ग्रंथ साहीब - ३ लेख

Submitted by सामो on 1 October, 2019 - 07:38

नोकरीनिमित्ताने, टेक्सासच्या सॅन अँटॉनिओ या शहरात माझे जवळ्जवळ ३-३.५ वर्षे वास्तव्य होते. वाणी व दिपीका या माझ्या दक्षिण भारतिय रुममेटस होत्या. आम्ही एकत्र प्रचंड मजा करायचो ज्याची रेंज - रिव्हरवॉकवर भटकणे ते आर्ट्फुल वस्तू एकत्र बनविणे, स्वयंपाक करणे इतकी होती. तीळगुळाच्या वड्या मी त्यांना बनवायला शिकविल्या (स्माईल). त्यांच्याकडून बिर्याणी बनवायला शिकले. शॉपिंग व भटकणे हे मजा तर आम्ही सर्रास करत असू. एक मात्र होतं, तीघींना देवळात जाण्याची इच्छा होइ अन जाता येत नसे कारण ३५/४५ मैलांवर हिंदू टेंपल होते.
एके दिवशी गुगलवर शोधताना आम्हाला गुरुद्वारा सापडले अन तेही फक्त २.५/३ मैलांवर. म्हणजे टॅकसीने जेमतेम $८, अन वेळ ७ मिनिटे. एका शनिवारी आम्ही ११ वाजता जायची उस्फूर्त तयारी केली. तीघींना हे माहीत होते की गुरुद्वारात स्त्री-पुरुष सर्वांना डोके (माथा) झाकावे लागते. टॅक्सी एका अतिशय शांत व लोकवस्तीपासून दूर ठीकाणी थांबली अन तिथे एक कळेल न कळेलशी पाटी होती, तिच्या बाणाच्या रोखाने आम्ही एका प्रसन्न अंगणात प्रवेश केला. खूप फुलझाडे, टेक्सासच्या इतक्या उन्हाळ्यात तेथे जगविली होती. एकदम गारेगार वाटलं. एका बाबाजींनी आत जाण्यास हात केला व आम्ही एका व्हरांड्यात आलो जेथे स्त्री व पुरुषांच्या चपला वेगवेगळ्या खणात ठेवलेल्या आढळल्या. आतून माइकवर अतिशय गंभीर अन सूरात प्रार्थना ऐकू येत होती. आम्ही आत गेलो व जाजमावर स्त्रियांच्या बाजूस बसलो. अनेक स्त्रियांनी स्मितहास्याने आमचे स्वागत केले. खूप छान वाटलं ती प्रार्थना ऐकताना. मी तल्लीन झाले होते.
.
यापूर्वी व्हरमॉन्टमध्ये गुरमीत म्हणून माझी उत्तर प्रदेशिय रुममेट होती ती दररोज (अज्जिबात खंड नाही) संध्याकाळी सुखमणी साहीब ऐकत असे. अन तो अतिशय आवडून मी तिच्याकडून सर्व ग्रंथांची नावे घेतलेली होती. अन मीदेखील जपजी साहीब, सुखमणी साहीब, आनंद साहीब, चौपाई, अस दी वार आदि कीर्तने (https://www.youtube.com/watch?v=wCRNHDyUmOs) ऐकू लागले होते. पैकी आनंदसाहीब व जपजी साहीब अननुभूत कोमल व आनंददाई असल्याचे लक्षात आले होते तर रेहरास (गोविंदसिंग निर्मित) यात वीररस असल्याचे लक्षात आले होते. जपजी साहीब पहाटे ऐकतात असा नियम आहे तर रेहरास संध्याकाळी वाचतात. मी केव्हाही , काहीही लावत असल्याने गुरमीतने एकदा दटावल्याचे आठवते. तिचे म्हणणे होते की ऐकते आहेस तर त्या ऐकण्याचेह नियमदेखील पाळ.मी गुरु ग्रंथसाहीब (http://www.srigranth.org/servlet/gurbani.gurbani?S=y) चा अर्थ वाचत असे व खूप आवडे, प्र-चं-ड शांती मिळे. किंबहुना एक हालचाल .. विचित्र मिरमिरी संवेदना मला टाळूपाशी जाणवत असे. हे मनाचे खेळ असतील तर असोत पण अन्य आपल्या देवी-देवतांच्या कीर्तन, पठनाने हा अनुभव कधी आलेला नाही.
नौ दुआरे परगट कीए दसवा गुपत रखाइआ॥"
.
तर सांगायचा मुद्दा हा की शीख धर्माचे स्क्रिप्चर ऐकण्याकरता पुरेशी प्रि-ग्रुम्ड होते. अन टेक्सासमध्ये मला त्याचा फायदाही झाला. या गुरुद्वाराला पहील्यांदा भेट देण्याच्या आदल्या रात्री मला निळ्या तळ्याचे , स्वच्छ पाण्याचे स्वप्न पडले होते अन हा संकेत मला महत्त्वाचा वाटतो. पुढेपुढे सकाळी शनिवारी ५:३० वाजता एकटी गुरुद्वारात जाऊ लागले.६:०० वाजता प्रार्थना सुरु होत ते थेट लंगर उरकल्यानंतरच कार्यक्रम संपे.
.
गुरुद्वाराचा अंतर्भाग इतका शांत अन सुंदर होता. काश्मीरी गालिचे, उंची झुंबरे, चवर्‍यांनी वारा ढाळणारे वृद्ध बाबाजी अन गंभीर मंद आवाजातील वाचन. माझ्या मनावर लगेच परीणाम होत असे. कधीतरी परत या गुरुद्वारास भेट द्यायची आहे. परत एकदा मनःशांती अनुभवायला तर खरच पण देणगीही द्यायची आहे. अन ही जी इच्छा अपूर्ण आहे ती अपूर्ण असण्यातच आमची पुनरेकवार भेट दडलेली आहे. या स्थळाचे व माझे ऋणानुबंध कधीतरी मला परत तिकडे घेऊन जातील, याची १००% खात्री आहे.
_________________________________________________________________
हा धागा अभ्यासपूर्ण नाही, त्यामुळे या धाग्यावरती बौद्धिक चर्चाही अपेक्षित नाही. हा अनुभव आहे.

