नेटफ्लिक्स: एक चिंतन

Submitted by सई केसकर on 10 October, 2019 - 03:31

आमच्याकाळी काय एक एक सिरीयल असायच्या!
तेव्हा असं ढ्याण ढ्याण ढ्याण करून तीन वेळा बटबटीत मेकअपचा क्लोजअप नसायचा. सिरीयलमधले लोक अभिनय करतायत आणि त्यांना कुणीतरी त्याचे पैसे देऊ करतंय असंच मुळी वाटायचं नाही. अहाहा! काय ती अमुक सिरीयल! अहाहा!काय ती तमुक सिरीयल!
ह्या असल्या चर्चा आताशा फार होऊ लागल्या आहेत. आणि चर्चा करणारे माझ्या आई वडिलांच्या वयाचेही नाहीत! ते माझ्याच वयाचे आहेत!
आई-वडील आनंदाने ढ्याण ढ्याण बघतात.

'दुःखाच्या पावसाने हे मन कावरे' अशा नावाच्या सिरीयल मधल्या हिरोईनीच्या भुवया सुरवंटासारख्या  का आहेत असे आईला विचारलं असता, "ती गरीब घरातली आहे म्हणून", असं उत्तर आलं. मग यथावकाश तिचं एका श्रीमंत मुलाशी लग्न झालं. आता ती भुवया नीट का करून घेत नाही असं   विचारल्यावर, "तुझ्यासारखी उधळी नसेल ती. आठवड्यातून दोनदा पार्लरमध्ये जायला", असा कडवट्ट डायलॉग आला. कुणीतरी एका कार्यक्रमात आमच्या (म्हणजे मिलेनियल्सच्या) लहानपणीच्या सिरीयलबद्दल स्मरणरंजन चालू केल्यावर माझी आई आणि तिच्या काही मैत्रिणींनी  लगेच, "या हल्लीच्या पिढीला ना, आहे त्यात सुख नाही! सुख बोचतंय यांना!" असले वर्षानुवर्षं प्रस्थापित संवाद उपसले.
अरेच्या! दर्जेदार शिरलींबद्दल थोडं सेंटीसुद्धा व्हायची मुभा नाही का? असं विचारल्यावर,
"आमच्यावेळी असं भसाभसा इंटरनेट नव्हतं. हल्ली तुमचं ते नेटफ्लिक्स, ऍमेझॉन, हॉटस्टार (व्हूट यात येत नाही कारण ते लग्नकार्य किंवा मयतींमुळे बघता न आलेलं ढ्याण ढ्याण बघायला वापरतात) वगैरे नव्हतं! आमच्या वेळी.... "
"ओ काकू! टेप पॉझ करा जरा. या प्रवासात काही दिवस आपण एकत्र होतो, तेव्हाच्या शिरलबद्दल बोलतोय आत्ता"
"आम्हालाही आवडायच्या त्या शिरली! पण याचा अर्थ आत्ताच्या वाईट आहेत असा होत नाही!" एका काकूंनी शेवटी गाडी समेवर आणली.
आक्षेप त्यांच्या अभिरुचीला तुच्छ लेखण्याला होता. पण तो तर आमचा स्थायी गुणधर्म आहे!

