सूर्य तो अस्तास जातो

Submitted by निशिकांत on 7 October, 2019 - 00:15

( तरही गझल. मतल्यातील  सानी मिसरा गझलकार श्री राज पठाण यांचा. )

अंतसमयी सोडुनी मधुमास जातो
 उगवतो जो सूर्य तो अस्तास जातो

सोडुनी सुख आजचे जो तो प्रयत्ने
किर्तीरूपे व्यर्थ का उरण्यास जातो?

वांझ ढगही गाळती अश्रूस जेंव्हा
राबणारा घ्यावया गळफास जातो

देव नाही, भक्त देती भीक म्हणुनी
पायरीवर पोट मी भरण्यास जातो

येत तू नसतेस पण का भास होता
वेंधळा मी दार उघडायास जातो?

"ध्येय ठेवा उंच" हे शिकल्यामुळे मी
शक्य नसते तेच ते करण्यास जातो

मोडला ताठर कणा हे ठीक झाले
माज सरला, लीनता शिकण्यास जातो

नेहमी मोसम कसा हा आठवांचा?
बोच, मयखान्यात, विसरायास जातो

रोज हा "निशिकांत" हलकल्लोळ कसला?
नातवांना श्लोक शिकवायास जातो

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users