे नसे कमी कि

आहे माझ्या मुलीसारखीच ती
कारण येते तेव्हा अशी बिलगून बसते
कि जगाचं काय स्वतःच देखील
भान उरत नाहीहि

कधी कधी आई देखील होते
मग सगळं सगळं रितं करतो तिच्याच कुशीत
डोळे मी पुसत राहतो
पण मोकळं आकाश सारं तीच करून देते

होते अचानक बायको सुद्धा ती
अबोलपणे पाठीवर अलगद
हात फिरवत आधाराचा
बसून राहते दिवस दिवस शेजारी

बहिणीचं नातं देखील जपते अशी कि
गुपचूप सगळं ऐकून घेते
म्हणते, असलास चूक तरीही
साथ कधीहि सोडणार नाही

येते तेव्हा अशी नुसती बरसत राहते
चिंब चिंब न्हाऊन, परत जायच्या आत ती
साठेल तेवढं साठवत, झेपेल तेवढं झेपवत
तळहातावर माझ्या, मग उतरवत बसतो मीही

Group content visibility: 
Use group defaults