तुला भेटायचे राहून गेले

Submitted by द्वैत on 2 October, 2019 - 04:43

नको ते व्हायचे होऊन गेले
तुला भेटायचे राहून गेले

जरासा भार झाला पापणीला
जरासे दुःख ही वाहून गेले

दिलासे वाटले होते कधी जे
मला माझे परत देऊन गेले

कुणी झंकारली वीणा पहाटे
कुणी स्वप्नात का येऊन गेले?

किती ह्या काळजाचे चोर सज्जन
जिथे होते तिथे ठेवून गेले

समुद्राला कुठे ठाऊक असते
किनारे कोणते सोडून गेले

जगाला काय सांगू हीच चिंता
कधी जर शृंखला तोडून गेले

कशाला भांडतो आहेस "द्वैता"
तुझा आवाज ते घेऊन गेले

Group content visibility: 
Public - accessible to all site users