एक दुपार तळ्याकाठची...

Submitted by हरिहर. on 4 October, 2019 - 07:59

आज दुपारी जेवायला जरा उशीरच झाला होता. घरी जाताना बायकोने विचारले “तुझी चुलबुली कशी आहे? झाली का तिला पिल्ले? किती झाली?” आणि माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. अरेच्चा खरच की टिबुकलीला पिल्ले झाली असतील नक्की. किती झालीत, कशी आहेत काहीच मला माहित नव्हते. मी दहा बारा दिवस तळ्यावर फिरकलोच नव्हतो कामांमुळे. मी चौकातून घराकडे गाडी वळवायच्या ऐवजी सरळ तळ्याकडे घेतली. ढग दाटून आले होते. त्यामुळे फोटो मिळणार नव्हतेच. पण माझी टिबूकली कशी आहे ते पहाण्याची उत्सुकता काही मला गप्प बसु देईना. मागच्या वेळी तळ्यावर गेलो होतो तेंव्हा कुकारीला (पानकोंबडी) नुकतीच पिल्ले झाली होती. प्लवा बदकालाही तेरा पिल्ले झाली होती. त्यांचीही चौकशी मी केली नव्हती. चाके अगदी पाण्यात भिजतील इतकी तळ्याजवळ मी गाडी उभी केली. कसाबसा हँडब्रेक खेचला आणि बाहेर पडलो. खरेतर तळ्याच्या इतक्या जवळ मी कधीच गाडी नेत नाही. तसेच फारशी हालचाल न करता मी तेथे वावरतो पण आज काही मला चैन पडत नव्हती. माझ्या नेहमीच्या प्रशस्त दगडावर मी मांडी घातली आणि अगदी बारकाईने तळ्याच्या या टोकापासुन ते नजरेआड होत गेलेल्या पाण्याच्या टोकापर्यंत सावकाश नजर फिरवली. सर्वात प्रथम ठरावीक गजावर बसलेली तारवाली भिंगरी दिसली. या भिंगरीला इंग्रजीत लकी स्वॅलो म्हणतात. हिचे दर्शन झाले की नक्की काहीतरी चांगले होते म्हणतात. भिंगरी पाहून बरे वाटले. तिच्या शेजारीच असलेल्या चांदव्याच्या घरट्यावर नजर टाकली तर चांदवा अगदी आरामात घरट्यात बसलेला दिसला. पलिकडे कोकारीचा भाग आहे. तेथे खुप बारकाईने पाहूनही कोकारी आणि तिची पिल्ले दिसली नाही. बहुतेक तळ्याच्या दुसऱ्या भागात असावीत. कोकारीच्या जागेपासून दक्षीणेला एक मोठा दगड आहे पाण्यात. त्यावर पानकावळा बसलेला असतो. सवयीने दगडाकडे नजर वळवली तर आज त्या दगडाच्या शेजारी असलेल्या कॉलमवर पानकावळ्याच्या जोडीला दुसरा एक पानकावळा होता. दोघेही काहीतरी हितगुज करत असल्यासारखे मानेवर मान घासत होते. माझ्या या मित्राला शेवटी मैत्रीन मिळाली म्हणायची. माझी नजर प्लवाची पिल्ले आणि टिबूकली यांना शोधत होती. मी जेथे गाडी उभी केली होती त्याच्याच डाव्या बाजुला, तळ्याच्या काठी जरा दलदल होती. मी टिबुकलीला नेहमी तेथेच फिरताना पाहीले होते. पण आज ती दिसत नव्हती. बरे तिला मी नेहमी एकटीच पाण्यात बुड्या मारताना पाहीले होते. तिचा कोणी मित्र माझ्या पहाण्यात नव्हता. त्यामुळे बिचारी ब्रम्हचारी असेल आणि नसतील तिला पिल्ले झाली असा काहीसा विचार मी करतोय तोवर बायकोने माझी हनुवटी धरुन एका बाजूला माझा चेहरा वळवला आणि हाताने एक विशिष्ट ठिकाण दाखवले. बायकोने ज्या पध्दतिने माझे लक्ष तिकडे वेधले होते त्यावरुन नक्की काहीतरी नविन पक्षी वगैरे असणार हे माझ्या लक्षात आले. मग काही प्रश्न न विचारता मी तिकडे अगदी बारकाईने पाहीले. तेथल्या हिरवी छटा असलेल्या पाण्यात एक पक्षी मस्त खेळत होता. मधेच पाण्यात बुडी घेतल्यासारखे करुन लगेच पाण्यावर येत होता. उगाच कधी डावीकडे तर कधी उजवीकडे वळून पुन्हा मुळ जागेवर येत होता. मी प्रथमच त्याला पहात होतो. आजवर हा पक्षी आपल्या पहाण्यात कसा नाही आला किंवा नेटवरही कसा नाही दिसला याचे मला आश्चर्य तर वाटलेच पण हे आपलं नविन फाईंडींग आहे असं वाटून मी एकदम खुश झालो. ढग आता नुसते दाटलेच नव्हते तर अक्षरशः ओथंबून खालपर्यंत आले होते. केंव्हाही पावसाची झड बसेल असे वातावरण होते. मी तशातही ट्रायपॉडवर कॅमेरा लावला आणि पुन्हा माझ्या नविन फाईंडींगचे निरिक्षण सुरु केले. येतील तसे चार