२ अनुभव-
गुरुचरित्र स्त्रियांनी वाचु नये असे म्हणतात. आतापर्यंत मी २ दा वाचायचा प्रयत्न करुन नाद सोडुन दिला याचे कारण रात्री अनामिक भीती वाटु लागली. का ते काही कळेना. पण भीती वाटे. ग्रंथवाचन सोडले, मात्र भीती नाहीशी झाली. यामागे वैद्न्यानिक कारण असेलच तर या २ प्रसंगातच भीती का वाटली, नंतर कधी का वाटली नाही याचे कारण सापडत नाही.

अनुभव २ रा - शीख समाजाचा "ग्रंथ साहीब" हा ग्रंथ त्यांचा गुरु मानला जातो. अर्थात फक्त ग्रंथ नसुन त्यात गुरु तत्व असल्याची त्यांची श्रद्धा आहे. शीख समाजाचे १० गुरु - गुरुनानक देव जी, गुरु अंगद देव जी, गुरु अमरदास साहीब जी वगैरे. प्रत्येक गुरु अंतकाळी पुढील गुरु निवडत असे. १० वे गुरु-गुरु गोविंदसिंग जी यांनि मात्र पुढील गुरु "श्रीग्रंथसाहिब" निवडला.

या ग्रंथाची गोडी माझ्या एका शीख मैत्रिणी मुळे लागली. जप जी साहिब सकाळी, रेहरास रात्री म्हटले जाते. सुखमणी व आनंदसाहिबदेखिल अत्यंत मधुर आणि प्रासादिक प्रार्थना आहेत असे मानले जाते. मी त्या काळात रात्रंदिवस हया प्रार्थना ऐकत असे. एकदा रात्री अशाच प्रार्थना ऐकत असतेवेळी झोप लागली. प्रार्थना चालूच होत्या, आणि मध्यरात्री अनामिक भीती म्हणजे खूप वाटून जाग आली. मी लॅपटॉप बंद केला पण यत्यानंतर कधीही ग्रंथसाहिब चालू असतेवेळी झोपले नाही.

