मी श्वास घेत आहे

Submitted by द्वैत on 4 October, 2019 - 13:31

मी श्वास घेत आहे

प्रत्येक पावलावर
हा भास होत आहे
कैफात वेदनेच्या
मी श्वास घेत आहे

ही वेदना दुःखाची
की वेदना सुखाची
जो दोर सापडावा
तो फास होत आहे

येता मुठीत म्हणता
निसटून जात आहे
मोहात सावल्यांच्या
वनवास होत आहे

ही न्यूनता कशाची
घेऊन दूर जाते
हा कोणत्या दिशेने
प्रवास होत आहे ?

पाहून रोषणाई
इतुकेच वाटते की
बहुतेक संभ्रमांची
आरास होत आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम!

ही न्यूनता कशाची
घेऊन दूर जाते
हा कोणत्या दिशेने
प्रवास होत आहे ?>>>>>> समदु:खी वाटावे अशी आहे ही द्विपदी!

प्रत्येक पावलावर
हा भास होत आहे
कैफात वेदनेच्या
मी श्वास घेत आहे

ही वेदना दुःखाची
की वेदना सुखाची
जो दोर सापडावा
तो फास होत आहे>>>>>>>>मस्तच! खूपच छान!

शेवटची ही एकदम छान !! Happy

ही वेदना दुःखाची
की वेदना सुखाची
जो दोर सापडावा
तो फास होत आहे>>हे कडवं खुप आवडलं..आणि पटलंसुद्धा..

पुकाप्र! Happy