हंगामा है क्यों बरपा

Submitted by सतीश कुमार on 6 October, 2019 - 05:00

थोड़ी सी जो पी ली है....

साधारण १९८४च्या मार्च मधे सुरत मधल्या गांधी भवनात पंकज उदास यांच्या गझल गायनाच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. त्याला कार्यक्रम या शब्दाऐवजी मेहफिल असं म्हणणं जास्त योग्य कारण सर्व गझलां "वारुणी" या विषयावर होत्या. पंकज उदास यांचे " पैमाना " हे आल्बम नुकतेच प्रकाशित झाले होते आणि त्यातली शराब चीज़ ही ऐसी हैं,मज़ा लेना है पीने का,ये अलग बात है साकी ,कभी मैखाने तक जाते ,ना समझो के हम पी गए, सबको मालूम है मैं शराबी नही,मैकदा था चाँदनी थी, ला पिलादे साकीया, कब जाम चला आणि सागर से सुराही या गझलांनी महफिल अशी रंगत गेली कि प्रत्येक गाण्याचा वन्स मोअर झाला.पंकज उदास यांनी गझला त्यांचा खास अंदाजात अशा पेश केल्या कि नंतर " पैमाना " ही रेकाँर्ड तूफान खपली आणि अर्थातच मी ही खरेदी केली. त्या अर्थपूर्ण गझला ऐकून आपले ऋषी मुनी सोमरसाच्या प्रेमात आकंठ का बुडाले होते याचा मला नव्याने शोध लागला. त्या नंतर दिवस रात्र गजल ऐकणे हा एकच कार्यक्रम असायचा. पण मोठा कँसेट प्लेअर आत बाहेर करायला अवघड. सोनी या जपानी कंपनीचा, कँसेटच्या आकारात वाँकमन हा कँसेट प्लेअर मिळत असे. तो घेतला आणि असंख्य कँसेट्स घरात आल्या. माझा मोठा भाऊ पण गझलचा दिवाणा. कँसेटचा स्वच्छ आवाज येत नाही म्हणून तो 78 rpm च्या LP विकत घ्यायचा. रेकाँर्ड प्लेअर वरती ऐकताना खरेच छान वाटे.पण एक रेकाँर्ड संपली कि दुसरी लावताना उठावे लागते आणि रसभंग होतो म्हणून त्याने एका पाठोपाठ एक अशा दहा रेकाँर्ड्स लावता येतील असा फिलीप्स कंपनीचा रेकाँर्ड चेंजरच विकत घेतला. ४५० मिनिटे म्हणजे जवळजवळ सात तास एका जागी बसून गझला ऐकण्याचा पराक्रम आम्ही केला. आताच्या भाषेत " बींज लीसनिंग!" हजारो कँसेट्स आणि तेवढयाच तबकड्यांची चळत दिवाणखान्याला शोभा आणीत असे. पंकज उदास, मेहदी हसन, गुलाम अली,तलत अझीज, आपले मुकेश, तलत मेहमूद आणि मोहम्मद रफी साहेब,हरीहरन, अशोक खोसला,अनुप जलोटा, पिनाझ मसानी, राजेंद्र मेहता, नीना मेहता, नुसरत फतेह अली खान,भूपेंद्र, आणि अर्थातच गझलसम्राट जगजीतसिंग या सर्वाना दिवाणखान्यात मानाची जागा होती.खरं म्हणजे सगळेच सम्राट होते.कोणी बादशहा तर कोणी राजाधिराज,कोणी चक्रवर्ती तर कोणी सत्ताधीश. उर्दू शब्द, त्यांची नजाकत, गायकांनी केलेले उच्चार आणि कवींनीं रचलेल्या गझला सारेच अवर्णनीय! उर्दू शायर आणि शायरी यांची दुनियाच वेगळी. मिर्झा गालीब, बशीर बद्र, मीर तकी मीर, हसरत मोहानी, कैफी आजमी, निदा फाजली, फिराक गोरखपुरी, मोमीन, दाग देहलवी, फैज अहमद फैज, हसरत जयपुरी,गुलझार, सुदर्शन फकीर, खामोश देहलवी, सरदार अंजुम, अनवर फरूकाबादी, साहीर लुधियानवी, जोश मलीहाबादी, शेख आदम आबूवाला, मुमताज राशीद,अकबर इलाहाबादी. किती म्हणून सांगायचं? एक एक गझल म्हणजे तत्त्वज्ञानाचे भांडारच. या मंडळींना खरोखरच मनापासून अगदी वाकून नमस्कार करायलाच हवा.आपले जीवन समृद्ध करण्यात ह्यांनी काहीच कसर सोडली नाही.

