पुस्तक - SoulMates - Thomas Moore

Submitted by सामो on 5 October, 2019 - 16:36

***** चित्रे जालावरुन साभार********
.
थॉमस मूर हे माझ्या काही आवडीच्या इंग्रजी पुस्तक लेखकां पैकी एक लेखक आहेत. बर्‍याच वर्षांपूर्वी त्यांचे एक पुस्तक वाचनात आले होते ज्याचे नाव आहे - Soul Mates: Honoring the Mysteries of Love and Relationship - Thomas Moore. आपले मन किती खोल असते, गूढ असते, अनेक पदर असतात आपल्या अस्तित्वाला, आत्म्याला, भावनांना. हे सर्व पदर फक्त तर्काने समजून घ्यायचेही नसतात, ना घेता येतात. खोल अमूर्त मनात त्यांचा उगम असतो. पण कुठेतरी दंतकथांमधून, परीकथा, मायथॉलॉजीमधून आपण हे पदर स्पर्शू शकतो. कारण कथा सांगणं जरी मूर्त क्रिया असली तरी ती सुप्त मनाशीदेखील कुठेतरी निगडीत असते. पुस्तक अतिशय उत्कट आहे. मला ज्या २ कथा आवडल्या, अर्थ कळला त्या इथे देत आहे.
.
एक कथा येते - अध्यात्म आणि नि:संगता नावाच्या प्रकरणामध्ये-
अनुरक्तता, ओढ आणि आकर्षण या झाल्या नाते जुळणी च्या पायर्‍या. या पायर्‍या चढत जाउनच, प्रेमिकांचे नाते निर्माण होते. परंतु हळूहळू नात्यात साचेबद्धपणा, तोचतोचपणा येतो, एकमेकांपासून दूर जाण्याची, स्वातंत्र्य उपभोगण्याची मनीषा निर्माण होते. एकमेकांचा कंटाळ येतो असे नाही पण स्वातंत्र्याकडे मन ओढा घेउ लागते. हे जे मनाचे मूड्स आहेत, मनाचा ओढा आहे, त्याबद्दल थॉमस मूर काय म्हणतत , एक बुध्दीमान लेखक याबद्दल काय म्हणतो हे पहाणे रोचक ठरते. मूर म्हणतात, मनाला प्राथमिक रीत्या जोड, लळा, attachment हवी असते. परंतु एक भाग असाही असतो ज्याला अतिबद्धतेपासून सुटका हवी असते. मग हे कसे? तर ते ग्रीक पुराणातील एक अतीव सुंदर कहाणी सांगतात.
.

.
डायाना म्हणजेच आर्टेमिस ही एक कुमारी देवता आहे. ही उंच आहे. समाजापासून फटकून वागणारी, एकांतातील , जंगलातील जीवन पसंत करणारी अशी माणूसघाणीही आहे. मूर यांच्या मते, या देवतेची उंची म्हणजे आत्मोन्नत्तीचे प्रतिक आहे. आत्मिक उन्नतीची ओढ ही तिची उंची दर्शविते. तिला एक मुलगी आहे - तिची मुलगी डॅफनी ही सुद्धा आईसारखीच, सुंदर स्त्री आहे. पण ही अधिक स्वच्छंद, मुक्त आहे, मनस्वी आहे. तिला रानोमाळ भटकायला, निसर्गाच्या सान्निध्यात काळ व्यतीत करायला आवडतो. हे जे डॅफनीचे अनाघ्रात आणि नात्यापासून दुराव्याचे गुणविशेष आहेत हे म्हणजे व्यक्तीचे आत्मिक रूप. मायापाशाच्या जंजाळा पासून मुक्त अशी जिजीविषा, स्वतंत्रतेचे आकर्षण. अपोलो हा महापराक्रमी देव आहे. खरं तर तो डायानाचा भाऊ म्हणजे डॅफनिचा चा मामा आहे. याच्याकडे काय नाही? सगळेच आहे. तो पंडीत आहे, त्याने संगीताचा शोध लावलेला आहे, तो वैद्यकशास्त्र जाणतो. अर्थात भौतिक जगाचे "पांडित्य -कला-ज्ञान" यांचा तो परिपाक आहे. एकदा काय होते, त्याचे मन डॅफनीवरती वरती येते आ णि तो अनुरक्त होउन तिचा पाठलाग करू लागतो. पण ती मात्र दूर पळते. अपोलो मूर्तीमंत भौतिक कर्तुत्व , महत्त्वाकांक्षा आहे तर डॅफनी मूर्तीमंत आत्मिक समाधान , शांती आहे. ग्रीक पुराणातील या कथेचा अर्थ अनेक लेखक, विद्वानांनी या दोन वृत्तींमधील द्वंद्व असा लावला आहे. कथेला अनेक पदर असतात. तिचा अर्थ अनेक प्रकारे लावता येऊ शकतो - कोणत्याही रोमॅन्टिक नात्यामध्ये स्वातंत्र्य आणि प्रेम यांच्यात द्वंद्वच असते, रस्सीखेच असते त्याचे ही गोष्ट प्रतीक आहे, असा अर्थ मूर लावतात. The story speaks of many dimensions of life.One way to look at it is to see Daphne as the virgin soul fleeing from the spirit of cultural, Appolonic achievements of intellect, art & even healing.
मन हे गूढ असते, त्याच्या मागण्या अजब असतात. कधीकधी तर मनाला स्वातंत्र्य इतके हवेसे वाटते की मन healing ही नाकारते. उदा - एक मित्र आहे जो आपल्या भल्याचाच सल्ला देतो, आपण न सांगताही त्याला सारे कळते. पण हे कळणेच, आपल्याला जाचक वाटते. मला तुझा सल्ला नको असे आपण सांगतो. कारण आपल्याला बद्धता नको असते, स्वातंत्र्य हवे असते. डॅफनी जितकी दूर पळते तितकी ती अपोलोला ती आकर्षक, हवीशी भासते कारण ती अप्राप्य आहे. अपोलो तिचा पाठलाग करतो. शेवटी पळता पळता, डॅफनी थकून जाते व त्याच्या कक्षेत येते. आणि तिला कळते की अपोलो तिला कह्यात घेणार आहे, तेव्हा ती तिच्या वडीलांचा जे की नद्यांचा देव आहेत- लॅडॉन यांचा धावा करते. तिचा धावा ऐकून, लॅडॉन तिचे रुपांतर वृक्षात करतात. कथेचा अतिशय सुंदर भाग आता येतो तो म्हणजे, अपोलोला, डॅफनी वृक्षाच्या रूपातही आवडते. - Norman O Brown points out, an illusion to sublimation in the Freudian sense : changing of sexual impulse into artistic. Our desires for literal experience like lust may be fulfilled unexpectedly at a more refined level.
थॉमस मूर म्हणतात प्रत्येक जोडप्याची ही जी साहचर्य मिळवण्याची तडजोड असते ही खोल प्रतालावरती, एकमेकांबरोबर मिळणार्या भौतिक सुखे जसे - महत्त्वाकांक्षा, स्वप्नपूर्ती यांची Upward flight Or Yearning, आणि एकांतात स्वतःबरोबर मिळणार्‍या आत्मिक शांती, समाधान (Downward need ) यांतील द्वंद्व असते. Our resistance to attachment might come from the place in us that wants our lives to be clear & ordered, morally clean, unfettered, essentially virgin हा विचार अतिशय विचारआणि काव्यमय आहे. मूर म्हणतात डॅफनी जरी वृक्ष झाली तरी त्या वृक्षाच्या फांद्या या स्वर्गाकडे झेपावणार्‍या, प्रार्थानेकरता हात उंचावलेल्याच राहिल्या आणि अपोलोला ते स्वीकारावे लागले. ते स्वीकारुनसुद्धा तो तिच्यावर प्रेम करतच राहिला. अर्थात हे प्रत्येक व्यक्तीतील, मानवी स्वभावातील द्वंद्व किंवा विरोधाभास आहे. हा विरोधाभास स्वीकारुनच एक एकीकृत आयुष्य जगता येते. ना आत्मिक ना भौतिक ना लळा ना दुरावा कोणत्याच एका गुणविशेषाला महत्त्व देता येत नाही, तसे दिले तर असंतुलन होते.