दोन फोटोही काढले. लाल गुलाबी चोच. डोक्यावर करड्या आणि पांढऱ्या पिसांची सुरेख नक्षी आणि पोहण्यातली चंचलता हे पाहून भारी वाटत होते. तो उगाचच पाणी उडवत, शेवाळ विस्कटत खेळत होता. इतक्यात दुसरा पक्षी अतिशय वेगाने आणि छाती वर खाली करत पोहत आला आणि त्याच्या भोवती पिंगा घालत पोहायला लागला. मला वाटले नुसते नविन फाईंडींगच नाही तर आपण नर मादी शोधले आहेत नवीन पक्षाचे. तोवर माझ्या डोक्यातून टिबूकली गेली होती. प्लवा बदके, कोकारी आणि त्यांची पिल्ले हे सगळे गेले होते. थोरला धोबीची जोडी दिसली नव्हती आल्यापासुन पण त्याचीही नोंद मी घेतली नव्हती. आलो होतो या सगळ्या मित्रांना भेटायला पण आता सगळ्यांना विसरुन या नविन पक्ष्यांच्या जोडीत मी रमलो होतो. हे पक्षीनिरिक्षणाचे वेड असेच आहे. मनात जरा खट्टूही झालो होतो कारण भर दुपारी अंधारुन आले होते. सुर्यप्रकाश असता तर किती सुरेख फोटो मिळाले असते या नविन पाखरांचे. अगदी समोरच ते खेळत असल्याने मला कॅमेरा किंवा बायनॅक्युलची गरज वाटत नव्हती. अगदी समोरच ते दोघेही मनसोक्त पाण्यात खेळत होते. मी त्या दोघांकडे पहात होतो इतक्यात दोघांच्या मधे एकदम एक डोके वर आले. प्रथम पिवळा डोळा नजरेत भरला आणि मग नारंगी डाग. अरेच्या. ही तर टिबूकली होती. ती काय करतेय या दोघांच्या मधे असा विचार मी करतोय तोवर एक पक्षी तेथून दुर झाला आणि एक त्या टिबूकलीबरोबर खेळायला लागला. पाच दहा मिनिटात मला त्यांच्या खेळण्यावरुन अंदाज आला की ही दोन्ही टिबूकलीची पिल्ले होती. माझा आनंद दाटलेल्या आभाळातही मावेना. ती टिबूकली आणि तिची ती दोन गोजीरवाणी पिल्ले खुप आनंदात खेळत होती. त्यातले एक व्रात्यपणा करत दुर दुर पळत होते तर एक सारखे आईला खेटून पोहत होते. मधेच एक दोन वेळा ते दुर गेलेले पिल्लू कशाला तरी घाबरले आणि इतक्या वेगाने आईकडे पळत आले की विचारु नका. काय गोड तारांबळ होती त्याची. माझ्या कानाच्या पाळीला कसला तरी थंडगार स्पर्श झाला. पावसाचा टपोरा थेंब होता. एकून निसर्गाचा रागरंग ओळखून शेवटी मी उठलो. फोटोतर तसेही मिळाले नव्हतेच, मिळणारही नव्हते पण माझी टिबूकली आणि तिची दोन गोजीरवाणी पिल्ले पाहून मला फार छान वाटले होते. फोटो न मिळाल्याचे अजिबात वाईट वाटत नव्हते. रुखरुख एकच होती की कोकारी आणि तिची पिल्ले दिसायला हवी होती. प्लवाची पिल्लेही दिसली नव्हती. धोबीची जोडीही आज इकडे फिरकली नव्हती. मी ट्रायपॉड गाडीत टाकला. तुम्ही फोटोग्राफीचा स्पॉट जोवर सोडत नाही तोवर कॅमेरा बंद करु नये असा एक नियम आहे फोटोग्राफीचा. पण आज फोटोच काढता येत नसल्याने मी कॅमेराही बॅगेत भरला आणि निघणार इतक्यात बायको म्हणाली “अरे ते बघ तुझे हळदी कुंकू” आणि खरेच की. अगदी एका रांगेत, शिस्तित चालावे तसे प्लवा बदकांची पिल्ले एकदम गतीने, पाण्यावर तरंगही न उठवता काय सुरेख पोहत आली म्हणता. मी शेवटची पाहीली तेंव्हा नुसते लोकरीचे गुंडे होते. दहा बारा दिवसातच त्यांना चांगले रंग रुप आले होते. ही हळदी कुंकू बदके आहेत हे स्पष्ट समजावे इतकी त्यांची पिसे, रंग स्पष्ट झाले होते. प्रत्येकाच्या चोचीवरचे हळदी कुंकवाचे ठिपके अगदी ठळक झाले होते. मी त्यांचे बारकाईने निरिक्षण करणार तोच पावसाची पहिली झड जोरात गालावर वाजली. तळ्याचा डावीकडचा भाग एकदम धुक्यात हरवावा तसा ब्लर झाला. समोर टिबुकलीच्या आणि तिच्या पिल्लांच्या आजुबाजूला काळ्या हिरवट पाण्यावर थेंबांची तडतडीत, वलयांकीत नक्षी उमटायला लागली आणि मी निमूटपणे गाडीत बसलो. गाडी वळवताना एकदा टिबूकलीकडे पाहीले आणि तोंडातुन आपोआप अगदी मनापासुन उच्चारलेला आशिर्वाद बाहेर पडला “बाई नेहमी आनंदी रहा, तुझी पिल्ले बाळे सदैव सुखाने नांदूदे”