http://www.srigranth.org/servlet/gurbani.gurbani?S=y

येथे या ग्रंथाचे भाषांतर सापडेल. नानक यांनी कधीच म्हटले नाही की तुम्ही शिख व्हा त्यांनी हेच सांगीतले की मुसलमानाने चांगला मुसलमान होण्याचा प्रयत्न करावा व हिंदुने उत्तम हिंदु होण्याचा. मात्र गुरु नानक यांनी monotheism म्हणजे एक ईश्वर या संकल्पनेचा प्रसार केला. त्यांनी हीच शिकवण दिली की उच्च-नीच असे काही नाही, जातपात नको, सर्वजण समान आहेत. गुरुनानक यांचा जन्म तलवंडी गावामध्ये कालू मेहता व माता तृप्ता यांच्या पोटि झाला. त्यांचा वर्ण क्षत्रिय होता. जानवे घालायची वेळ आली तेव्हा नानक यांनी नकार दिला. त्यांच्या मुखातुन सहजुस्फुर्त शब्द निघाले- अरे पंडित, करुणेचा कापुस, समाधान हा धागा, वैराग्य गहीच गाठ असलेले, आणि सत्याचा पीळ घातलेले जानवे तुझ्याकडे असेल तर ते मला दे. कारण ते जानवे कधीही मळणार नाही की ते आगीत जळणार नाही, त्याचा ऱ्हास होणार नाही की जे हरवणार नाही आणि असे जानवे घातलेले जीव हे अत्यंत सुदैवी असतील.
असो.
नानक यांनी लंगर अर्थात एकत्र भोजनाची प्रथा सुरु केली. सर्व जातीचे, सर्व पंथांचे, गरीब-श्रीमंत सर्व लोक एकाच पंगतीला बसावेत हा हेतू. शीख लोकांचे सुवर्णमंदीर आहे तेथे सर्वांचे स्वागत आहे किंबहुना या मंदीराचे दरवाजे चारी बाजुंना खुले आहेत व हेच दर्शवितात की कोणतीही दिशा उच्च नीच नाही, सर्व दिशा समान आहेत.
नानक यांनी लिहीलेल्या जपजी साहीबमध्ये एक ओळ वारंवार येत - "सबणा जिया का इक दाता सो मै विसर ना जाई" सर्व जीवांचा निर्माणकर्ता, त्यांचा दाता हा एकच आहे हे विसरु नका.
________________________________
संत आणि स्त्रीरुप

सर्वात आधी हे स्पष्ट करते की मी कोणत्याही धर्माचा , सखोल अभ्यास केलेला नाही. पण एक हौस्/छंद म्हणून शीख, ख्रिश्चन, हिंदू आदि धर्मांतील गोष्टी/श्लोक वाचल्या आहेत. बर्‍याच वेळा असे आढळले आहे की - संत हे स्वतःला स्त्री (वधू) मानून परमेश्वराची (पतीची) आराधना करतात. या संदर्भात एक असे विश्लेषण ऐकले होते की परमेश्वर हा धनभारीत (देणारा दाता) असून आपण नेहमीच ऋणभारीत (घेणारे/याचक) असतो अन तो दाता - याचक
संबंध या कथा दर्शवितात. पण मग नवराच दाता का व पत्नी हीच याचक का - ते अद्याप कोडे आहे.
चैतन्यमहाप्रभू देखील स्वतःला राधा समजत. त्यांनी स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात पाहीले अन त्यांना राधारुप दिसले वगैरे आख्यायिका प्रचलित आहेत.

शीख धर्मातही ही संकल्पना आढळते. -

सा धन छुटी मुठी झूठि विधणीआ मिरतकड़ा अंङनड़े बारे ॥

शरीर-रुपी वधू असत्यास भुलून तिच्या पती पासून विलग झाली आहे, विधवा झालेली आहे.

सुरति मुई मरु माईए महल रुंनी दर बारे ॥

असे वैधव्य आलेली वधू बंद दाराआडून आक्रोश करते आहे की "माई! मी अंधारात बुडले. पतीवियोगात, त्याच्या निधनानंतर माझ्या मनातील प्रकाशच नाहीसा झाला आहे."

रोवहु कंत महेलीहो सचे के गुण सारे ॥५॥

परमेश्वराच्या आत्मारुपी विधवांनो, आक्रोश करा आणी सदैव त्या एका परमेश्वराचे गुणगान करा.