मी तेंव्हा विचार करत होतो की मद्य या विषयावर इतर गझल गायक का गात नाहीत आणि नेमकं त्याच सुमारास गुलाम अली यांच्या " आवारगी " , " चुपके चुपके रात दिन "आणि त्या बरोबर " हंगामा है क्यौं बरपा " या तीन गझलांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. या तीन गझलांनां रसिकांनी इतकं डोक्यावर घेतलं कि गुलाम अलींनां लाईव कार्यक्रम करतांना दुसरी एखादी वेगळी गझल गाऊच देत नसत. " आवारगी" ने किती वन्स मोअर घ्यावे त्याला काही सुमार नसे. " चुपके चुपके " ह्या गझलेबद्दल रसिकांना काय सांगावं? राज बब्बर चा निकाह हा चित्रपट केवळ ह्याच गझलेनी तारलं असं म्हणायला हरकत नाही. " चुपके चुपके" गायच्या सुरूवातीला गुलाम अली एक शेर म्हणत. ती त्यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी रसिक इतके आतुर होत कि ही गझल कार्यक्रमात शेवटची असे. तो शेर असा- " अब मैं समझा तेरे रुखसारपे तील का मतलब, दौलत-ए-हुस्न पे दरबान बिठा रखा है "( आता कळलं तुझ्या गालावरच्या तिळाचा अर्थ, सौंदर्याच्या संपत्तीवर पहारेकरी बसवून ठेवलंयस ) आणि मग " चुपके चुपके " ची सुरुवात होई. " हंगामा है " गातानां देखील गुलाम अली सुरूवात शेरनीच करायचे.मूळ गझलेत हा शेर सर्वात शेवटी आहे.तो असा- " मै तेरी मस्त निगाहीका भरम रख लूंगा, होश आया तो भी कह दूंगा मुझे होश नही." याचा अर्थ काय होतो हे पूर्ण गझलेचा अर्थ कळला कि लगेच उमगतं. " हंगामा है " चा इतिहास ज्यांना ठाऊक आहे त्यांना नक्कीच कळेल कि ही गझल एवढया उच्च दर्जाची का आहे. मुस्लीम समाजात दारु पीणं पाप समजतात. ही गझल लिहिली अकबर इलाहाबादी यांनी. हेच ते अकबर इलाहाबादी ज्याना ऋषी कपूर अमर अकबर अँथनी मध्ये " " मै हूं अकबर इलाहाबादी" म्हणतो. ते शायर होते आणि उच्च विद्या विभूषित होते. कायद्याचा अभ्यास केलेले अकबर इलाहाबादी अलाहाबाद कोर्टात सेशन्स जज्ज या पदावर कार्यरत होते. अकबर इलाहाबादी नेहमीच हिंदू मुस्लीम ऐक्याबद्दल बोलत असत.मुस्लीम लीग आणि काँग्रेस यांना ते आवडत नसे आणि इलाहाबादींचा पाणउतारा करण्याची संधी ते सोडत नसत. इलाहाबादी मग आणखी त्वेशांने हिंदू मुस्लीम सहभागा बद्दल बाजू मांडीत असत.अशावेळी कोणीतरी बोलले कि इलाहाबादीनां हिंदूंनी दारु पाजली आहे,म्हणून ते असे बरळत आहेत. अशा स्थितीत इलाहाबादीनीं ह्या गझलेतूनच उत्तर दिले.( संदर्भ - Indian Muslims. Where Have They Gone Wrong? By Rafiq Zakaria.)

हंगामा है क्यूँ बरपा, थोड़ी सी जो पी ली है.डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है.
(एवढा गोंधळ कशासाठी? दरोडा नाही घातला वा चोरी पण नाही केली.एक घोटभर फक्त प्यायलो आहे).

ना-तजुर्बाकारी से, वाइज़ की ये बातें हैं, इस रंग को क्या जाने, पूछो तो कभी पी है. ( अनुभव नसलेल्या सल्लागाराने उपदेश दिलाय.विचारा त्याला, कधी प्यायलायस? कसा असतो त्याचा रंग ?)

उस मय से नहीं मतलब, दिल जिस से है बेगाना, मक़सूद है उस मय से, दिल ही में जो खिंचती है. ( मनाला ठाऊक नसलेल्या प्यालाशी काय घेणे? हृदय ज्या साठी आसुसलय तीच खरी दारु.)