ही आहे माझे टिबूकली

पिल्लासोबत (उद्या क्लिअर फोटो काढेन. तिला पाहिल्याशिवाय चैन पडणारच नाही मला तशीही)

हे स्वतंत्रपणे तळे डिस्कव्हर करत होते. एकदम गोड.

.
DCE8C141-F852-4EB6-B571-68BD774A40F2.jpeg

टिबूकली (Little Grebe)
पानकावळा (Little Cormorant)
चांदवा (Eurasian Coot)
भिंगरी (Wire tailed Swallow)
हळदी कुंकू बदक (Spot-billed Duck)
धोबी, थोरला परिट (white-browed wagtail)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा ! काय गोग्गोड वर्णन आहे, अधाशीपणाने वाचले. माझा वाचनाचा वेग अफाट आहे बरं का ! Proud

शाली, फोटो पण टाकायचे ना त्यांचे. Happy

मस्तच. इंग्रजी नावे देता ते खूप आवडते शाली. त्यामुळे पक्षी गुगल करता येतात. फार सुरेख वर्णन.
ते हळदकुंकू बदक तर खरच नावाप्रमणेच आहे. चोचीवरती ठिपके आहेत की. परीट केवढा गोंडस आहे आणि टिबुकलीही.

थॅंक्यू रश्मी. फोटो टाकतो सकाळी. प्रयत्न केला पण ईरर येतो आहे.

सामो, देवकी धन्यवाद प्रतिसादासाठी.

जोरदार अभ्यास चाललाय....
सुक्ष्म अवलोकन, फोटो आणि माहिती संकलन
सारं भन्नाट ...