जानी विछुंनड़े मेरा मरणु भइआ ध्रिगु जीवणु संसारे ॥

अशी ही विधवा आक्रोश करते आहे की "माझ्या प्रियकरापासूनचा वियोग हा मला मृत्युसमान आहे. माझे आयुष्यच शापीत आणि वाया गेलेले आहे.

तुसी रोवहु रोवण आईहो झूठि मुठी संसारे ॥

तेव्हा रडा, शोक करा, आक्रोश करा कारण हे जग मिथ्या आहे.

हउ मुठड़ी धंधै धावणीआ पिरि छोडिअड़ी विधणकारे ॥

पतीच्या वियोगानंतरही, मी पापीण आसक्तीने, भौतिक सुखामागे धावते, पतीप्रेमापासून वंचित, पतीची वंचना करते, पापे करते.

घरि घरि कंतु महेलीआ रूड़ै हेति पिआरे ॥

प्रत्येक घराघरामध्ये, परमेश्वररुपी पतीच्या वधू आहेत , ज्या आपल्या पतीचे डोळे भरुन दर्शन घेतात

मै पिरु सचु सालाहणा हउ रहसिअड़ी नामि भतारे ॥७॥

माझ्या पतीचे, परमेश्वराचे मी नामस्मरण करते अन त्याच्याशी संलग्न होते, मीलन पावते.

गुरि मिलिऐ वेसु पलटिआ सा धन सचु सीगारो ॥

गुरु मिळताच आत्मारुपी वधूचे कपडे सत्याने, चमकू लागतात, आकर्षक दिसू लागतात.

आवहु मिलहु सहेलीहो सिमरहु सिरजणहारो ॥

परमेश्वराच्या वधूंनो या ,आपण त्याची प्रार्थना करु यात.

बईअरि नामि सोहागणी सचु सवारणहारो ॥

नामस्मरण हा परमेश्वर पतीची प्रिया बनण्याचा राजमार्ग आहे.
___________________________

ख्रिश्चन धर्मात पुढील पॅरॅबल आढळते-

५ कुमारीका आणि तेल-दिवा
तेल्-दिवे घेऊन, १० कुमारीका पतीस भेटण्यास सज्ज झाल्या. त्यातील ५ होत्या मूर्ख, ५ होत्या शहाण्या. मूर्ख कुमारीकांनी जास्तीचे तेल घेतले नाही, शहाण्यांनी घेतले. नवरदेवाच्या आगमनास उशीर झाल्याने दाही जणी पेंगळून झोपी गेल्या. शेवटी जेव्हा नवरदेवाचे आगमन झाले तेव्हा प्रत्येकीने दिवा प्रज्ज्वलित केला अन फक्त शहाण्या ५ जणींचे दिवे पेटले. मूर्ख ५ जणी तेल शोधत परत फिरु लागल्या व त्यांना यायला उशीर झाला. दार ठोठावले असता नवरदेव म्हणाला "मी तुम्हाला ओळखत नाही." (Matthew 25:1-13). 268
तात्पर्य - तेव्हा सदैव सतर्क रहा, सजग रहा, मालक (नवरदेव) केव्हा येईल ते सांगता येत नाही.
__________________________

इतक्या विविध धर्मातील संतांना ही एकच कल्पना कशी सुचली असेल हे एक कोडेच आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय!
कडाह प्रसादसाठी गुरुद्वारात जायची इच्छा आहे.

जरूर एकदा तरी अनुभव घ्याच. शीख पंथात सेवेस खूप महत्व आहे.
>>>> पण अन्य आपल्या देवी-देवतांच्या कीर्तन, पठनाने हा अनुभव कधी आलेला नाही.>>>>>>. नाथपोथी वाचत वाचत आॅनलाइन ऐकते वेळी मात्र आलेला आहे

अजुन एक - गुरुद्वारात जायच्या आ दल्या दिवशी स्वप्नात स्वच्छ जलाशय आलेला. मला पाण्याची सांकेतिक स्वप्ने नेहमी पडतात.

शीख लोक हिंदूंना गुरुद्वारात, लंगरमध्ये कितीही वेलकम करीत असले. तरी धर्माची/पंथाची एक अदृष्य भिंत मध्ये आहेच हे मला जाणवत रहाते.