एक तर हे असले सारखे आमचं सुख काढणारे पालक, त्यात जिओचा डेटा. आणि नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ऍमेझॉन, त्यातून वेळ उरला तर न्यूज चॅनल्स, या सगळ्यामधून काय बघावे त्याची निवड. हे सगळं किती असह्य आहे! कुणीसं म्हंटलं होतं, "चॉईस इज हेल". खरंतर आमच्या पिढीची हीच अडचण आहे. मी लहान होते तेव्हा गोल्डस्पॉट, थम्सअप, लिम्का अशी तीन पेये असायची. मॅगी हे एकमेव जंकफूड असायचे. आई शनिवारी ऑफिसला गेली की बाबा मला मॅगी करून द्यायचा. आणि आम्ही विश्वमध्ये (जिथे जक्कल खुनाचे रिसर्च करायचा) जाऊन बसायचो. बाबा माझ्या शेजारी बसून मस्त सिगारेटी फुकायचा आणि मला गोल्डस्पॉट प्यायला द्यायचा. मग त्याचे दोन-तीन लुक्खे मित्र पण यायचे. बुश कसा हरामखोर आहे, गार्बोचाव कसा चुकला वगैरे वगैरे गप्पा मारत दिवस घालवायचे.
लहान मुलीला मॅगी, कोल्ड्रिंक द्यावे का? तिला पॅसिव्ह स्मोकिंगचा त्रास होईल का? वगैरे प्रश्नच त्याकाळी उपलब्ध नव्हते.
आत्ता जर मी माझ्या सुपुत्राला कोक देऊन त्याच्यासमोर विड्या ओढत बसले तर पस्तिसाव्या मिनिटाला कुठलेतरी काका माझा (परवानगी शिवाय) फोटो काढून, "ही आजची पिढी! लहान मुलाला कोल्ड्रिंक देऊन आई स्वतः त्याच्या समोर बसून विडी ओढते आहे. काय होणार या चिमुकल्याचं?" असा मजकूर टाकून मला व्हायरल करतील. आणि त्यापेक्षाही महत्वाचे,  माझा मुलगा कोकाकोला पितोय असं स्वप्न जरी मला पडलं तरी मी खडबडून जागी होऊन झोपलेल्या मुलाला धपाटा घालून येईन (धपाटे घालावेत की नाही याबाबद्दल अजूनही अस्वस्थपणे साशंक असतानाही). चांगले पालक कसे असतात हे पालक होण्याआधी साधारण दहा वर्षं मला माहिती होतं. अर्थात माझ्या पंधरा वर्षांपूर्वीच्या चांगल्या पालकाच्या व्याख्येत मी कुठूनच बसत नसले तरी निदान मी मुलाला कोक देऊन विड्या ओढत नाही ही त्यातल्या त्यात जमेची बाजू.

आमच्या लहानपणी रविवारी सकाळी रंगोली, नंतर चित्रहार, मग संध्याकाळच्या मालिका वगैरे असायच्या. घरातले सगळे अगदी भक्तीभावानं टी.व्हीसमोर बसायचे. रामायण वगैरे बघायला तर शेजारीसुद्धा यायचे. ज्यांच्याकडे रंगीत टीव्ही असायचा त्यांच्याकडे खास गर्दी असायची. तेव्हा असं दूरदर्शनच्या रामायणाच्या ब्रेक मध्ये स्टारस्पोर्ट्सवर मॅच बघा असलं मल्टिटास्किंग नसायचं कारण: चॅनल एक, शिरल एक, दर्शक अनेक!
असे शेजारी पाजारी गोळा करून रविवारी सकाळी (आलेल्या शेजाऱ्यांकडूनच) केस रंगवून घेत रामायण बघणाऱ्या आई-बाबांनी दोन वर्षांपूर्वी भांडून आपापले दोन टीव्ही घरात नांदवायला आणले.

आता संध्याकाळी, स्टार प्रवाहच्या ब्रेकमध्ये झी मराठी. झी मराठीच्या ब्रेक मध्ये कलर्स वगैरे करत डोक्यात कन्टेन्टची खिचडी बनवत आई डुलक्या घेते. तर प्रत्येक न्यूजचॅनेलचा खिडक्यांमधला आरडाओरडा ऐकत बाबा त्याबद्दल  फेसबुक पोस्ट टाकतो. तर आमच्याकडे, नवऱ्याबरोबर एखादी नेटफ्लिक्स मालिका बघायचं वचन देऊन, तो नसताना तिचा फडशा पाडून विश्वासघात सुरु असतो. कधी कधी काय बघावं हे ठरवता ठरवता इतका वेळ जातो की तो रिमोट हातात घेऊनच सोफ्यावर झोप लागते आणि सकाळी मान एकाच दिशेला वळतीये असं लक्षात येतं. पूर्वी स्टेटस कॉन्शस लोक एकमेकांना भेटले की गाड्यांच्या नाहीतर शेअर बाजाराच्या गप्पा मारायचे. आज-काल तुम्ही नेटफ्लिक्सवर काय पाहता यावर जास्त बडबड असते. एकदा मी अशाच कुठल्याश्या मैफिलीत, "ये गणेश गायतोंडे कौन हैं? नाम सुना हुआ लग राहा हैं", असं माझ्या नवऱ्याला कोपऱ्यात नेऊन विचारलं होतं. तेव्हा तो म्हणाला की ते नाव डायरेक्ट माझ्या सबकॉन्शसमध्ये घुसलंय कारण मी रोज तो टीव्हीवर आल्या आल्या घोरू लागते.