________________________________
याच पुस्तकातील "जंतरमंतर आणि विवाह नामक परीस स्पर्श" हे अजून प्रकरण. हे प्रकरण अर्थातच "विवाह" या विषयाला वाहिलेले आहे.
.

.
आपण पहातो अनेकानेक विवाह इतके दु:खदायक, वेदनामय आणि अपयशी ठरतात की मंतरलेल्या, काव्यमय दृष्टीने त्यांच्याकडे बघताच येत नाही. विवाहात काही जादू असेल हे मनाला पटतच नाही. काव्य शोधून विवाहाचे गौरवीकरण करणे निव्वळ अशक्य होउन बसते. आणि मग रुक्ष , तर्कशुद्ध शास्त्रीय प्रेरणांमधुन लग्न या विषयाचा शोध घेण्याऐवजी, सलेल देण्याऐवजी, लेखक एका लोककथेमधुन आपला अद्भुत प्रवास घडवून आणतो. ही लोककथा आहे न्यू मेक्सिकोमधील कोचिटी लोकांमध्ये प्रचलित असलेली. लोककथा. दंतकथा या थेट संवाद साधत नाहीत, सल्ले देत नाहीत तर त्यांच्यातील प्रतिकात्मक अर्थ मानसिक पातळीवरून जाणून घ्यावा लागतो.
एक गरीब घरात जन्माला आलेली मुलगी असते. ती नेहमी चरख्यावरती सूत विणत असे. ती सुंदर कपडे विणण्यात इतकी निष्णात असते की पंचक्रोशी मध्ये तिचे नाव होते. गावातील अनेक उपवर तरुण तिला मागणी घालतात. पण ती फक्त तन्मयतेने आपले विणकाम करत रहाते. अनेक तरुण तिला परोपरीने विनवतात की मी तुझ्या पायाशी अमके आणून टाकेन, तमक्याची रास रचेन पण ती काही चरख्यावरुन आपली नजर हलवत नाही. लेखक म्हणतो ही जी विणकाम कला आहे ते प्रतिक आहे प्रत्येक व्यक्तीमधील एकमेव कौशल्याचे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी एकमेव, अतुलनीय असे कौशल्य, कला, गुण असतो. तो अगदी फार भव्यदिव्यच पाहिजे असे नाही तर लहानसेही असू शकतो. विवाह होण्यापूर्वी या स्वत:च्या वेगळेपणाचे आत्मभान जाणीवेच्या पातळीवर झालेले असणे आवश्यक असते. आता विणकाम हेच प्रतिक का तर - A person too is woven from many influences, many fateful events and many raw thematic materials. विवाह हा फक्त त्या दोन व्यक्तीन पुरता मर्यादित नसून, तर ती एक सामाजिक विण असते. दोन कुटुंबाची , शेजार्‍यांची, संपूर्ण समाजाची विण असे तिला म्हणता येईल. लेखकाचे हे सर्व बोलणे मला तरी आत्तापर्यंत एक मस्त लावलेले निरर्थक पाल्हाळ (spinning yarn )वाटत होते पण खरा जादूचा भाग आणि तितकाच मंतरलेला अर्थ आता येतो आहे.