>>>>शीख लोक हिंदूंना गुरुद्वारात, लंगरमध्ये कितीही वेलकम करीत असले. तरी धर्माची/पंथाची एक अदृष्य भिंत मध्ये आहेच हे मला जाणवत रहाते>>>> १००%. काही लोकांना वाटतं की आपण फक्त लंगरकरता जातो तर काहीजण बडेजाव/ शेखी मिरवतात. एक जण तर मला म्हणालेला - ब्रह्मदेव स्वत:च्या मुलीवर आसक्त झालेला. असा तुमचा धर्म Sad (हे गुरुद्वारामध्ये नाही पण एका समारंभात सहज बोलता बोलता तो म्हणाला)

Sad त्यामुळे मी कोणत्याही तीर्थक्षेत्री मंदिरात जात नाही. हिंदू धर्म जसा सगळ्यांना समान मार्ग मानतो तसं इतर मानत नाही. शीख धर्म धर्मांतराचा आग्रह करत नाहीत हाच चांगुलपणा वाटतो.

अरेरे बिचा र्‍यांची पी एम सी बँक बुडली. त्यामुळे गुरु ग्रंथ साहिब ची ५५० जयंती सेलिब्रेशन होणार होती ते कमी प्रमाणा त होतील. गुरुद्वारांचे ५० कोटी रुपये अडकले आहेत.

मला एक ओंकार प्रारथना आवडते रंग दे बसंती वाली. एकेश्वर वादावर विश्वास नाही.

पूर्वीची गुरुद्वारे बघितलीत तर ती कायम हाइट वर बांधलेली, म्हणजे युद्ध काळात आधार म्हणून राहता येतील अशी किल्ल्यासारखी बांधलेली आहेत. आम्ही तरूण असताना खलिस्तान स्ट्रगल चालू होते व ब्लूस्टा र कारवाई पण झालेली. तेव्हा हे नक्की काय असेल असा विचार केला होता.

ह्या ग्रंथ पठणा बरोबरच धार्मिक संगीताची पण एक सॉलिड परंपरा पंजाबात मूळ धरून आहेत. उत्तम भजने म्हणणारे आवाजी कमवलेले कलाकार येतात.

\

>>>> ह्या ग्रंथ पठणा बरोबरच धार्मिक संगीताची पण एक सॉलिड परंपरा पंजाबात मूळ धरून आहेत. उत्तम भजने म्हणणारे आवाजी कमवलेले कलाकार येतात.>>> छान मुद्दा मांडलात अमा.
>>>>>>>> आम्ही तरूण असताना खलिस्तान स्ट्रगल चालू होते व ब्लूस्टा र कारवाई पण झालेली. तेव्हा हे नक्की काय असेल असा विचार केला होता.>>>>>>> सेम हियर

ऑपरेशन ब्लू स्टार च्या वेळेस भिंद्रानवाले नावाच्या अतिरेकी धर्मगुरुने सुवर्णमंदिर हायजॅक केले होते. सर्वच ठिकाणी असे नसेल. मराठी साहित्य संमेलन पंजाबात घेतले तेव्हा किती अगत्याने मराठी माणसाचे स्वागत केले होते पंजाबने. खलीस्तानच्या वेळेस ब्रेनवॉश करून तरुणांना भरकटवले होते. खलीस्तानचा विषय मागे पडून पंजाब देशाच्या मुख्य प्रवाहात आला आहे.

पंजाबा तील धार्मिक रिचुअल्स सर्व लिखित स्वरूपात कमी. मौ खिक जास्त आहेत. भजन गाणे, सत्संग, ग्रंथाचे वाचन व निरुपण ऐकणे. माझ्या देवघरात एक सर्व धर्मी कोपरा पण आहे. त्यात अमृतसरहून आणलेले एक क डे शीख धर्माचे प्रतीक म्हणून मी ठेवले आहे. सत श्री अकाल.

>>त्यात अमृतसरहून आणलेले एक क डे शीख धर्माचे प्रतीक म्हणून मी ठेवले आहे. सत श्री अकाल.>>>>
वा! छान वाटलं ऐकून.

सत श्री अकाल| वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह||

संत नामदेव पंजाबात जाऊन राहिले होते. त्यांची गुरुमुखीतली कवने ग्रंथसाहिबात आहेत म्हणतात त्याबद्दल उत्सुकता आहे.