टीव्हीवरची हिंसा बघण्याचा माझ्यावर फार विचित्र परिणाम होतो. जितकी जास्त हिंसा, तितकी लवकर मला गाढ झोप लागते. त्यामुळे असं रक्तानं माखलेलं प्रेत वगैरे ज्याच्या सुरुवातीच्याच दृश्यात असतात त्या मालिका मी खास "रेस्टिल" लिस्ट म्हणून मार्क करून ठेवते. फॉरेन्सिक फाईल्स, वूमेन हू किल, कॉन्फेशन टेप्स वगैरे लावून जशी झोप येते तशी ध्यान, योग, विपश्यना कश्शा कश्शाने येत नाही!

एखादी मालिका आवडली की पूर्वी एक आठवडा थांबायला लागायचं. आता एका दिवसात तिचा फडशा पडून सुन्न होता येतं. परवा एका मैत्रिणीला तू "द स्पाय" नक्की बघ असं फोनवर सांगितलं. तर तिच्या, कशाबद्दल आहे याचे उत्तर देताना माझ्या मनाच्या पटलावर इम्रान हाश्मी, साशा बॅरन आणि मनोज वाजपेयी सगळे एकदम हजर झाले. मग मांजर भिजल्यावर जसं पाणी झटकतं तशी मान झटकून मी तिला बरोबर माहिती देऊ केली. आमच्याकडे एकच टीव्ही आहे कारण तसं  केल्यानं  पैसे वाचतात आणि आई वडील कसे चुकीचे आहेत हेदेखील सिद्ध करता येतं. नेटफ्लिक्सवर काय बघू हे ठरवता ठरवता झोप न येण्यासाठी नेटफ्लिक्सवर काय बघायचं याचे आम्ही फेसबुकवर क्लासेस लावलेत. म्हणजे मीच लावलेत. नवरा नवर्याच्या भूमिकेत राहून फक्त माझ्या आयत्या रिसर्चवर शेरे मारतो. पण परवा नवरा नेटफ्लिक्स ऍमेझॉन सोडून सोनी मॅक्सवर (आमच्या ६ वर्षांच्या एकत्र सहवासात) पंचाहत्तराव्यांदा सूर्यवंशम पाहू लागला. का विचारल्यावर, "यहाँपे कन्फ्युजन नही हैं", असं अंतर्मुख करणारं उत्तर आलं.

रविवार दुपार अशा एकापाठोपाठ एक मालिका बघण्यात घालवली की संध्याकाळी जसं वाटतं त्याला आम्ही "कन्टेन्ट ब्लूज" असं नाव दिलं आहे. असं वाटायला लागलं की आम्ही ओला करून लक्ष्मी रोडवर जातो. मग माझा नवरा मला, "कभी कभी अपने पेरेंट्सके टाइममे जाना अच्छा लगता है. पैदल चलो, थ्री डायमेन्शनल दुकानसे शॉपिंग करो".
नेमका त्यावेळीच बाबांचा फोन येतो, "ऍमेझॉनवर सेल लागलाय. मी हा आत्ताचा फोन बदलून दुसरा घेणारे. तू पण बघ!" 

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा मस्त..
पूर्वी आमच्याकडे एक टिव्ही होता. नवरा घरात असला की रिमोटवरून भांडणे होत. मग टिव्हीच काढून टाकला. नंतर प्राइम घेतले. ते स्वस्त आहे आणि तिथला कंटेंट अधूनमधून एखादे काही चांगले इतपतच असतो. बरेचसे बिंजींग करून संपवून झालेले आहे. हल्लीच १०-१५ दिवस झाले नेटफ्लिक्स घेतले आहे. कंटेंट प्रचंड आहे. व्यसन लागायचे चान्सेस खूप आहेत. त्यामुळे फ्री ट्रायल संपल्यावर काढून टाकणार आहे नेटफ्लिक्स. प्राइमवरचा अधूनमधून बरा कंटेंट इतपतच टेम्प्टेशन बरे.

असे शेजारी पाजारी गोळा करून रविवारी सकाळी (आलेल्या शेजाऱ्यांकडूनच) केस रंगवून घेत रामायण बघणाऱ्या आई-बाबांनी दोन वर्षांपूर्वी भांडून आपापले दोन टीव्ही घरात नांदवायला आणले. >>
आमच्याकडे एकच टीव्ही आहे कारण तसं केल्यानं पैसे वाचतात आणि आई वडील कसे चुकीचे आहेत हेदेखील सिद्ध करता येतं. >> हे फारच उच्च आहे! Happy
सगळाच लेख मस्त जमलाय.

Pages