कोयोटे हा प्राणी नेटिव्ह अमेरिकन लोककथांमध्ये नेहमी असतो. याचे वैशिष्ट्य हे की तो खोडकर आणि बुद्धीमान आहे. तर कोयोटेच्या नजरेस ही मुलगी पडते व त्याचे मन तिच्यावर अनुरक्त होते. कोयोटे म्हणतो मी हिला माझी बायको नाही केली तर नावाचा कोयोटे नाही. तो रानात जाउन मूठभर काळ्या मनुका गोळा करतो. अंगावर मनुष्याचा वेश परिधान करतो. पण पाय तर उघडेच म्हणून ४ वेळा जमिनीवर पायाचा आघात करून, जादूने हरणाच्या कातड्याचे बूट निर्माण करतो. व मनाशीच म्हणतो "हां आता कसा मी देखणा, राजबिंडा दिसतो आहे." आता याचा प्रतिकात्मक अर्थ पहायला गेले तर विवाह ही जरी अतिशय mundane , व्यावहारिक, रुक्ष पातळीवरची गोष्ट असली तरी कोयोटे हा जादूगार दाखविला आहे.कोणत्याही सामीप्यात, मिलनात एक जादूचे अंग आवश्यकच असते. Genuine marriage takes place in the realm that is not identical with outward life: our soul partner is always of another species - an angel, animal or phantom . हा कोयोटे गावात मध्यभागी जातो व डाव्या हातात मूठभर मनुका धरून नृत्य करतो जे पाहून ती मुलगी मंत्रमुग्ध होते व त्याच्याकडे मनुकांची मागणी करते. कोयोटे म्हणतो मी तुला मनुका जरुर देइन, पण त्या बदल्यात तू माझ्याशी लग्न केले पाहीजेस. ती, जी कोणाकडूनही काहीही घेत नाही की आपली नजर चरख्यावरुन हटवत नाही ती, गंमत म्हणजे या मागणीस रुकार देते. कोयोटे आनंदाने तिला मनुका देतो व तिच्याबरोबर तिच्या घरी जातो. पुढे कालांतराने तिला बाळे होतात. अनेक तरुणे हे त्या मुलीच्या पायाशी धन-दौलत-कातडी-शिंगे अशा नानाविध भौतिक वस्तूंची रास ओतण्यास तयार असतात पण तिला मोह पडतो क्षुल्लकशा मनुकांचा? असे का बरे - तर लेखक म्हणतो - ती मुलगी म्हणजे आपण प्रत्येक जण आहोत. आपण विवाहात, स्त्री-पुरुष मिलनात बीजाकडे म्हणजे पोटेन्शिअल, संधीकडे आकृष्ट होतो. मौल्यवान पण निर्जीव वास्तविक गोष्टींकडे नाही - what is dark, sweet & in the seed form rather than fully matured. We are drawn into intimacies by possibilities rather than by realities. पुढे एकदा कोयोटे तिला व त्यांच्या बाळांना घेउन रानातील एका ढोलीपाशी जातो व तिला आत येण्यास सांगतो . मुलगी म्हणते आपण एवढे सारेजण या इवल्याशा ढोलीत कसे मावणार? तो सांगतो "मावू" व बाळांना घेउन आत शिरतो. मुलगी आत डोकावून पहाते. तिला ते घर अतिशय आवडते. ती आत जाते व सारेजण सुखाने रहातात. शेवटचे प्रतिक आहे झाडाची ढोल. तर कोयोटे त्या मुलीला त्याच्या बायकोला आपल्या गर्भ गृहात, मनात, अंतरंगात प्रवेश देतो. तिला तिचे "घर" देतो.
.
जेव्हा वाचले तेव्हा, या कथांनी मला एका वेगळ्या भावविश्वाची, जादूच्या जगाची सफर घडवून आणली. त्यावेळी मला त्या पटल्या जणु काही मला जी उत्तरे हवी होती ती उत्तरे देण्याकरता त्या कथा माझ्याकडे झेपावल्या, इतक्या मला त्या भिडल्या. आता परत जर तेच पुस्तक वाचलं तर अजुन काही वेगळे गवसेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users