+१ Srd
अरुंधतीच्या एका लेखात तो उल्लेख वाचल्याचे स्मरते. तिचे 'नऊ स्वप्नं' हे अमृता प्रीतमच्या 'नौ सपने' कवितेचे रुपांतर - निव्वळ अफाट झालेले आहे. मला वाटतं तिचा शीख धर्माचा व्यासंग आहे.
https://www.maayboli.com/node/21416

एकदा जुन्या पुस्तकाच्या टपरीवर खुशवंत सिंगाची दोन पुस्तके (दोन भाग) हिस्ट्री ओफ सिखिझम शंभर रुपयांला होती. लगेच न घेण्याची चूक झाली .

नक्कीच.
नक्कीच म्हण ण्याचे कारण सांगते - मला स्तोत्रांची आवड आहे. माझी आपल्या देवांवरती श्रद्धा आहे म्हणुन आणि फक्त म्हणून.
बाकी मुलीला ना आवड आहे ना तिचे वय आहे हे समजून घेण्याचे. मी प्रयत्न केला पण तिला काही आस्तिकतेची गोडी लावू शकले नाही. मात्र पुढे जाउन तिने तिला सुटेबल वाटेल असा कोणताही धर्म निवडला/ नाही निवडला, ती आस्तिकते कडे झुकली, नास्तिक झाली काहीही असो, माझा तिला पाठींबा राहील.

खलिस्तान अजुन जागे आहे, विषय सम्पला नाही. इथे लंडन मध्ये मोठ्याप्रमाणात शीखसमुहाची इच्छा आहे की ते वेगळे व्हावेत. इथुन अर्थपुरवठा करण्यास तयार आहेत आणि शत्रुचा मित्र, मित्र ह्यानुसार पाक त्यांना इथे उचकवत असतो.

मला स्वतःला शबद गुरुवाणी आवडते, पण मला सुफी संगीत आणि कॅरल्स पण आवडतात.

श्रद्धा असेल मनात तर कुठच्याही धर्मात 'अनुभव' येतात.

त्यात अमृतसरहून आणलेले एक क डे शीख धर्माचे प्रतीक म्हणून मी ठेवले आहे. सत श्री अकाल.>>>>
>> वा! छान वाटलं ऐकून

+१
मलाही एकदा कधीतरी आयुष्यात सुवर्ण मंदीर पहायचे आहे.

शिवप्रीत सिंग यांचे होळीच्या निमित्ताने रचलेले हे गाणे कानावरती पडले.

https://www.youtube.com/watch?v=80RRBQcRzEI

या गाण्यातही सुहागन हा शब्द येतो. या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगीतलेला आहे - जिला प्रेमाची प्राप्ती झालेली आहे अशी आत्मारुपी वधू (soul bride).
नानक विचारतात 'जा कोण्या सुहागनला विचारा इतकी सुंदर तू कशी बनलीस? तुझ्या गालांवरती इतक्या सुंदर लाल रंगाची उधळण कशी झाली?
गाण्याच्या शेवटी गुरु अर्जनसिंग सांगतात - Beauty is not what you do. Beauty is what grace does to you.

धन्यवाद रानभुली. काल मला माझ्याच प्रश्नाचे उत्तर सापडल्यामुळे हा लेख वरती काढला.
>>>>>>>>>इतक्या विविध धर्मातील संतांना ही एकच कल्पना कशी सुचली असेल हे एक कोडेच आहे.>>>>>>
नानकांनी 'सुहागन' शब्द वापरला आहे. आत्मारुपी वधूचे परमात्म्याशी झालेले मीलन अर्थात प्रेमप्राप्ती अशी ती संकल्पना आहे. असे संतलोक ज्यांना ते प्रेम प्राप्त झाले. हे शिवप्रीत यांच्या नरेशनमधुन कळले.
.
नानक विचारतात 'तुम्हाला सुंदर व्हायचे असेल तर, जा आणि कोण्या सुहागनला विचारा इतकी सुंदर तू कशी बनलीस? तुझ्या गालांवरती इतक्या सुंदर लाल रंगाची उधळण कशी झाली?
गाण्याच्या शेवटी गुरु अर्जनसिंग सांगतात - Beauty is not what you do. Beauty is what grace does to you.