वां दिल में कि दो सदमे,यां जी में कि सब सह लो,उन का भी अजब दिल है, मेरा भी अजब जी है. ( तिथे छातीत दोन धक्के बसलेत आणि इथे आमचं मन सहन करतय. खरंच दोन्ही, त्यांचे हृदय आणि आमचे मन, अजबच आहेत).

हर ज़र्रा चमकता है, अनवर-ए-इलाही से,हर साँस ये कहती है, कि हम हैं तो ख़ुदा भी है. ( ईश्वरी प्रकाशाने प्रत्येक कण चमकतोय, आणि आमचा श्वास हेच सांगतो आहे, आम्ही आहोत तर ईश्वर आहे).

सूरज में लगे धब्बा, फ़ितरत के करिश्मे हैं, बुत हम को कहें काफ़िर, अल्लाह की मर्ज़ी है. ( सूर्याला पण ग्रहण लागते.निसर्गाचा चमत्कारच.आणि हे पुतळे ( ज्यांना हृदय नाही त्यामुळे आत्मा ही नाही असे ) आम्हाला फितुर ठरवतात.अल्ला कि मर्जी, काय करणार?).

अशा अनेक उत्तम गझलांनी उर्दू साहित्य समृद्ध झालेले आहे, आणि त्याला सुरमई करून गायकांनी अमीट छाप सोडली आहे. .................

Group content visibility: 
Use group defaults

>>सौंदर्याच्या संपत्तीवर पहारेकरी<<<

इथे संपत्ती ऐवजी खजिना शब्द जास्त सुयोग्य ठरेल का..?

माझ्या ऑल टाईम फेवरीट गझलांपैकी सगळ्यात पहिली म्हणजे 'चुपके चुपके,' आणि दुसरी 'हंगामा है क्यू बरपा?'
छान लेख!

@निरू, होय खजिना शब्द जास्त जवळचा वाटतो. पण खजिना लुटला ही जातो आणि संपत्ती चल किंवा अचल वाढवली तर वाढते. पण तुमची सूचना शिरोधार्य! थॅन्क्स.

व्यासंग आणि आवड पाहून भरून आलं. गझलेतील काही कळत नाही पण चुपके चुपके ऐकायला खूप सुंदर आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!

>>" चुपके चुपके" गायच्या सुरूवातीला गुलाम अली एक शेर म्हणत. ती त्यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी रसिक इतके आतुर होत कि ही गझल कार्यक्रमात शेवटची असे. तो शेर असा- " अब मैं समझा तेरे रुखसारपे तील का मतलब, दौलत-ए-हुस्न पे दरबान बिठा रखा है "<<
वेगेवेगळी वर्जन्स आहेत या गझलेची. माझ्याकडे आहे त्यात "चुपके चुपके..." च्या सुरुवातीला हा शेर आहे, आणि त्यानंतर "अब मै समझा..."

अपनी आवाज़ की लर्जिश पे तो काबू पा लो , प्यार के बोल तो होंटों से निकल जाते हैं..
अपने तेवर को संभालो के कोई ये न कहे , दिल बदलते हैं तो चेहरे भी बदल जातें हैं...

आणि "हंगामा है क्युं..." च्या सुरुवातीला हा शेर आहे -

ये अलग बात है साक़ी के मुझे होश नहीं, वरना मैं कुछ भी हूँ एहसान-फ़रामोश नहीं..
मैं तेरी मस्त-निगाही का भरम रख लूँगा, होश आया भी तो कह दूँगा मुझे होश नहीं...

सुरेख लेख. मस्तच लिहिलय.
गुलामसाहेबांचा शिशमहल नावाचा एक अल्बम आहे. अप्रतिम आहे अगदी.
काही शेरचे अर्थ चुकलेत असे वाटते.

मिर्झा गालीब, बशीर बद्र, मीर तकी मीर, हसरत मोहानी, कैफी आजमी, निदा फाजली, फिराक गोरखपुरी, मोमीन, दाग देहलवी, फैज अहमद फैज, हसरत जयपुरी,गुलझार, सुदर्शन फकीर, खामोश देहलवी, सरदार अंजुम, अनवर फरूकाबादी, साहीर लुधियानवी, जोश मलीहाबादी, शेख आदम आबूवाला, मुमताज राशीद,अकबर इलाहाबादी. किती म्हणून
>>> या शायरांवर खूप सुंदर लेख वाचलेले आठवतात. प्रत्येकाची जडणघडण, विचार, वागण्याची पद्धत असं एकेक जणावर लेख आलेले आठवतं. मला वाटतं इथंच माबोवरच होते बहुतेक.